BMC : जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र आता मिळणार ऑनलाईन, मेलवर मिळू शकतात ही प्रमाणपत्रे

2873
BMC : सोमवारची सुट्टी बदलल्याने रजेवर गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांपुढे मोठा पेच
BMC : सोमवारची सुट्टी बदलल्याने रजेवर गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांपुढे मोठा पेच

मुंबईकरांना जन्म व मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र पुरवता यावेत, या हेतुने मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून (BMC) शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. त्यादृष्टीकोनातून सुधारित व अद्ययावत नागरी नोंदणी प्रणाली लवकरच कार्यान्वित होणार असून यामुळे नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने तसेच सहज, सुलभपणे जन्म व मृत्यू प्रमाणपत्र उपलब्ध होऊ शकणार आहेत. ज्यामुळे २४ जून २०२४ नंतर जन्म-मृत्यू झालेल्या व्यक्तींची नोंद करतांना, नागरिकांनी त्यांचा अचूक ई-मेल आयडी अर्जासोबत नमूद केल्यास त्यावरही याचे प्रमाणपत्र मिळू शकणार आहे.

जूनपासून करण्यात येत आहे नागरी नोंदणी प्रणालीत सुधारणा

मुंबईतील जन्म-मृत्यू नोंदणीकरीता केंद्र शासनाच्या अधिपत्याखालील नागरी नोंदणी प्रणालीचा अवलंब करण्यात येतो. ही प्रणाली सुधारित आणि अद्ययावत करण्याची कार्यवाही भारताचे महाप्रबंधक तथा जनगणना आयुक्त कार्यालयाकडून सुरु आहे. मुंबईतील जन्म-मृत्यू नोंदणीकरिता, महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्देशाने दिनांक १ जानेवारी २०१६ पासून नागरी नोंदणी प्रणाली चा अवलंब करण्यात आला आहे. भारताचे महाप्रबंधक तथा जनगणना आयुक्त कार्यालयाकडून नागरी नोंदणी प्रणालीमध्ये २४ जून २०२४ पासून सुधारणा करण्यात येत आहेत. नागरिकांना सहज, सुलभ व वेगाने प्रमाणपत्र देता यावेत, यासाठी अद्ययावत वैशिष्ट्यांचा त्यामध्ये समावेश करण्यात येत आहे. (BMC)

(हेही वाचा – Hawkers : पहिल्या टप्प्यात मुंबईतील २० ठिकाणे फेरीवालामुक्त; रेल्वे स्थानकांसह लांबच्या परिसरांचाही समावेश)

या कारणामुळे मिळत नाही प्रमाणपत्रे

या नवीन सुधारणांसाठी सद्यस्थितीत होत असलेल्या तांत्रिक कामकाजामुळे या प्रणालीतून जन्म-मृत्यू प्रमाणपत्र प्राप्त करतांना नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. पूर्वी नागरी सुविधा केंद्र (सीएफसी) मध्ये नागरिकांना जन्म-मृत्यू प्रमाणपत्र प्राप्त होत होती. सद्यस्थितीत सुधारित नागरी नोंदणी प्रणालीविषयक अद्ययावतीकरण सुरु असल्याने नागरी सुविधा केंद्रामध्ये जन्म-मृत्यू प्रमाणपत्र नागरिकांना मिळत नाहीत.

महापालिकेच्या माध्यमातून सुरु आहे पाठपुरावा

एकूणच, नागरी नोंदणी प्रणालीमध्ये केंद्र शासनाच्या अखत्यारितील महाप्रबंधक तथा जनगणना आयुक्त यांच्या निर्देशाने सुधारणा होत असल्याची बाब लक्षात घेता, नागरिकांना जन्म-मृत्यू प्रमाणपत्र कसे प्रदान करावेत, सुधारित व अद्ययावत प्रणाली पूर्ण क्षमतेने खुली होताच लवकरात लवकर महानगरपालिका प्रशासनाला (BMC) त्यातून कामकाजाची सुविधा मिळवून द्यावी, आदी बाबींसाठी महानगरपालिकेमार्फत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.

(हेही वाचा – Manholes : मालाड, गोरेगावमध्ये ३८ ठिकाणी मलवाहिनी झाली खराब, उघड्यावर वाहतो मल)

आपल्या ई-मेलवर मिळेल जन्म मृत्यू प्रमाणपत्र

याठिकाणी प्रकर्षाने नमूद करण्यात येते की, २४ जून २०२४ नंतर जन्म-मृत्यू झालेल्या व्यक्तींची नोंद करतांना, नागरिकांनी त्यांचा अचूक ई-मेल आयडी अर्जासोबत नमूद केल्यास महानगरपालिका विभाग कार्यालयांमधील (वॉर्ड) वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत त्यांनी दिलेल्या ई-मेल आयडीवर जन्म-मृत्यू प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात येतील.

नागरिकांना नोंदणी कार्यालयाला भेट देण्याची भासणार नाही गरज

सुधारित व अद्ययावत नागरी नोंदणी प्रणालीमध्ये नागरिकांना जन्म-मृत्यू प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. ज्यामुळे नागरिकांना नोंदणी कार्यालयास भेट देण्याची गरज भासणार नाही. ही सुविधा नागरिकांच्या अत्यंत सोयीची आणि पारदर्शक राहणार आहे. तसेच, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र नोंदणीस विलंब होणार नाही. लवकरच सुधारित नागरी नोंदणी प्रणाली उपलब्ध होणार असल्याचे संबंधितांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ही प्रणाली पूर्ण क्षमतेने उपलब्ध होईपर्यंत नागरिकांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन महापालिकेने (BMC) केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.