…तरीही त्या परीक्षेत महापालिकाच पास!

ऑक्सिजन पुरवठा जर दुसऱ्या दिवशी संपणार असेल तर आदल्या दिवशी संध्याकाळी त्याची कल्पना न देता, काही खासगी रुग्णालये रात्री अकरा ते बारा वाजता ऑक्सिजन संपत असल्याची कल्पना देतात.

80

मुंबईसह राज्यातील अनेक रुग्णालयांना सध्या ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा करण्याबाबत मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या निर्देशानुसार महापालिकेचे अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी यांना समन्वय अधिकारी बनवून, त्या माध्यमातून प्रत्येक रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा वेळेत करण्याचा प्रयत्न होत आहे. पण ऑक्सिजन पुरवठा जर दुसऱ्या दिवशी संपणार असेल तर आदल्या दिवशी संध्याकाळी त्याची कल्पना न देता, काही खासगी रुग्णालये रात्री अकरा ते बारा वाजता ऑक्सिजन संपत असल्याची कल्पना देतात. रात्रीही महापालिकेची सर्व यंत्रणा कामाला लागून ऑक्सिजन उपलब्ध करुन देत आहे. पण जाणीवपूर्वक महापालिकेची परीक्षा घेण्यासाठी काही खासगी रुग्णलयांकडून असे प्रकार होत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले असून, रुग्ण सेवेला वाहून घेणारे महापालिकेचे अधिकारी याही परीक्षेत पास होताना दिसत आहेत.

रात्री अपरात्री रुग्णालयांना येते जाग

काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या चार रुग्णालयांमधील रुग्णांना ऑक्सिजनचा साठा संपल्याने अन्य कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आले होते. त्यानंतर घाटकोपरमधील हिंदू महासभा रुग्णालयामधील ऑक्सिजचा साठा संपल्यानंतर अवघ्या दीड तासांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आला. मात्र, यानंतर सर्व रुग्णालयांना कशाप्रकारे ऑक्सिजनचा पुरवठा करता यावा, यासाठी एसओपी तयार करण्यात आली आहे. तसेच याची जबाबदारी काही ठराविक अधिकाऱ्यांवर दिली आहे. मात्र, मागील तीन ते चार दिवसांपासून अवघ्या काही तासांमध्ये ऑक्सिजनचा साठा संपत असल्याच्या तक्रारी येत आहेत. याची कल्पना कार्यालयीन तासांमध्ये करुन न देता, काही रुग्णालयांचे अधिकारी हे रात्री अपरात्री करुन देत असल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचाः लस तुटवड्याच्या नावाखाली महापालिकेसह सरकारचे ‘दबावतंत्र’?)

अधिका-यांनी सांगितला एका रुग्णलयाचा किस्सा

महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेच तीन दिवसांपूर्वी घडलेला एक किस्सा सांगितला. यामध्ये त्यांनी रुग्णालयाचे नाव न सांगता ते म्हणाले, की परवाच रात्री ११ वाजता फोन आला. म्हणाले साहेब आमचे ऑक्सिजन संपले आहेत. रात्रीची वेळ आणि रुग्णांची चिंता असल्याने तातडीने यंत्रणा कामााला लावली. त्यानुसार आमच्या टिमने ऑक्सिजनचे रिफिलिंग केले. तेव्हा त्यांचे ऑक्सिजन सकाळी दहा वाजेपर्यंत पुरणारे होते. त्यानंतर आम्ही दोन दिवस पुरेल इतके ऑक्सिजन कार्यान्वित करुन दिले. पण त्यांनी रात्रीपासून नगारे वाजवण्यास सुरुवात केली, वास्तविक त्याची गरज नव्हती. कधी कधी लोक उत्साहाच्या भरात असे प्रकार करतात. मग आमचे ऑक्सिजन संपत आले आहेत, असे मेसेज टाकून एकप्रकारे महापालिकेची परीक्षा घेत असतात. ऑक्सिजनचा साठा जर सकाळी दहा वाजता संपणार असेल, तर रात्री ११ वाजताच सांगितले जाते. पण तेच जर आदल्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता सांगितले गेले असते, तर पूर्वनियोजित ते उपलब्ध करुन देता आले असते. मग त्यासाठी ना त्यांची धावपळ झाली असती, ना आमच्या अधिकाऱ्यांची. पण म्हणतात ना व्यक्ती तशी प्रवृत्ती, असं म्हणत अधिकाऱ्यांनी या घटनेकडेही दुर्लक्ष केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.