BMC : हवामानाच्या अंदाजानुसार अतिवृष्टीची शक्यता, त्या-त्या वेळी अधिकारी कार्यस्थळी हजर हवेत; आयुक्तांच्या सूचना

1127
BMC : हवामानाच्या अंदाजानुसार अतिवृष्टीची शक्यता, त्या-त्या वेळी अधिकारी कार्यस्थळी हजर हवेत; आयुक्तांच्या सूचना
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

पावसाळ्यात विविध प्राधिकरणांशी सातत्याने परस्पर समन्वय ठेवून दररोजच्या कामांबाबत माहिती जाणून घ्या. जेणेकरून दुर्दैवाने कुठे पाणी तुंबले तर महानगरपालिकेच्या यंत्रणेसह या प्राधिकरणांचीही मदत घेवून जनजीवन सुरळीत करता येईल. हवामानाच्या अंदाजानुसार ज्या-ज्या वेळी अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात येईल त्या-त्या वेळी प्रत्येक अधिकारी कार्यस्थळी हजर रहायला हवा, अशा सूचना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी गगराणी यांनी दिल्या. (BMC)

मुंबईतील पावसाळापूर्व कामे वेगाने सुरू आहेत. मिठी नदीसह शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांतील प्रमुख नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, ११ एप्रिल २०२५ रोजी महत्त्वाची बैठक पार पडली. तेव्हा गगराणी बोलत होते. या बैठकीत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) शशांक भोरे, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) श्रीधर चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी, अभियंते उपस्थित होते. (BMC)

(हेही वाचा – एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा ७ तारखेला होणार; परिवहनमंत्री Pratap Sarnaik यांची मोठी घोषणा)

आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी म्हणाले, आपल्या भागात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांची इत्यंभूत माहिती प्रत्येक अधिकाऱ्याला असायलाच हवी. त्या कामाची सद्यस्थिती, त्या ठिकाणचे आव्हाने, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या आदींबाबत आतापासूनच नियोजन करून त्यावर तोडगा काढा. कार्यालयीन कामे सांभाळून प्रत्येक अभियंत्याने प्रत्यक्ष नालेसफाई सुरू असलेल्या ठिकाणी दररोज भेट द्यायला हवी. आपल्याकडील कामांचे आणि उर्वरित दिवसांचे सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार वेळापत्रक तयार करा, अशा महत्त्वाच्या सूचना आयुक्त गगराणी यांनी दिल्या. आपल्या विभागात प्रामाणिकपणे काम करीत असताना आपापल्या परिसरातील परिमंडळाचे उप आयुक्त, सहायक आयुक्त यांच्यासोबत सतत संपर्कात रहा, अशा शब्दात गगराणी यांनी मार्गदर्शन केले. (BMC)

आयुक्त गगराणी यांनी सध्यस्थितीत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांचा आढावा घेत काही काही महत्त्वाच्या सूचनाही उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. नालेस्वच्छतेच्या कामांमध्ये गुणवत्ता आणि पारदर्शकता ठेवा. गाळ काढण्यावर भर देत असतानाच भविष्यात पूरपरिस्थिती उद्भवणार नाही, यासाठी उपाययोजना आखा. मुंबई महानगरातील प्रत्येक लहान-मोठा नाला तसेच मिठी नदीतील कामांचा दैनंदिन आढावा घेतला जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक अभियंत्याने आपाल्याकडे सुरू असलेल्या कामाचे नियोजन करावे. कामांचा टप्पा, त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री आणि हातात असलेला कालावधी या त्रिसूत्रीचा वापर करून पुढील कामांचे नियोजन करा, अशा महत्त्वाच्या सूचना गगराणी यांनी केल्या. (BMC)

(हेही वाचा – मंगेशकर कुटुंबावर टीका क्लेशदायक व लांच्छनास्पद; खासदार Sunil Tatkare यांची तीव्र प्रतिक्रिया)

नालेनिहाय पावसाचे पाणी साचण्याच्या ठिकाणाच्या १०० मीटरच्या त्रिज्येमध्ये जे लहान, मोठे नाले आहेत ते चांगल्या पद्धतीने स्वच्छ होत आहेत की नाही, याचीही पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खात्री करावे. ज्या ठिकाणी पाणी साचते अशा ठिकाणी महानगरपालिकेने पाणी उपसा करण्यासाठी पंप बसविले आहेत. हे पंप पावसाळ्यात बंद पडणार नाहीत, याची खबरदारी घ्या. प्रत्येक पंपासाठी सूक्ष्म नियोजन करून त्या ठिकाणी महानगरपालिकेचा कर्मचारी तैनात करा. तसेच काही मोबाईल पंप हाताशी ठेवा. एखाद्या ठिकाणच्या पंपामध्ये ऐनवेळी बिघाड झाला, तर त्याठिकाणी मोबाईल पंपाद्वारे पाणीउपसा सुरू ठेवता येईल. पंपामध्ये सातत्याने बिघाड झाला तर पंप पुरविणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही गगराणी यांनी दिला. मुंबई महानगरात कामे करताना खूप आव्हानांचा सामना करावा लागतो. मात्र या आव्हानांना तोंड देण्यासाठी अद्ययावत यंत्रणा उपलब्ध आहे. तिचा योग्य वापर करून संकटांचा सामना करा. यंदाच्या पावसाळ्यात जीवितहानी होणार नाही, याबाबत काळजी घेण्याच्या सूचनाही गगराणी यांनी दिल्या. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.