BMC : सहायक आयुक्तांकडे प्रभारी उपायुक्तपदाचा भार, पण होतेय विभाग कार्यालयांकडे दुर्लक्ष

1742
BMC अतिरिक्त आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांची प्रतिनियुक्ती नोव्हेंबर २०२९ पर्यंत?
BMC अतिरिक्त आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांची प्रतिनियुक्ती नोव्हेंबर २०२९ पर्यंत?

मुंबई महापालिकेतील (BMC) सहआयुक्त तथा उपायुक्त हे नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त जागी वरिष्ठ सहायक आयुक्तांना बढती देण्यात येत आहे. मात्र, सहायक आयुक्तांना प्रभारी उपायुक्त म्हणून बढती देण्यात येत असली तरी सहायक आयुक्त आणि उपायुक्त या दोन्ही पदांचा भार सांभाळताना सहायक आयुक्तांना तारेवरील कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सहायक आयुक्त पदाचा भार एका विभागात आणि उपायुक्त पदाचे कार्यालय उलट बाजुला अशाप्रकारचे चित्र असल्याने सहायक आयुक्तांचा कल उपायुक्त पदाचा भार सांभाळण्याकडे अधिक असल्याने या सहायक आयुक्तांचे विभागाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. दुपारनंतर सहायक आयुक्तांचे दर्शन विभाग कार्यालयांत होत नसल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. (BMC)

मुंबई महापालिकेतील एम पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे आणि पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर हे उपायुक्त पदासाठी पात्र ठरले असून या अधिकाऱ्यांना सध्या पूर्णवेळ या पदी नियुक्ती करण्यात न येता त्यांच्याकडे या पदाचा प्रभारी भार सोपवण्यात आला आहे. मोटे यांच्याकडे एम पश्चिम विभागाच्या सहायक आयुक्त पदासह परिमंडळ तीनच्या प्रभारी उपायुक्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मोटे सहायक आयुक्त असलेल्या एम पश्चिम विभागाचे कार्यालय चेंबूर येथे असून परिमंडळ ३चे कार्यालय हे अंधेरी पूर्व येथे आहे. (BMC)

(हेही वाचा – एका कुटुंबातील किती महिलांना मिळणार Ladki Bahin Yojana चा लाभ; वाचा काय आहेत निकष…)

अशाप्रकारे करावी लागते तारेवरील कसरत

तर किरण दिघावकर हे पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त असून त्यांच्याकडे प्रभारी उपायुक्त विशेष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दिघावकर यांचे पी उत्तर विभागाचे कार्यालय मालाड येथे असून उपायुक्त विशेष यांचे कार्यालय महापालिका मुख्यालयात आहे. तर ३० जून रोजी सेवा निवृत्त झालेले परिमंडळ सहाचे रमाकांत बिरादर यांच्या जागी प्रभारी उपायुक्त म्हणून सहायक आयुक्त संतोष धोंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर धोंडे यांच्याकडे बी विभागाच्या सहायक आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. बी विभागाचे कार्यालय हे जे जे रुग्णालयासमोर असून उपायुक्त परिमंडळ सहाचे कार्यालय घाटकोपर पूर्व येथे आहे. (BMC)

याबरोबरच एच पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते यांच्याकडे सहायक आयुक्त (मालमत्ता) पदाचा प्रभारी कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे एच पश्चिम विभागाचे कार्यालय हे खार पश्चिम येथे असून सहायक आयुक्त (मालमत्ता) यांचे कार्यालय महापालिका मुख्यालयात आहे. त्यामुळे तीन सहायक आयुक्तांकडे प्रभारी उपायुक्तांचा भार सोपवल्यामुळे त्यांचे आता विभागात लक्ष कमी झाले असून अधिक काळ उपायुक्त पदाचा कार्यभार सांभाळण्याकडेच लक्ष देत असतात. तसेच विसपुते हेही निम्म्यापेक्षा जास्त काळ सहायक आयुक्त (मालमत्ता) विभागाला देत असल्याने विभागांमध्ये त्यांचे लक्ष कमी होत आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रांत विभागांत आणि दुपारच्या सत्रांत उपायुक्त पदाचा भार अशाप्रकारे तारेवरील कसरत करावी लागत आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात या दुहेरी जबाबदारीचा परिणाम विभागांतील नागरी सुविधा कामांवर होणार नसून अशा सहायक आयुक्तांना जवळच्या विभागांची जबाबदारी देऊन दोन्ही पदांचा भार त्यांना योग्यप्रकारे हाताळता येईल आणि लक्षही देता येईल अशाप्रकारे नियोजन करण्याची गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात महापालिका प्रशासनात या नियोजनाचा अभाव दिसत असून दुपारनंतर विभाग कार्यालयात सहायक आयुक्तांच्या भेटीच होत नसल्याने नागरिकांकडून स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली जात आहे. विभाग कार्यालयात कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता यांच्या भेटी होत असल्या तरी प्रत्यक्षात विभागाचे सहायक आयुक्तांच्या भेटी होत नसल्याने तसेच त्यांच्याकडे तक्रार करता येत नसल्याने कैफियत मांडायची तरी कुठे असा प्रश्न जनतेला पडला आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.