मुंबईतील हवेतील धुळीचे प्रदूषण (Dust pollution) नियंत्रणात आणण्यासाठी मुंबईतील रस्ते पाण्याने धुतले जात असून शुक्रवारी हाती घेतलेली मोहिमेंतर्गत शनिवारी, ४ नोव्हेंबर २०२३ रोजी मुंबई शहर, पूर्व व पश्चिम उपनगरे मिळून एकूण ५५ किमी परिक्षेत्रात आज पाणी फवारणी करून रस्ते धुण्यात आले.
मुंबईतील वायू प्रदूषणाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचा एक घटक म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) घनकचरा व्यवस्थापन विभागाने पावले उचलली आहेत. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिकेला मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर उपयोजना करावे असे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल व अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या विविध विभागाने धूळ नियंत्रण करण्यासाठी विशेष उपाययोजना प्रस्तावित केले आहेत. यानुसार वायू प्रदूषण अधिनियम, १९८१ अन्वये, २४ विभागीय कार्यालयातील विविध रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण (धूलिकण) कमी करण्याकरिता तसेच हवा गुणवत्ता निर्देशांकात सुधार करण्यासाठी, धुळीचे प्रमाण अत्याधिक असलेल्या ठिकाणी, महानगरपालिकेच्या स्लज डिवॉटरींग (१७), फायरेक्स टँकर (७), सूक्ष्मजल फवारणी यंत्र (५) (Mist-Blowing) यांच्या साहाय्याने पाण्याची फवारणी करण्यात आली आहे.
(हेही वाचा – Toll Plazas In Mumbai : मुंबईतील टोल प्लाझाच्या ठिकाणी स्वच्छता राखा; महापालिकेचे एमएसआरडीसीला निर्देश)
मुंबई शहर, पूर्व व पश्चिम उपनगरे मिळून एकूण ५५ किमी परिक्षेत्रात आज शनिवारी ४ नोव्हेंबर २०२३ रोजी पाणी फवारणी करण्यात आली आहे. काल शुक्रवार दिनांक ३ नोव्हेंबर २०२३ रोजी एकूण ४५ किलोमीटर परिक्षेत्रात पाणी फवारणी करण्यात आली होती. हवा गुणवत्ता निर्देशांक अधिक असलेल्या ठिकाणी फवारणीची वारंवारता वाढविण्यात येणार असल्याचे उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव यांनी कळविले आहे.
Join Our WhatsApp Community