BMC : महापालिकेत भूसंपादन विभागाने अडवली जागा, पेन्शन विभागाची जागेसाठी धडपड

1416
BMC : महापालिकेत भूसंपादन विभागाने अडवली जागा, पेन्शन विभागाची जागेसाठी धडपड
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महापालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनसह इतर सर्व सेवा निवृत्तीचे फायदे मिळावे म्हणून पेन्शन विभाग कार्यरत असून या विभागाचे कार्यालय भायखळा ई विभागातील कार्यालयातून महापालिका मुख्यालयात हलविण्यात आले. परंतु पेन्शन विभागाच्या कार्यालयासाठी दिलेली ही जागा अपुरी असून आजही यातील कर्मचाऱ्यांना बसण्यास आणि दस्तावेज ठेवण्यास कमी पडत आहे. त्यामुळे या पेन्शन कार्यालयाला मुख्यालयात प्रशस्त जागा देणे आवश्यक असतानाच मुख्यालयात भूसंपादन विभागाने अनावश्यकपणे कार्यालय अडवून ठेवले आहे. त्यामुळे भूसंपादन विभागाचे कार्यालय अन्यठिकाणी स्थलांतरित करून त्या जागेचा वापर पेन्शन विभागासाठी करणे आवश्यक असतानाही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. (BMC)

मुंबई महापालिका मुख्यालय जुन्या इमारतीचे नुतनीकरण करताना तळ मजल्यावर असलेले पेन्शन विभागाचे कार्यालय भायखळा ई विभागात स्थलांतरीत करण्यात आले होते. परंतु ई विभागात पेन्शन कार्यालय असल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत होती. भायखळा रेल्वे स्थानक ते भायखळा ई विभाग कार्यालयाचे अंतर जास्त असल्याने कर्मचाऱ्यांना रस्ता ओलांडून जाणे जिकरीचे बनत होते, तसेच यामुळे त्यांना अपघात होण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे हे कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील महापालिका मुख्यालय इमारतीतील पेन्शन विभागाचे कार्यालय आणले जावे अशी मागणी होती. (BMC)

(हेही वाचा – Nana Patole आमचे मित्र; मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वक्तव्याने संशयकल्लोळ)

त्यानुसार काही महिन्यांपूर्वी महापालिका विस्तारीत इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पेन्शन विभागाचे कार्यालय स्थलांतरीत करण्यात आले. परंतु पेन्शन विभागासाठी दिलेल्या कार्यालयाची जागा अपुरी असून या विभागाकडून अधिक जागेची मागणी करूनही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महापालिका मुख्यालयातील जुन्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील मोठी जागा भूसंपादन विभागाला दिलेली आहे. या भूसंपादन विभागाच्यावतीने कार्यालयाची जागा अडवली गेली असून प्रत्यक्षात या विभागाला शहर, पूर्व उपनगर किंवा पश्चिम उपनगरांतील इमारत प्रस्ताव व विकास नियोजन विभाग कार्यालयात जागा दिली जावू शकते किंवा या विभागाच्यावतीने धरणांची जागा हस्तांतरीत करण्याचे काम होत असल्याने त्यांना जलअभियंता विभागाच्या अखत्यारित कुठेही जागा उपलब्ध करून दिली जाऊ शकते. (BMC)

परंतु या भूसंपादन विभागाकडून मुख्यालयातील जागा तसेच वाहनतळ प्राधिकरणाकडून त्या शेजारील सभागृहाची जागा अडवली गेल्याने या दोन्ही जागांचा वापर पेन्शन विभागाच्या कार्यालयासाठी उपलब्ध करून दिल्यास या विभागाला पुरेशी जागा उपलब्ध होऊ शकते. वाहनतळ प्राधिकरणासाठी वरळी हब येथील इमारतीत जागा उपलब्ध करून दिली जावू शकते. परंतु, महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने या विभागातील कर्मचाऱ्यांनी काम करावे तरी कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांना बसण्यास पुरेशी जागा असेल आणि त्यांचे जुने दस्तावेज ठेवण्यास जागा असेल तरच निवृत्त कर्मचाऱ्यांचे दावे निकालात काढण्यात यश येईल. परंतु प्रशासनाला निवृत्त कर्मचाऱ्यांचे दावे वेळीच निकालात निघावे अशी इच्छा दिसत नाही असेच दिसून येत आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.