मुंबई मध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनला आहे. यामध्ये बीकेसी BKC Traffic मध्ये तर हा प्रश्न जास्त गंभीर बनत चालला आहे. यावर तोडगा म्हणून एमएमआरडीए ने सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. बीकेसीत BKC Traffic आयटीएमएस अर्थात इंटेलिजंट मॅनेजमेंट ट्रॅफिक सिस्टीम’ (आयटीएम) बसविण्याच्या दृष्टीनेही अभ्यास करण्यात येणार आहे. भविष्यातील वाहतूक आणि त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांचा अभ्यास याद्वारे केला जाणार आहे. आराखड्यानुसार आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत.
या आराखड्याच्या अहवालानंतर प्राधान्याने पुढील काही महिन्यांत बीकेसीत BKC Traffic आयटीएम यंत्रणा बसविण्यात येण्याची शक्यता आहे. बीकेसी मध्ये अनेक मोठ्या कंपन्यांची ऑफिसेस आहेत तसेच बँका, सरकारी कार्यालयेही तेथे थाटली गेली आहेत. बीकेसीतील जागेला मोठा भाव आहे. दररोज तेथे हजारो नागरिक आणि वाहनांची ये-जा सुरू असते. मागील काही वर्षांत तेथे येणाऱ्या वाहनांची संख्या वाढतच आहे. मात्र त्यातुलनेत रस्ते किंवा इतर वाहतुकीचे पर्याय विकसित होत नसल्याने येथे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. तेथील सध्याची आणि भविष्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बीकेसीचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांनी दिली आहे.
( हेही वाचा – Sharad Pawar : अखेर शरद पवारांनी अजित पवारांसोबतच्या भेटीमागील केला खुलासा; म्हणाले…)
तीन टप्प्यांत सुटणार वाहतूक कोंडी
तीन टप्प्यांत सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात तत्काळ अगदी पाच वर्षांतील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांचा अभ्यास केला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात त्यापुढील काही वर्षांचा आणि तिसऱ्या टप्प्यात पुढील पंचवीस वर्षांतील वाहतूक कोंडीचा आणि त्यादृष्टीने उपाययोजनांचा अभ्यास केला जाणार आहे. हा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. एमएमआरडीएने सल्लागाराच्या नियुक्तीसाठी निविदा काढली आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सल्लागार सहा महिन्यांत आराखडा तयार करणार आहे. हा आराखडा सादर झाल्यानंतर पाच वर्षांतील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यात आयटीएमएस यंत्रणेचाही समावेश असणार आहे. वाहतुकीची शिस्त पाळणे, अपघात टाळणे, वाहतुकीचे नियमन करणे अशा सर्व गोष्टी अत्याधुनिक अशा आयटीएमएस यंत्रणेद्वारे केल्या जाणार आहे. एकूणच सर्वंकष वाहतूक आराखडा आणि त्यातील उपाययोजनांची अंमलबजावणीद्वारे लवकरच बीकेसीतील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होण्याची आणि येथील वाहतूक व्यवस्था आणखी सक्षम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.