BMC : रुग्णालयीन कर्मचाऱ्यांकडून रुग्णांसह नातेवाईकांना अरेरावीची भाषा नको, अभिजित बांगर यांनी दिला आरोग्य विभागाला डोस

1484
BMC : रुग्णालयीन कर्मचाऱ्यांकडून रुग्णांसह नातेवाईकांना अरेरावीची भाषा नको, अभिजित बांगर यांनी दिला आरोग्य विभागाला डोस

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये येणारे रुग्ण आणि रुग्णांसोबत येणारे नातेवाईक व आप्त यांच्यासोबत रूग्णालयातील कर्मचारी यांची वर्तवणूक नम्र आणि आपुलकीची रहावी तसेच रुग्ण आणि नातेवाईकांना कर्मचाऱ्यांमार्फत अरेरावीची भाषा वापरली जाणार नाही याची यासाठी प्रकर्षाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाचा प्रभारी पदभार असलेल्य अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी आवर्जून नमूद करत सर्व रुग्णालयांच्या कर्मचाऱ्यांना एकप्रकारे डोसच दिला आहे. (BMC)

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची आढावा बैठक बुधवारी (७ ऑगस्ट) महानगरपालिका मुख्यालयात त्यांनी घेतली. त्याप्रसंगी संबंधितांशी संवाद साधताना त्यांनी हे निर्देश दिले आहेत. या बैठकीला उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण) डॉ. नीलम अंद्राडे, लोकमान्य टिळक सर्वोपचार रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, केईएम रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, नायर रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर, उपनगरीय रूग्णालयांचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. चंद्रकांत पवार आणि संबंधित ज्येष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

(हेही वाचा – Maritime Security साठी महाराष्ट्राला २८ बोटी, १९ सागरी पोलीस ठाणे व ३२ नाके)

महानगरपालिकेच्या रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांमध्ये तुलनेने आर्थिक गरजूंची संख्या जास्त असते. अशा रुग्णांना समाधानकारक सेवेचा लाभ देण्यामध्ये आपण कमी पडलो तर ती बाब आपल्याला फक्त कर्तव्यातील अभाव दर्शवणारी नसून एक व्यक्ती म्हणून जगण्यातील प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आपण कमी पडलो, अशी खंतच अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी व्यक्त करत रुग्णालयीन कर्मचाऱ्यांची वर्तणूक एकप्रकारे अधोरेखित केली. महानगरपालिका रुग्णालयात रूग्णांना सुखद अनुभव मिळेल, यासाठीची काळजी घेणे गरजेचे असल्याचेही बांगर यांनी म्हटले आहे. (BMC)

कुचराई करणाऱ्या कंत्राटदारांवर तत्काळ कारवाई

रूग्ण आणि नातेवाईक यांची गर्दी पाहता प्रसाधनगृहाच्या ठिकाणी जास्त गर्दीच्या वेळेत सातत्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी तसेच वैद्यकीय अधिक्षक यांनी जातीने लक्ष घालून प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेबाबत नियमितपणे लक्ष द्यावे. रूग्णांची प्रसाधनगृह वापरताना स्वच्छतेच्या अनुषंगाने कोणतीही गैरसोय होणार नाही, यादृष्टीने काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. तसेच रुग्णालय परिसरात पराकोटीची स्वच्छता असावी याचीही खातरजमा करणेही गरजेचे आहे. स्वच्छतेची सेवा पुरवण्याच्या बाबतीत जे कंत्राटदार कुचराई करत असतील त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशाही सूचना बांगर यांनी दिल्या.

सकारात्मक आणि विनयशील वर्तणूक गरजेची

आरोग्य व वैद्यकीय सेवेच्या प्रतिक्षेत असणारे रूग्ण आणि रूग्णांचे नातेवाईक यांना रुग्णालयाच्या ठिकाणी अधिकाधिक दिलासादायक परिस्थिती असावी व या अनुषंगाने सकारात्मक आणि विनयशील वर्तणूक असणे गरजेचे आहे. रुग्णालयातील उपचार पूर्ण झाल्यानंतर रुग्ण आणि त्यांचे आप्त यांचा प्रतिसाद नियमितपणे नोंदविणारी यंत्रणा असणे गरजेचे असून या प्रतिसादाच्या आधारे आपण देत असलेल्या वैद्यकीय व आरोग्य विषयक सोयीसुविधा अधिक सक्षम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

(हेही वाचा – Hindu : भिवंडीतील जिहादी हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा)

सर्व उपकरणांची नियमित तपासणी करावी

रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कर्मचाऱ्यांची पुरेशी उपलब्धतता, रुग्णालयातील विद्युत व्यवस्थेची व विद्युत उपकरणांची नियमित तपासणी, अग्नी सुरक्षेच्या दृष्टीने नियमित परिक्षण (फायर ऑडिट), प्राणवायू (ऑक्सिजन) संचांची आणि रुग्णालयातील सर्व उपकरणांची नियमित तपासणी करण्यात यावी. वरीलनुसार सर्व बाबींमुळे एखाद्या आजाराचा प्रभाव वाढला, तरीही आरोग्य व वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज व सतर्क राहण्यासाठी मदत होईल व नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य व वैद्यकीय सेवा देण्यास बळ मिळेल, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी आजच्या बैठकीदरम्यान व्यक्त केला. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.