BMC : मुंबईतील सुशोभिकरणावर ६१७ कोटींचाच खर्च

238

रस्ते, पूल, उड्डाणपूल, पदपथ, वाहतूक बेटं, समुद्रकिनारे, उद्याने इत्यादी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, सुधारणा, हरितीकरण, आकर्षक प्रकाशयोजना आदींचा समावेश असणाऱ्या तसेच दीर्घकालीन गुणवत्तेची १७ निरनिराळ्या प्रकारातील  सुशोभिकरणाची  कामे हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत ६१७ कोटी रुपये खर्च झाले असून त्यातील रस्ते सुधारणा कामांसाठी १२० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. त्यामुळे रस्ते कामांचा खर्च वगळता सुशोभीकरणावर सुमारे ५०० कोटी रुपयांचाच खर्च झाल्याची माहिती महापालिका प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी स्पष्ट केले.

मुंबईत सुशोभीकरण कामांच्या नावाखाली महापालिकेच्या तिजोरीची लूट सुरु असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरु होता. त्यावर स्पष्टीकरण रविवारी महापालिका प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी पत्रकार परिषदेत दिले.  यावेळी अतिरिक्त आयुक्त पी वेलारासू आणि अतिरिक्त आयुक्त श्रावण हर्डीकर आणि सह आयुक्त सुनील धामणे, चंद्र शेखर चौरे आणि विजय बालमवार हे उपस्थित होते. यावेळी स्पष्टीकरण देताना चहल यांनी मुंबईची प्रतिमा उंचावण्यासाठी संपूर्ण महानगराच्या सुशोभीकरणाचा प्रकल्प ऑक्टोबर २०२२ पासून सुरू करण्यात आला. मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांसाठी मोकळ्या जागांची निर्मिती, वाहतूक बेटं, उद्याने, पदपथ, विद्युत स्तंभ, सुशोभीत सार्वजनिक भिंती इत्यादी बाबींवर लक्ष केंद्रित करून त्यांची सुधारणा, सुशोभीकरण यावर भर दिला आहे.

मुंबई सुशोभीकरण प्रकल्प अंतर्गत आजवर एकूण १,१९६ कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. त्या पैकी ९५१ कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये शहर विभागातील २८९ तर उपनगरांमधील ६६२ कामांचा समावेश आहे. ही कामे विभाग कार्यालयांमार्फत करण्यात आली आहेत.

(हेही वाचा Sharad Pawar : पवारांना आठवले १९८० चे बंड; परदेश दौऱ्यावर असताना ५२ आमदारांनी सोडली होती साथ)

मुंबईत यापूर्वी  खराब रस्त्यांची सुधारणा  करण्यासाठी पृष्ठभागावर ओरखडे देऊन त्यावर अस्फाल्टचा थर देण्याचे काम हाती घेण्यात आले. अशाप्रकारे रस्ते विभागाकडून १२० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे पृष्ठीकरण होती घेण्यात आले आहे. यासाठी १२० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.

तर यांत्रिकी व विद्युत विभागाने १३ आकाश मार्गिका (स्काय वॉक) चे विद्युत सुशोभीकरण पूर्ण केले आहे. गेटवे ऑफ इंडिया परिसर विकास प्रकल्प देखील या अंतर्गत रस्ते विभागाने हाती घेतला आहे.

या सुशोभीकरण प्रकल्पावर आजवर ६१७ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. यापैकी सन २०२२-२०२३ मध्ये ४९९ कोटी ८८ लाख रुपये तर सन २०२३-२०२४ मध्ये ११७ कोटी ७९ लाख रुपये याप्रमाणे आतापर्यंत एकूण ६१७ कोटी ६७ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. त्यापैकी ४५० कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत.  त्यामुळे निव्वळ सुशोभीकरणावर ५०० कोटी रुपयांचाच खर्च झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.