सचिन धानजी, मुंबई
मुंबई महापालिकेच्या (BMC) वतीने चांदिवलीत बांधण्यात येणाऱ्या ४ हजार प्रकल्प बाधित सदनिकांचा (पीएपी-PAP) मार्ग आता बंद झाला आहे. चांदिवलीत चार हजार पीएपी बांधण्यासाठी महापालिकेच्या वतीने विकासकाची नेमणूक केली होती. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत (एसआरए-SRA) बांधण्यात येणाऱ्या विक्रीच्या इमारतीच्या जागेत ४ हजार सदनिका बांधून देण्याची तयारी दर्शवणाऱ्या डीबीएस रिऍल्टीने ही जमिन महापालिकेला नावावर करून न दिल्याने, तसेच संबंधित कागदपत्रे सादर करण्यास विलंब केल्याने अखेर प्रशासनाने महापालिकेने मंजूर केलेला हा ठरावच रद्द केला आहे. त्यामुळे चांदिवलीत (Chandivali) निर्माण होणाऱ्या चार हजार सदनिकांच्या बांधकामाला खिळ बसल्याने प्रकल्पबाधितांसाठीच्या घरांसाठी नवीन शोध घेण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.
मार्च २०२२ मध्ये दिले होते स्वीकृतीचे पात्र
मुंबईतील चांदिवलीमधील भूखंडावर प्रकल्पबाधित व्यक्तींसाठी ३०० चौरस फुटांच्या ४ हजार सदनिका बांधण्यासाठी, तसेच बांधकाम पूर्ण झाल्यानंतर भूखंडासह सदनिका संपादित करण्यासाठी सुधार समिती व महापालिकेच्या मंजुरीने जानेवारी २०२१मध्ये ठराव केला होता. त्यानुसार विकासक डीबीएस रिऍल्टी (DBS Realty) यांना मार्च २०२२मध्ये स्वीकृतीचे पत्र दिले होते. या ठरावानुसार जमीन व बांधकामाचा हस्तांतरणीय विकास हक्क अर्थात टीडीआर सह प्रती सदनिका ३९ लाख ६० हजार एवढे शुल्क देण्यास मंजुरी देण्यात आली होती. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील (Slum Rehabilitation Authority) विक्रीच्या इमारतींच्या जागेवर या ४ हजार सदनिकांचे बांधकाम करून देण्याची तयारी डीबीएस रिऍल्टी या विकासकांनी दर्शवली होती.
एसआरएला प्रस्ताव सादर, पण…
या सदनिकांच्या बांधकामासाठी डीबीएस रिअल्टी यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील (एसआरए-SRA) विक्रीच्या जागेवर पुनर्वसन सदनिका बांधून महापालिकेला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर महापालिकेच्या विधि विभागाच्या वतीने करार पत्र तयार करण्यात आले. ज्यावर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अर्थात (एसआरए-SRA) महापालिका आणि डी बी एस रिअल्टी या तिघांच्या स्वाक्षरी या करार पत्रावर घेण्याच्या दृष्टिकोनातून ०१ जुलै २०२२ रोजी ‘एसआरए’ ला प्रस्ताव सादर करण्यात आला.
वीस महिन्यांचा कालावधी उलटूनही…
त्यानंतर पुन्हा संबंधित विकासकाला २५ ऑगस्ट २०२२ रोजी स्मरण पत्र पाठवून मंजुरी प्राप्त करण्यास महापालिकेने कळवले होते. तसेच १५ डिसेंबर २०२२ रोजी पुन्हा महापालिकेने डीबीएस यांना जमिनीच्या मालकी हक्काबाबतची कार्यवाही युद्ध पातळीवर करण्याबाबत तसेच याला अधिक दिरंगाई झाल्यास आपले स्वीकृती आदेश रद्द ठरविण्यात येईल असेही कळवले होते. परंतु आजमितीस करार पत्रानुसार मसुदा पत्रावर तिघांच्या स्वाक्षरी एसआरए मार्फत प्राप्त करून घेण्यास डी बी एस ही विकासक कंपनी अयशस्वी यशस्वी ठरली. या प्रकल्पाचा कालावधी साठ महिन्यांचा होता. परंतु २० महिन्यांच्या कालावधी उलटूनही या प्रकल्पाचे काम सुरू न झाल्यामुळे महापालिकेने संबंधित विकासकाला दिलेले स्वीकृतीचे पत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिकेचा ठराव आणि पूर्वीचे सर्व आदेश महापालिकेने रद्द केले आहेत. त्यामुळे चांदीवलीतून महापालिकेला प्राप्त होणाऱ्या चार हजार सदनिकांचा मार्ग आता कायमचाच बंद झाला आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community