बृहन्मुंबई क्रीडा व ललित कला प्रतिष्ठानला उभारी देण्यासाठी भाजपची मागणी

पुनश्च एकदा या वास्तूला प्रतिष्ठा मिळवून द्यावी व डबघाईला आलेल्या परिस्थितीवर मात करुन उभारी मिळवून द्यावी.

बृहन्मुंबई क्रीडा व ललित कला प्रतिष्ठानचा अनागोंदी कारभार व त्याकडे महापालिकेने केलेले दुर्लक्ष अखेर प्रतिष्ठानला खड्ड्यात टाकणारे ठरत असून, या प्रतिष्ठानचे विद्यमान विश्वस्त मंडळ बरखास्त करुन अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या तज्ज्ञ, कार्यक्षम व प्रामाणिक व्यक्तींकडे याची जबाबदारी सोपवण्याची मागणी, भाजप नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

काय आहे मागणी?

मुंबई महापालिकेच्या या वास्तुमध्ये कला व क्रीडा प्रकारांना वाव देण्यासाठी पालिकेने 1990 मध्ये बृहन्मुंबई क्रीडा व ललित कला प्रतिष्ठान या संस्थेची स्थापन केली होती. मात्र आता कला व क्रीडा या गोष्टीसाठी प्रतिष्ठानकडून महत्व न देता याचे व्यावसायीकरण केले गेल्याने ठेकेदारांची मनमानी याठिकाणी वाढली आहे. त्यामुळे प्रतिष्ठानच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेलेला आहे व भ्रष्टाचारास वाव मिळाला आहे. या प्रतिष्ठानच्या अंधेरी व मुलुंड येथील हजारो कोटींच्या वास्तूंचा जनतेला कोणताच फायदा होत नाही. याबाबत अंधेरी व मुलुंड मधील नागरिकांच्या तक्रारी सुद्धा आल्या आहेत. या प्रतिष्ठानचे परिरक्षण महापालिका करत आहे. तरीही प्रतिष्ठानची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. यामधील १८ कोटींच्या ठेवी 6 कोटींवर आल्या आहेत ही बाब अत्यंत गंभीर आहे. या प्रतिष्ठानवर ट्रस्टींचा कोणताच अंकुश राहिलेला नाही. त्यांना याबाबत बैठका घ्यायला व याकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने, ते याची जबाबदारी पेलण्यास असमर्थ वाटतात, असे गंगाधरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

(हेही वाचाः मुंबईतील उद्यानांना आता राणी लक्ष्मीबाई, टिपू सुलतान यांची नावे)

आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न

प्रतिष्ठानचे मुख्य विश्वस्त म्हणून आदेश बांदेकर हे यापूर्वी काम पाहत होते. परंतु श्री सिध्दीविनायक न्यास समितीवर अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाल्यानंतर, त्यांनी या प्रतिष्ठानचा राजीनामा दिला. पण त्यांचे नाव तिथे पुढेही कायम होते. त्यानंतर याठिकाणी मुख्य विश्वस्त म्हणून कुठल्याच व्यक्तीची नेमणूक झालेली नाही. कोविड काळातील पहिल्या लाटेनंतर प्रतिष्ठानची प्रशासकीय जबाबदारी महापालिकेचे निवृत्त उपायुक्त देवेंद्र जैन यांच्यावर सोपवण्यात आली. पण त्या आधीच प्रतिष्ठानची आर्थिक स्थिती कमजोर झाली होती आणि पुन्हा या प्रतिष्ठानची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न होत आहे.

जनतेला लाभ मिळावा

येथील वास्तू व इतर सेवांची देखभाल करणे प्रतिष्ठानला डोईजड होऊ लागले आहे. शिवाय एकवेळ नफ्यात असलेल्या प्रतिष्ठानकडे कर्मचा-यांचे वेतन देण्यासही पैसे नसल्याची नामुष्की ओढवली आहे. यावर मात करण्यासाठी प्रतिष्ठानने पालिकेकडे २५ कोटी रुपयांच्या बिनव्याजी कर्जाची मागणी केली असल्याची बाब गंगाधरे यांनी या पत्रात अधोरेखित केली आहे. त्यामुळे प्रतिष्ठानला चांगले दिवस आणण्यासाठी अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची याठिकाणी वर्णी लावून पुनश्च एकदा या वास्तूला प्रतिष्ठा मिळवून द्यावी व डबघाईला आलेल्या परिस्थितीवर मात करुन उभारी मिळवून द्यावी. जेणेकरुन स्थानिक जनतेला या वास्तूचा लाभ घेता येईल, असे गंगाधरे यांनी स्पष्ट केले आहे.

(हेही वाचाः आता मुंबईच्या मार्केटमधील विक्रेते होणार लसवंत! काय आहे महापालिकेचा निर्णय?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here