BMC Budget 2023-24: महापालिका शाळांमधील विद्यार्थी बनणार स्वावलंबी: विद्यार्थ्यांना मिळणार कौशल्य विकासाचे धडे

163

मुंबई महापालिकेच्या शाळांमधून  कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, पुढील शैक्षणिक वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक्स, कृत्रिम बुध्दीमत्ता (Artificial Intelligance) पोशाख (Apparel) / फॅशन डिझायनिंग, कोडिंग, रोबोटिक्स, ऑटोमोबाईल, पर्यटन आणि आदरातिथ्य (Tourism and hospitality) हे कौशल्य विकास अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे.  महानगरपालिकेच्या २४९ माध्यमिक शाळांमधील इयत्ता ९ वी ते इयत्ता १० वी तील ४१ हजार ७७४ एवढ्या विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याकरिता सर्व विकास केंद्रांमध्ये योग्य समन्वय ठेवण्याकरिता जगन्नाथ शंकरशेठ माध्यमिक शाळा मध्यवर्ती कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येईल अशी माहिती अर्थसंकल्पानंतर माध्यमांशी बोलताना प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी दिली.

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा सन २०२३-२४ चा३३४७. १३ कोटींचा अंदाजपत्रक अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यानी प्रशासक इक्बालसिंह चहल यांना सादर केला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा, अतिरिक्त आयुक्त प्रकल्प पी वेलरासू, अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, महापालिका सचिव संगीता शर्मा आदींसह सर्व सहआयुक्त, सहायक आयुक्त, विभाग प्रमुख तसेच लेखा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 मुख्याध्यापकांना नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण

‘जमनालाल बजाज इस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट’ या प्रतिष्ठित संस्थेमार्फत महानगरपालिका शाळांतील एकूण १२० मुख्याध्यापकांना “नेतृत्व कौशल्य” या विषयाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. भविष्यात आवश्यकतेनुसार गुणवत्ता वाढीसाठी अशा प्रकारची प्रशिक्षणे देण्यात येतील, असे नमुद केले आहे.

कौशल्य विकास केंद्र

महानगरपालिकेच्या सर्व माध्यमिक शाळांमध्ये “कौशल्य विकास केंद्र” स्थापन करण्याकरिता महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS), महानगरपालिका, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये १३ डिसेंबर २०२२ रोजी सामंजस्य करार झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांनुसार, शालेय जीवनातच विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना त्यांच्या परिसरातील उद्योगधंद्यात सहजतेने रोजगार उपलब्ध होण्यासाठी सहाय्यभूत ठरेल, अशा सध्या मागणी असलेल्या अभ्यासक्रमाचे कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे प्रशासकांनी स्पष्ट केले आहे. हा उपक्रम येत्या सन २०२३-२४ या आर्थिक वर्षापासून राबविण्यात येणार आहे, असे सांगितले. यासाठी अर्थसंकल्पात २८.४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांकरीता साहित्य खरेदी

महानगरपालिकेच्या शाळांतील दिव्यांग विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्याअनुषंगाने निदान केले जाते. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार विविध प्रकारच्या उपचारपध्दती वापरल्या जातात. फिजीओ, स्पीच व ऑक्युपेशनल थेरेपी इ. याकरीता( Stress Relief Squishy Balt Space Tunnel Tent. Pop Up Crawl Tunnel, Jumbo Ball Pool with 10 Soft Colourful Ball Pits, Hand and Eye Coordination, CP Woode Chair )इत्यादी आवश्यक साहित्यांची खरेदी करुन शाळांना उपलब्ध करुन देण्यात येणार असून त्यांचा वापर उपचार पध्दतीमध्ये करण्यात येईल.

सी. सी. टी.व्ही. कॅमेरे

महानगरपालिका शाळांतील विद्यार्थी, शिक्षक, शालेय परिसर आणि इतर सुविधा सुरक्षित ठेवण्यासाठी महानगरपालिकेतील सर्व शालेय इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया कार्यकारी अभियंता (यांत्रिक व विद्युत) विभागामार्फत प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार ची नेमणूक केली जात आहे. यासाठीही अर्थसंकल्पात १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे

डिजीटल क्लासरुम

महानगरपालिकेच्या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा एक अभिनव प्रयत्न म्हणून, अभ्यासक्रमाची पाठपुस्तके, अभ्यासक्रमावर आधारित विविध चाचण्या, सराव चाचण्यांची सुविधा, लॉग तयार करणे, काय शिकविले जाते आणि विद्यार्थ्यांकडून कोणता गृहपाठ / सराव चाचण्या सोडविल्या जातात याचा पध्दतशीर डेटाबेस इत्यादी बाबी LED स्मार्ट बोर्ड मध्ये अतिशय मनोरंजक आणि परस्पर संवादी पध्दतीने उपलब्ध करुन देणे हा वर्गखोल्यांमध्ये इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शनसह डिजीटल स्मार्ट बोर्ड पुरविण्याचा उद्देश आहे. हे उद्दिष्ट साधण्यासाठी डिजीटल वर्गांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये ७९३४ वर्ग आहेत.

( हेही वाचा: मुंबई महापालिकेचा ५२,६१९ कोटींचा अर्थसंकल्प: यंदाही १४ टक्क्यांनी वाढ )

महापालिका शाळांमधील १३०० वर्ग होणार डिजिटल

२०१८-१९ मध्ये १२१४ वर्गांना प्रोजेक्टर आणि संगणकीय उपकरणे: डिजीटल वर्ग बनविण्यात आले.  आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये नविन व तंत्रज्ञान आल्याने १३०० वर्गाना LED interactive panels वापरुन  बनविण्यात आले. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये आणखी १३००  डिजीटल वर्गांचे रुपांतर करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी २०२२-२३ च्या सुधारित अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये १२८.८१ कोटी आणि २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात १२ कोटी  रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे.

पश्चिम उपनगरातील मधील आर/दक्षिण विभागामधील एम. जी. रोड महानगरपालिक शाळा, कांदीवली (पश्चिम) येथे शाळा पायाभूत सुविधा कक्षामार्फत क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. ५४ खगोलशास्त्रीय प्रयोगशाळांची आवश्यक त्या साहित्यांसह उभारणी करण्याची प्रक्रिया सुरु असून ती सन २०२३-२४ मध्ये पूर्ण होईल. सन २०२३ २४ मध्ये महानगरपालिकेच्या ३९१ शालेय इमारतीत ३,६५४  जेलफोम फायर स्प्रे (५०० मि.ली.) बसविण्यात येणार आहेत. सन २०२३-२४ मध्ये ११२ संगणक प्रयोगशाळांची दर्जोन्नती तसेच ३८ संगणक संचाची खरेदी करण्यात येणार असल्याचेही प्रशासकांनी स्पष्ट केले.

शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी  सुविधांचया खर्चात प्रत्येक वर्षी होणारी वाढ आणि शिक्षण खात्यातून मिळणारे उत्पन्न यातील तफावत लक्षात घेता महापालिकेच्या शालेय इमारतीवर जाहिराती, बॅनर, होर्डींग्स उभारणे, वर्ग खोल्या अभ्यासिका, वाचनालय, खासगी क्लासेसना भाडे तत्वावर उपलब्ध करून देणे, तसेच शाळेलगतची मैदाने खासगी संस्थांना क्रीडा संस्थांना स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांकरता भाडेतत्वावर देण्याचा शिक्षण विभागाचा मानस असल्याचेही अर्थसंकल्पात नमुद करण्यात आले आहे.

प्राथमिक विभागाकरीता १०,३४२ डेस्क-चेअर्स व माध्यमिक विभागाकरीता ५.२६७ डेस्क-चेअर्सचा पुरवठा करण्यात येणार आहे. सन २०२३ २४ मध्ये महानगरपालिकेच्या ५० प्राथमिक शाळांमध्ये ई- वाचनालय सुरु करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.