पैसे चोरण्यासाठी घडवला स्फोट… पुण्यातली घटना

पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक गुन्हेगारी घटना समोर येत आहेत. आता तर चाकण परिसरात चक्क स्फेट घडवून एटीएम फोडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पुण्यात एकच खळबळ माजली आहे. पुण्यात भररस्त्यात खुलेआम हत्या करण्यात आल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून घडत आहेत. यामुळे पुणेकर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मध्यरात्री घडली घटना

पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसी परिसरातील मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेले एटीएम अज्ञातांनी स्फोट करुन फोडले. एटीएम मधून रोख रक्कम चोरुन नेली आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले असून, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांचे शोधकार्य सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, चाकण मधील महाळुंगे पोलिस चौकीच्या हद्दीत भांबोली येथे मुख्य रस्त्याच्या बाजूला हिताची कंपनीचे एटीएम आहे. बुधवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. एटीएम फोडताना स्फोट झाल्याने मोठा आवाज झाला. त्यामध्ये एटीएमचे मोठे नुकसान झाले. स्फोट घडवून चोरट्यांनी एटीएम मधून रोकड चोरुन नेली. घटनेची माहिती मिळताच महाळुंगे पोलिस तसेच गुन्हे शाखा आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेत नेमकी किती रक्कम चोरीला गेली याबाबत माहिती मिळू शकली नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here