सार्वजनिक गणेशोत्सवाच्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करणे बंधनकारक केल्याने आता यासाठीच्या कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्याकडे अधिक भर दिला जाणार आहे. मागील गणेशोत्सवामध्ये संपूर्ण मुंबईमध्ये ८८ कृत्रिम तलावांची निर्मिती करणाऱ्या महापालिकेने यंदा १५० हून अधिक कृत्रिम तलावांचे लक्ष्य ठेवले आहे.
पुढील वर्षी म्हणजेच २०२३ च्या गणेशोत्सवापासून मुंबईत ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या गणेश मूर्त्यांवर पूर्णतः प्रतिबंध असल्याने शाडू मातीसारख्या पर्यावरणपूरक घटकांपासून तयार केलेल्या गणेश मूर्तींचीच खरेदी–विक्री करणे महापालिकेने बंधनकारक केले होते. परंतु यंदाच्या वर्षी काही प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची खरेदी तथा विक्री करण्यास परवानगी दिली आहे.
पीओपी मूर्त्यांचे विसर्जन कृत्रिम तलावांतच
त्यामुळे अशा ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’पासून तयार करण्यात आलेल्या घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन हे कृत्रिम तलावातच करणे बंधनकारक असेल. तसेच या मूर्तींवर ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ असे ठळकपणे नमूद करणेही बंधनकारक करण्यात आले होते. जेणेकरुन विसर्जन व्यवस्थेत असणा-यांना ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ची श्री गणेश मूर्ती ओळखणे सुलभ होईल, अशी माहिती महापालिकेने प्रसिध्द केली होती.
(हेही वाचाः आतापर्यंत मुंबईतील १ हजार ५६२ सार्वजनिक मंडळांना गणेशोत्सवासाठी परवानगी)
उपायुक्तांचे निर्देश
या गणेशोत्सवासाठी समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तींचे विसर्जन होऊ नये यासाठी मागील वर्षीच्या तुलनेत अधिक प्रमाणात कृत्रिम तलावांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या २४ विभागांमध्ये कृत्रिम तलावे अधिक प्रमाणात कशाप्रकारे बनवता येतील, यासाठी जागेचा शोध घेऊन त्याप्रमाणे निर्माण करण्यात याव्यात अशाप्रकारचे निर्देश परिमंडळ–२ चे उपायुक्त तथा गणेशोत्सव समन्वयक हर्षद काळे यांनी दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक विभागांमध्ये अधिक प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असून ही संख्या दीडशे पर्यंत असेल, असे बोलले जात आहे.
परिमंडळ–२ चे उपायुक्त तथा गणेशोत्सव समन्वयक’ हर्षद काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मागील वर्षी ८८ कृत्रिम तलावे निर्माण केली होती, त्यामुळे तेवढी तर संख्या राहिलंच असे म्हटले आहे. शिवाय प्रत्येक विभाग कार्यालयांना विसर्जन स्थळे अधिक प्रमाणात निर्माण करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याप्रमाणे कृत्रिम तलावांच्या संख्येत वाढ होईल. ही संख्या १५० पर्यंत नेण्याचा महापालिकेचा निर्धार आहे. त्यामुळे लवकरच याबाबतची संख्या निश्चित करून भक्तांना विसर्जनाची सुविधा घराच्या अगदी जवळ करून देण्याचा प्रयत्न केला जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community