दादर फुल मार्केटमधील चार अनधिकृत गाळ्यांवर कारवाई: गर्दीची कोंडी आता फुटणार का?

139

दादर पश्चिम येथील केशवसूत उड्डाणपुलाखाली फुलबाजारातील भिंतीवर अनधिकृत बांधकाम करून उभारलेल्या गाळ्यांवर महापालिकेने कारवाई केली. या अतिक्रमणामुळे जागा अडवण्याबरोबरच फुलांच्या टोपल्या पुलाखाली अरुंद जागेमध्ये ठेवल्या जात असल्याने याठिकाणी मोठ्याप्रमाणात खरेदी करण्यास येणाऱ्यांची गर्दी होत असे. या गर्दीचा फायदा घेऊन अनेकांचे खिसे हे चोरांकडून साफ केले जात होत आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आल्याने येथील मार्ग मोकळा झाला असून हे अतिक्रमण तोडल्यानंतरही हे फुल विक्रेत या जागेत फूलविक्री करत असल्याने नक्की ही कारवाई करून महापालिकेने काय साधले असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. या कारवाईनंतर फुलविक्रेत्यांमुळे होणारी गर्दींची कोंडी फुटणार का असाही सवाल उपस्थित होत आहे.

( हेही वाचा : संजय राऊतांचे परतणे अनेकांच्या लागले जिव्हारी)

दादर पश्चिम येथील सेनापती बापट मार्गावरील केशव सुत उड्डाणपुलाखाली उपेंद्र नगर इमारतीच्या खालील बाजुस भिंतीवर मार्बल टाकून अनधिकृतपणे गाळे फुल विक्रेत्यांनी बनवले होते. या अनधिकृत गाळ्यांबाबत उपेंद्रनगरमधील रहिवाशांकडून सन २००३मध्ये तक्रार प्राप्त झाली होती. त्यानंतर या फुलविक्रेत्यांनी आपल्याकडील दुकानांचे परवाने दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु हे परवाने २००३मध्येच रद्द झाल्याचे महापालिकेच्या परवाने विभागाने स्पष्ट केले होते. त्यामुळे पुन्हा याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी या सर्व अनधिकृत गाळ्यांवर महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्या परवाने आणि अतिक्रमण विभागाने संयुक्तपणे कारवाई केली.

जी उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार इमारतीचे अधिकृत गाळ्या शेजारी भिंतीमध्ये मार्बलच्या लाद्या टाकून छोट्या आकाराचे गाळे ठेवले होते. या गाळ्यांमधून फुलांची विक्री केली जायची. या गाळ्यांच्या बाहेर लागणाऱ्या टोपल्यांच्या रांगेतच पुढील सर्व गाळेधारक आपली फुले विक्रीसाठी टोपलीमधून ठेवत जागा अडवून बसतात. त्यामुळे पुलाखालून दोन्ही बाजुला फुलविक्रेत बसत असल्याने खरेदीला येणाऱ्या सुरळीत चालता येत नाही. याठिकाणी कायमच गर्दी होत असल्याने या गर्दीचा फायदा घेत अनेकांचे पाकीट मारण्याचे प्रकार घडत असतात. जे चार अनधिकृत गाळे होते, तिथेच बॉटलनेक तयार होत असल्याने रेल्वे स्थानकात जाणारे प्रवासी, फुल विक्रेते आणि खरेदीला येणारे नागरिक यांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे या तोडलेल्या ठिकाणी पुन्हा फुल विक्रेत बसणार नाही याची काळजी महापालिकेच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. त्यांचे परवाने २००३मध्ये रद्द झाल्याने ते बेकायदा व्यवसाय करत होते, त्यामुळे पुन्हा जर ते रस्ता अडवून व्यवसाय करताना दिसल्यास त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल,असा इशाराच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. ही कारवाई येथील रहिवाशांच्या तक्रारीनुसारच करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.