येत्या रविवारी भाजपच्या १५० एसटी बसेस कोकणाच्या रस्त्यावर

163

गणेशोत्सवात मोठ्याप्रमाणात चाकरमनी गावाला जात असल्याने यंदा भाजपने कोकणातील जनतेसाठी तब्बल १५० एसटी बसेस रत्नागिरी व सिंधुदूर्गासाठी सोडल्या आहेत. मुंबईत ज्या भागांमध्ये कोकणी पट्टा अधिक आहे, त्या पट्टयांमधून १५० बसेस सोडण्यात येत असून रविवारी एकाच दिवशी विविध भागांमधून १५० गणपतीसाठी बसेस सोडल्या जाणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणी मतदारांना आपलेसे करण्यासाठी भाजपने बसेस सुविधा पुरवली आहे. गावी जाणाऱ्या गणेश भक्तांचा चांगलाच प्रतिसाद लाभलेला पहायला मिळत आहे.

( हेही वाचा : एसटी कर्मचारी आक्रमक; पुन्हा आंदोलनाचा इशारा )

गणशोत्सवाला येत्या ३० सप्टेंबरपासून सुरुवात होत असून या गणेशोत्सवाकरता मोठ्याप्रमाणात कोकणातील जनता गावी जाण्याच्या तयारीला लागली आहे. गणेश चतुर्थीचा सण कोकणी माणसांचा आवडता सण असून याकरता प्रत्येक कोकणातील माणूस हा या उत्सवाकरता गावी जात असते. त्यामुळे प्रत्येक कोकणी माणसांची गावी जाण्याची लगबग सुरु असून कोविड काळानंतर प्रथमच निर्बंधमुक्त उत्सव साजरा करायला निघणाऱ्या कोकणी जनतेला आपल्या गावी जाता यावे याकरता भाजपने १५० एसटी बससे एकट्या मुंबईतून सोडले असल्याची माहिती भाजपच्या मुंबई कार्यालयातून देण्यात आली आहे.

१०० रुपयांचे नोंदणी शुल्क हे परत दिले जाणार

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून तत्कालिन भाजपचे मुंबई अध्यक्ष व राज्यातील मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांतून ज्या भागांमध्ये भाजपचे आमदार नाहीत अशा भागांमध्ये तसेच इतर सिंधुदूर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील लोकसंख्या अधिक आहे, त्या भागांमधून या बसेस १०० रुपये प्रवेश शुल्क आकारुन नोंदणी करण्यात आले आहे. या बस सेवेसाठी आकारण्यात आलेले शुल्क हे प्रत्यक्षात प्रवासाला निघाल्यानंतर परत केले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांकडून आकारले १०० रुपयांचे नोंदणी शुल्क हे परत दिले जाणार असल्याचे मुंबई भाजपने स्पष्ट केले.

एकूण १५० बसेस सोडल्या जात असून यासर्व बसेस फुल्ल झाल्या आहे. यासाठी आकारले जाणारे शुल्क परत दिले असल्याने चाकरमन्यांना गणपतीकरता गावी जाण्याचा मोफत प्रवासाची सुविधाच एकप्रकारे उपलब्ध करून दिली आहे. विविध भागांमधून रविवारी या १५० बसेस सुटल्या जाणार असून एका बसेसमध्ये ४२ प्रवासी असल्याने तब्बल ६३०० प्रवाशांना भाजपने मोफत प्रवास उपलब्ध करून दिला आहे.

कोकणी जनतेला मदतीचा हात

यापूर्वी कणकवली, देवगड, वैभववाडी मतदार संघातील भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सर्वप्रथम १०० रुपयांमध्ये बससेवा काही वर्षांपासून गणेशोत्सवाकरता कोकणातील जनतेसाठी उपलब्ध करून दिली होती. खासगी बसेसमधून नितेश राणे यांनी १०० रुपयांमध्ये कोकण प्रवास उपलब्ध करून देत प्रत्येक वर्षी ही सेवा देण्याची प्रथा पाडली होती. परंतु यंदा भाजपने तब्बल १५० बसेस कोकणसाठी सोडून एक पाऊल पुढे टाकले आहे. एरव्ही शिवसेना व मनसेसह काँग्रेसच्यावतीनेही कोकणासाठी विशेष बस सेवा उपलब्ध करून दिली जात असे. परंतु यंदा सर्वच राजकीय पक्षांनी पाठ फिरवल्यानंतर भाजपने कोकणी जनतेला मदतीचा हात दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.