धूळमुक्त मुंबईसाठी पुढील आठवड्यापासून कार्यवाही

142
हवेचा गुणवत्ता स्तर खालावण्याचे स्थितीतील प्रमुख कारणांपैकी एक कारण धूळ हे आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार धूळ नियंत्रणाची कार्यवाही होत असली तरी मुंबई महानगराचे भौगोलिक वैशिष्ट्य आणि गरज लक्षात घेता मुंबई महानगरासाठी महानगरपालिका प्रशासनाची स्वतंत्र प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) असणे आवश्यक आहे. त्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या नियमांच्या अधीन राहून मुंबईतील बांधकामे आणि पाडकामे यातून निर्माण होणाऱ्या धूळ नियंत्रण संदर्भात प्रमाणित कार्यपद्धती तातडीने निश्चित करावी. तसेच याच अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनातील सर्व संबंधित खात्यांचे अधिकारी व सर्व संबंधित भागधारक घटकांची पुढील आठवड्यात कार्यशाळा आयोजित करून धूळ नियंत्रणाची कामे तातडीने मार्गी लागतील असे पहावे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिले आहेत.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मागील काही दिवसांपासून हवामान विषयक कारणांमुळे तसेच सर्वत्र सुरू असलेल्या विविध विकास कामांमधून निर्माण होत असलेल्या धुळीमुळे हवेचा गुणवत्ता स्तर खालावला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  इकबाल सिंह चहल यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका प्रशासनातील विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची ८ मार्च २०२३ रोजी महानगरपालिका मुख्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपायुक्त (पर्यावरण) अतुल पाटील, विशेष कार्य अधिकारी सुनील सरदार यांच्यासह विकास व नियोजन, रस्ते व वाहतूक, यांत्रिकी व विद्युत, घनकचरा व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, बेस्ट उपक्रम इत्यादी खात्यांचे प्रतिनिधी यावेळी  उपस्थित होते.
मुंबईतील बांधकामे आणि पाडकामे यातून निर्माण होणारा कचरा/राडारोडा यावर प्रक्रिया करण्यासाठी पश्चिम उपनगरांकरिता गोराई येथे आणि शहर व पूर्व उपनगरे विभागाकरिता नवी मुंबईमध्ये प्रक्रिया केंद्र उभारले जाणार आहे. या दोन्ही ठिकाणच्या प्रक्रिया केंद्रांची मिळून एकूण क्षमता १,२०० मेट्रिक टन प्रतिदिन इतकी राहणार असून त्यासंदर्भातील कार्यादेश ७ फेब्रुवारी २०२३ रोजी दिले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली.

महापालिका खरेदी करणार नवीन ९ इलेक्ट्रिक झाडू

रस्त्यावरील धूळ हटवून स्वच्छता करण्यासाठी सध्या महानगरपालिकेकडे २७ यांत्रिकी झाडू आहेत. त्याद्वारे दररोज सुमारे २९३ किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता केली जाते. याच धर्तीवर आता नवीन ९ इलेक्ट्रिक झाडू विकत घेण्यात येणार आहेत. प्रत्येक इलेक्ट्रिक झाडूद्वारे दररोज २८ किलोमीटर याप्रमाणे एकूण २५२ किलोमीटर अधिकच्या रस्त्यांची स्वच्छता करणे शक्य होणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.