BMC : मुंबईत ३६०५ मालमत्तांकडे सुमारे १७०० कोटींची थकबाकी; महानगरपालिकेकडून जप्ती आणि अटकावणीची कारवाई

38
BMC : मुंबईत ३६०५ मालमत्तांकडे सुमारे १७०० कोटींची थकबाकी; महानगरपालिकेकडून जप्ती आणि अटकावणीची कारवाई
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मालमत्ता कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ३ हजार ६०५ मालमत्ताधारकांवर मुंबई महानगरपालिकेच्यावतीने विद्यमान आर्थिक वर्षात म्‍हणजेच १ एप्रिल २०२४ पासून जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आली आहे. या मालमत्तांमध्ये एशियन हॉटेल्‍स्, सहारा हॉटेल्‍स्, कमला मिल्‍स लिमिटेड, मोहित कन्‍स्‍ट्रक्‍शन कंपनी आदी भूखंड आणि निवासी-व्‍यावसायिक इमारती, व्‍यावसायिक गाळे, औद्योगिक गाळे आदींचा समावेश आहे. (BMC)

यामध्ये पश्चिम उपनगरात सर्वाधिक म्‍हणजे १ हजार ७६७, शहर विभागात १ हजार २३२ तर पूर्व उपनगरातील ६०६ मालमत्‍तांवर जप्‍ती आणि अटकावणीची कारवाई करण्‍यात आली आहे. या ३ हजार ६०५ मालमत्ताधारकांकडे एकूण १ हजार ६७२ कोटी ४१ लाख रुपयांची कर थकबाकी आहे. त्‍यापैकी २१८ कोटी ९६ लाख रूपयांचा कर भरणा या मालमत्‍ताधारकांनी केला आहे. (BMC)

(हेही वाचा – Ind vs Aus, Perth Test : पर्थमध्ये साकारला भारताचा ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठा विजय, कसोटीतील अनेक विक्रमांची मोडतोड)

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशांनुसार आणि सहआयुक्‍त (कर निर्धारण व संकलन) विश्‍वास शंकरवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांकडून करसंकलन करण्यासाठी करनिर्धारण व संकलन खात्याकडून प्रयत्न सुरू आहेत. दिलेल्या मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून वेळोवेळी केले जात आहे. परंतु, कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. (BMC)

कर निर्धारण व संकलन विभागाने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ६ हजार २०० कोटी रूपये कर संकलन उद्दिष्‍ट निश्चित केले आहे. त्‍या दृष्‍टीने विविध पातळ्यांवर कार्यवाही सुरू आहे. निर्धारित कालावधीमध्ये कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ताकर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कलम २०३ अन्वये जप्‍तीची नोटीस बजावण्यात येत आहेत. या विहीत मुदतीत कर भरणा न केल्यास मुंबई महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधित मालमत्तेवर कलम २०३, २०४, २०५, २०६ अन्वये प्रथमतः मालमत्तेतील चीज वस्तू जप्त करुन लिलाव केला जाणार आहे. जर मालमत्तेचा उच्च न्यायालयाच्या याचिका क्रमांक २५९२/२०१३ च्या अंतरिम आदेशान्वये येणारा कर वसूल न झाल्यास मालमलेचा लिलाव करण्यात येईल, असे नोटीसीद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. (BMC)

(हेही वाचा – Assembly Election Result 2024 : तुतारी पुन्हा फोडणार ट्रम्पेटवर खापर)

याच पार्श्वभूमीवर १ एप्रिल २०२४ ते आजमितीस म्हणजे दिनांक २५ नोव्‍हेंबर २०२४ अखेरपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागामधील कर थकविणाऱ्या ३ हजार ६०५ मालमत्ताधारकांवर मुंबई महानगरपालिका अधिनियम-१८८८ च्या कलम २०३ नुसार, जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आली आहे. जप्ती आणि अटकावणीची कारवाई झालेल्या ९० मालमत्तांची लिलावाद्वारे विक्री करण्याची कार्यवाही सुरू करण्‍यात आली आहे. (BMC)

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरणा करण्याचा पहिल्‍या सहामाहीची अंतिम देय मुदत शनिवारी १३ डिसेंबर २०२४ आहे. मालमत्ताधारकांनी या अंतिम देय मुदतीपूर्वी कर भरणा न केल्यास त्यांच्यावर कठोर दंडात्मक कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मुदतीपूर्वी त्यांच्या मालमत्ता कर भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. (BMC)

(हेही वाचा – Shiv Sena UBT च्या गटनेतेपदी भास्कर जाधव यांची निवड)

दिनांक २५ नोव्‍हेंबर २०२४ रोजी कर भरणाऱ्या ‘टॉप टेन’ मालमत्ताधारकांची यादी

१) मेसर्स सेजल शक्‍ती रिअॅल्‍टर्स (एफ उत्तर विभाग) – १४ कोटी ८५ लाख ९९ हजार २०८ रुपये
२) लक्ष्‍मी कमर्शियल प्रीमायसेस (जी उत्तर विभाग) – १४ कोटी २९ लाख ९० हजार १२१ रुपये
३) मेसर्स एशियन हॉटेल्‍स् लिमिटेड (के पूर्व विभाग) – १४ कोटी १८ लाख ९२ हजार ३०२ रुपये
४) सहारा हॉटेल्‍स् (के पूर्व विभाग) – १३ कोटी ९३ लाख ५० हजार ९६३ रुपये
५) मेसर्स न्यूमॅक अॅण्‍ड रिओडर जे. व्ही. (एफ उत्तर विभाग) – १३ कोटी ४५ लाख ४४ हजार ८१२ रुपये
६) मेसर्स फोरमोस्‍ट रिअॅल्‍टर्स प्रायव्‍हेट लिमिटेड (एच पूर्व विभाग) – १२ कोटी ५० लाख ९० हजार १३९ रुपये
७) श्री साई पवन को – ऑपरेटीव्‍ह हाऊसिंग सोसायटी (के पश्चिम विभाग) – ११ कोटी ६९ लाख ४५ हजार ०५८ रुपये
८) कमला मिल्‍स लिमिटेड (जी दक्षिण विभाग) – ११ कोटी ४७ लाख २५ हजार १३० रुपये
९) श्री एल. एन. गडोदिया अॅण्‍ड सन्‍स लिमिटेड (एच पश्चिम विभाग) – ११ कोटी ४४ लाख ९७ हजार ५८२ रुपये
१०) मोहित कन्‍स्‍ट्रक्‍शन कंपनी (के पश्चिम विभाग) – ११ कोटी २६ लाख ५६ हजार २६७ रुपये

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.