ऑक्सिजन पुरवठ्याबाबत प्रशासन गंभीर? सहा महिन्यांनी नेमले जातात कंत्राटदार

ऑक्सिजनची गरज असताना प्रशासनाकडून याच्या खरेदीची प्रक्रिया राबवण्यासाठी सात महिन्यांचा कालावधी घेण्यात आला.

75

मुंबईत एका बाजूला ऑक्सिजनची मोठी समस्या निर्माण झालेली असताना, दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या रुग्णालय, प्रसुतीगृहांना ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटाचा कालावधी मागील नोव्हेंबरमध्येच संपुष्टात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, तेव्हापासून त्याच कंपन्यांकडून मनधरणी करत लिक्विड ऑक्सिजनची खरेदी केली जात आहे. आता तब्बल सहा महिन्यांनी या कंत्राटदारांची निवड केली जात असून, त्यामध्ये केवळ रुग्णालये, प्रसुतीगृहांचाच समावेश आहे. परंतु यामध्ये जंबो कोविड सेंटरचा समावेशच नाही.

ऑक्सिजनचा पुरवठा रामभरोसे

मेडिकल ऑक्सिजन आणि नायट्रोजन ऑक्साईडच्या पुरवठ्यासाठी काढलेले यापूर्वीचे कंत्राट नोव्हेंबर २०२० मध्ये संपुष्टात आले आहे. हे कंत्राट संपुष्टात येत असल्याने महापालिकेने ऑक्टोबर २०२० मध्ये निविदा मागवली होती. परंतु अत्यंत तातडीची व आवश्यक बाब असूनही महापालिकेला याची निविदा अंतिम करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला. एका बाजूला रुग्णांचे ऑक्सिजन अभावी मृत्यू झाले, तर काही उपनगरीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा कमी दाबाने पुरवठा झाल्याने अनेक रुग्णांना जंबो कोविड सेंटर आणि अन्य रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले होते. परंतु याच कालावधीत महापालिकेच्या या रुग्णालयांना रामभरोसे ऑक्सिजनचा पुरवठा होत असल्याचे दिसून आले आहे.

(हेही वाचाः मुंबईतील रुग्णसंख्या हजाराच्या आत! मृतांची संख्या ४४)

ऑक्सिजनच्या खरेदीसाठी घेतला सात महिन्यांचा कालावधी

केईएम, नायर, राजावाडी, कुपर आणि इतर रुग्णालये व प्रसुतीगृहांसाठी लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा आणि नायट्रस ऑक्साईडच्या ५ हजार लिटर सिलिंडरचा पुरवठा करण्यासाठी २३ ऑक्टोबर २०२० रोजी निविदा काढण्यात आली. या निविदा २१ डिसेंबर २०२० रोजी उघडण्यात आल्या. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ रोजी याच्या तांत्रिक बाबी तपासण्यात आल्या आणि ८ मे रोजी वाटाघाटी करण्यात आल्यानंतर या निविदा अंतिम करण्यात आल्या आहेत. म्हणजे ऑक्सिजनची गरज असताना प्रशासनाकडून याच्या खरेदीची प्रक्रिया राबवण्यासाठी सात महिन्यांचा कालावधी घेण्यात आला.

३१ कोटी ५१ लाखांचे कंत्राट

कोविडच्या काळात जिथे ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू होत आहोत, याच कालावधीत या कंपन्यांकडून वेळेवर ऑक्सिजनचा पुरवठा झाला नसता, तर त्यांना प्रशासनाला जबाबदार धरता आले असते. परंतु मागील सहा महिन्यांपासून महापालिकेच्या रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करणारा कंत्राटदारच नाही, ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. अखेर आता प्रशासनाने ज्या निविदा अंतिम केल्या त्यामध्ये इनोक्स एअर प्रोजेक्ट लिमिटेड व सतरामदास गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्या पात्र ठरल्या आहेत. या दोन्ही कंपन्यांना ३१ कोटी ५१ लाख रुपयांची कामे विभागून देण्यात आली आहेत.

आज रुग्णांसाठी ऑक्सिजनची प्रमुख गरज आहे. अशा अत्यावश्यक बाबींची खरेदी करताना जर प्रशासन गंभीर नसेल, तर ती दुर्दैवी बाब आहे. पण नोव्हेंबरपासून आपल्याकडे याचा कंत्राटदार नव्हता. आज या कंपन्यांकडून महापालिका मारुन-मुटकून पुरवठा करुन घेत होती. पण त्यांचे कंत्राट संपुष्टात आल्याने त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी निश्चित करुन त्यांना दंड किंवा अन्य कारवाई करता येत नाही. तेच जर कंत्राट चालू असते, तर त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करता येते. परंतु आता हे कंत्राट देतानाही त्यांनी जंबो कोविड सेंटरला वगळले. या जंबो कोविड सेंटरमध्येच सर्वाधिक रुग्ण असून त्यांचाही या कंत्राटात समावेश केला जावा. पण यावरुन जनता त्रस्त आणि महापालिका प्रशासन मस्त, असेच वर्णन करता येईल.

विनोद मिश्रा, महापालिका पक्षनेता, भाजप

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.