…आणि हिंदू महासभा रुग्णालयातील ६० जणांचे प्राण वाचले! महापालिका प्रशासनाच्या कामगिरीला सलाम

महापालिकेच्या या संपूर्ण कार्यप्रणालीची भूमिका अतिशय मोलाची असून, त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा बुधवारी दिसून आला.

78

नाशिकमधील रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटमध्ये गळती होऊन २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली असतानाच, बुधवारी घाटकोपर येथील एच. जे. दोशी घाटकोपर हिंदू महासभा या खाजगी रुग्णालयात कोविडबाधित रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू लागली. पण उपायुक्त(आरोग्य) देविदास क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली एन विभागाचे सहाय्यक आयुक्त अजित कुमार आंबी यांनीही प्रशासनाच्यावतीने तातडीने ऑक्सिजन पुरवठा केला. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्व ६० रुग्णांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. ऑक्सिजन बेडवर असलेले सर्व रुग्ण सुरक्षित आहेत.

प्रशासनाची असामान्य कामगिरी

एच. जे. दोशी घाटकोपर हिंदू महासभा रुग्णालयात एकूण ६१ कोविडबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये ५० जणांना ऑक्सिजन पुरवला जात आहे, तर ११ रुग्ण जीवरक्षक प्रणाली(व्हेंटिलेटर)वर आहेत. सायंकाळी ६.३० पर्यंत पुरेल, इतकाच प्राणवायू साठा रुग्णालयांमध्ये उपलब्ध असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने, सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास महानगरपालिकेला कळवली. त्यानंतर महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या सूचनेनुसार, अतिरिक्त आयुक्त(पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या निर्देशानुसार, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) देविदास क्षीरसागर, एन विभागाचे सहाय्यक आयुक्त अजित आंबी, वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) महेंद्र खंदाडे ह्यांनी तातडीने समन्वय साधून, या रुग्णालयात वेळीच ऑक्सिजनचा साठा पोहोचवला.

(हेही वाचाः मुलुंडच्या जंबो कोविड सेंटरमध्ये ३५ आयसीयू बेड वाढणार!)

असे काम करत आहे महापालिकेची यंत्रणा

मुंबईतील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा साठा पुरेसा उपलब्ध राहील, विशेषतः कोविडबाधित रुग्णांना प्राणवायू अभावी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाने प्रशासनाने अन्न व औषध प्रशासन, तसेच प्राणवायू पुरवठादार यांच्याशी समन्वय राखण्यासाठी सहा समन्वय अधिकाऱ्यांची चोवीस तास नियुक्ती केली आहे. तसेच महानगरपालिकेने नेमलेली पथके प्राणवायूचे उत्पादन ते वितरण होईपर्यंतच्या साखळीवर लक्ष ठेवून आहेत. या संपूर्ण कार्यप्रणालीची भूमिका अतिशय मोलाची असून, त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा बुधवारी दिसून आला.

कार्यतत्परतेला सलाम

महानगरपालिकेच्या एस विभागातून ९ जंबो सिलेंडर या रुग्णालयात सायंकाळी ६.१५ वाजता पोहचले. त्या व्यतिरिक्त रुग्णालयाच्या नियमित प्राणवायू पुरवठादाराने ४ ड्युरा सिलेंडर रुग्णालयात सायंकाळी ६.१५ च्या सुमारास पोहोचवले. ते जोडून त्वरित प्राणवायू पुरवठा सुरळीत राखला गेला. त्यासोबत ‘एन’ विभागातून देखील १५ जंबो सिलेंडर बॅकअप म्हणून त्वरित पाठवण्यात आले. एवढेच नव्हे तर, रुग्णांना स्थलांतरित करण्याची गरज भासली, तर त्यासाठी रुग्णवाहिका देखील सुसज्ज ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, सुदैवाने आणि महानगरपालिका प्रशासनाच्या तत्परतेमुळे त्याची आवश्यकता भासली नाही. हिंदू महासभा रुग्णालयातील सर्व रुग्ण सुरक्षित आहेत.

(हेही वाचाः आता डॉक्टर- नगरसेवकांमध्ये होऊ लागली ‘तू तू- मैं मैं’!)

हिंदू महासभा रुग्णालय येथील प्राणवायू पुरवठा संदर्भात भविष्यात कोणतीही अडचण उद्भवू नये म्हणून, रुग्णालयाच्या परिसरात ऑक्सिजन व्यवस्था उभी करण्याबाबत ‘एन’ विभागाचे सहाय्यक आयुक्त अजित कुमार आंबी यांच्या कार्यालयात गुरुवारी या रुग्णालयाच्या व्यवस्थापनासमवेत तातडीची बैठक देखील होणार आहे, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.