मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावर लोकप्रतिनिधींचे काय म्हणणे, जाणून घ्या

177

मुंबई महापालिकेचा सन २०२३-२४चा अर्थसंकल्प जाहीर झाला. अतिरिक्त आयुक्त पी. वेलरसु यांनी ५२,६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त व प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना सादर केला. आरोग्य, पर्यावरण, रस्ते, शिक्षण आदीसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली असून या अर्थसंकल्पावर महापालिकेच्या माजी नेत्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

( हेही वाचा : वीरपत्नी यशोदा गणेश सावरकर यांची ‘आत्मनिष्ठ युवती समाज’ संघटना )

अशाप्रकारे आहेत प्रतिक्रिया…

आरोग्यमय अर्थसंकल्प

मुंबई महापालिकेचा सन २०२३-२४चा सादर केलेला हा अंदाजित अर्थसंकल्प आरोग्यमय असा आहे. यामध्ये वयाची तिशी पार केलेल्या व्यक्तींचा विचार करत मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा आजाराचे निदान घरोघरी जावून तपासणी करून भविष्यात यापासून मोठ्याप्रकाराचे आजार उद्भवू नये यासाठी प्रयत्न केला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेच्या आरोग्याचा विचार करून ज्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार योजना जाहीर केली आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात ३०वर्षांवरील जनतेचे आरोग्य ठणठणीत राखण्याचा प्रयत्न केला जाईल.

मुंबईकरांच्या आरोग्याचा दुसऱ्या बाजुनेही विचार करण्यात आला आहे. आज बदलत्या वातावरणामुळे आणि पर्यावरणातील बदलाला वायू आणि हवेचेही प्रदुषण कारणीभूत आहे. त्यामुळे राज्याचे माननीय मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार मुंबईचा प्रदुषण नियंत्रण कृती योजना जाहीर करण्यात आली आली आहे. याअंतर्गत मुंबई स्वच्छा हवा कार्यक्रम, धुळ मुक्त मुंबईच्या दृष्टीकोनातून बांधकाम प्रकल्प, कचरा, आदींकरता मार्गदर्शक तत्वे जाहीर करतानाच इलेक्ट्रिक बसेस आणि झाडे लावून पर्यावरणाचा समतोल राखत एकप्रकारे मुंबईकरांना प्रदुषणामुळे होणाऱ्या आजारांपासून मुक्ती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याशिवाय महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या गोरगरीब मुलांना स्वयंरोजगराच्या दृष्टीकोनातून कौशल्य विकासाचा अभ्यास देऊन एकप्रकारे स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. चालू आर्थिक वर्षात म्हणजे सन २०२२ -२३चा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष म्हणून मी मंजूर करतात ज्या ज्या सूचना आणि विकासकामे होत्या, त्या सर्व कामांसाठी भरीव निधीची तरतूद केली आहे, तसेच चालू प्रकल्पांना गती देण्याचाही प्रयत्न केला जात आहे. याचा मला विशेष आनंद होत आहे.
यशवंत जाधव, माजी अध्यक्ष, स्थायी समिती

फुगवलेला अर्थसंकल्प..

थोडक्यात हा फुगवलेला अर्थसंकल्प आहे. वास्तववादी अर्थसंकल्प नसून मुंबईकरांची घोर निराशा केली आहे. महापालिकेने महसूल वाढवण्यासाठी आणि अनावश्यक खर्चाला आळा घालण्यासाठी योजना आखल्या पाहिजेत. कमी होत असलेला महसूल वाढवण्यासाठी बजेटमध्ये कोणतीही योजना नाही आणि ते महापालिकेच्या मुदत ठेवी ते संपवतील. जरी ८८ हजार कोटींच्या मुदत ठेवींचा आकडा कागदावर प्रभावी दिसत असला तरी बहुतांश ठेवी या पीएफ आणि कर्मचार्‍यांच्या ग्रॅच्युइटीच्या आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या महापालिकेकडे २० हजार कोटींच्या मुदत ठेवी आहेत आणि त्यापैकी १५ हजार कोटी वापरण्याची प्रशासनाची योजना आहे. त्यामुळे लवकरच महापालिकेकंदील पैसे संपणार आहेत आणि विशेषत: कोणत्याही आकस्मिक परिस्थितीला मदत करण्यासाठी त्यांच्याकडे निधी नसेल.
रवी राजा, माजी विरोधी पक्षनेते, मुंबई महानगरपालिका

कंत्राटदारांचे नव्हे, मुंबईकरांचे बजेट

गेल्या पंचवीस वर्षात कंत्राटदार सांगेल तीच कामे, आणि कंत्राटदार सांगेल तेच बजेट असे जे चित्र होते ते आज अखेर बदलले आहे. मुंबई महापालिकेचा यावर्षीचा अर्थसंकल्प मुंबईकरांच्या मागण्या , अपेक्षा मागवून त्यानुसार तयार करण्यात आला आहे. त्यामुळे हे बजेट कट कमिशन आणि कंत्राटदारांचे नसुन मुंबईकरांचे आहे.

मुंबईतील हवा प्रदूषण धोक्याची पातळी ओलांडून गेले आहे त्यामुळे याबाबत तातडीने उपाय योजना करा, अशी विनंती मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही केली होती त्यानुसार त्यांनी तातडीने पालिका आयुक्तांना सुचना केल्या होत्या. त्यामुळे यावेळी प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी अर्थसंकल्पात तब्बल १५०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली त्याचे आम्ही स्वागत करतो. मुंबईकरांना चालण्यासाठी फुटपाथ देणे ही पालिकेची जबाबदारी मान्य करुन 9 मिटर पेक्षा मोठ्या प्रत्येक रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथ देण्याची भूमिका पालिकेने घेतली त्याचे मुंबईकरांच्यावतीने स्वागतच.

नवे संकल्प केलेले नाहीत त्यामुळे काही अपेक्षा आमच्या अजूनच्या होत्या. पण करवाढ मुंबईकरांवर लादली नाही. रस्ते, आरोग्य, कोस्टलरोड, मलजल नित्सारण,अशा पायाभूत सेवा सुविधांसाठी केलेली तरतूद ही जमेची बाजू आहे. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तृतीय पंथीय यांचा संवेदनशीलपणे अर्थसंकल्पात विचार केला गेला आहे.
ऍड आशिष शेलार,आमदार व अध्यक्ष मुंबई भाजप

मुंबईकरांचे नुकसान न करता, लोकशाही मुल्यांची जपणूक करा-

आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प असून मुंबईकरांना या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे फुगीर आश्वासन देऊन मुंबईकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. सदयस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासकांमार्फत लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता एवढा मोठा अर्थसंकल्प कमी वेळेत मांडून ऐतिहासितक विक्रम केला आहे. मागील योजनांची अंमलबजावणीची तरतूद पूर्णपणे करण्यामध्ये प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे त्याच योजनांचा यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये समावेश करण्यात आला आहे. प्रामुख्याने पुन्हा त्याच योजना पुन्हा अर्थसंकल्पामध्ये दाखवून मुंबईकर जनतेचे नुकसान करण्याचे प्रशासकांचे धोरण यशस्वी झाले आहे असे दिसून येत आहे.

मुंबईमध्ये प्रामुख्याने अनेक वर्षापासून पिण्याचा पाण्याचा प्रश्न, शाळा, महिलांचे प्रश्न, मैदाने, रस्ते, स्वच्छतेबाबत, पार्किंग समस्या तसेच प्रदुषणाचा हे विषय ऐरणीवर तसेच आरोग्य, शिक्षण यासाठी विशेष ठोस अशी तरतूद अर्थसंकल्पात दिसून येत नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आर्थिक दृष्ट्या मोठा असला तरी महानगरपालिकेच्या उत्पन्न कोणत्या माध्यमातून मिळणार या नियोजनाचा अभाव दिसून येत आहे.
आमदार रईस शेख, समाजवादी पक्ष माजी महापालिका गटनेते

पर्यावरण स्नेही अर्थसंकल्प- भालचंद्र शिरसाट

मुंबईचा अर्थसंकल्प कुठलीही करवाढ दरवाढ न करणारा, कंत्राटदारांच्या जोखडातून मुंबईला मुक्त करणारा, चालू प्रकल्पांना गती देणारा, पर्यावरण स्नेही व मुंबईकरांना दिलासा देणारा आहे. परंतु उल्लेखनीय / नाविन्यपूर्ण असे काहीच दिसत नाही. मुंबईकरांच्या अपेक्षांचे ओझे फार मोठे आहे.
बरचं काही करायचे बाकी आहे.
भालचंद्र शिरसाट, प्रवक्ते, माजी नगरसेवक

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.