मुंबई महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पाचा डोलारा हा महसुली उत्पन्नावर अवलंबून असला तरी चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कर आणि विकास नियोजन शुल्क आणि शासनाकडील थकीत अनुदान यांची रक्कम वसूल करण्यात येणाऱ्या अडचणी पाहता महापालिकेचा महसूल कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मालमत्ता करातून वसूल होणाऱ्या महसुलाची रक्कम सुधारीत केली
मुंबई महापालिकेने जकातीपोटी करावयाच्या भरपाईसाठी अनुदान सहाय्य हे ११ हजार ४२९ कोटी रुपये वसूल करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ही रक्कम शासनाच्यावतीने महापालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहे. परंतु दुसऱ्या क्रमांकाचे महसुली उत्पन्नाचे स्त्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीचे ७ हजार कोटी रुपयांचे लक्ष्य महापालिका आयुक्तांनी ठेवले होते. परंतु आगामी अर्थसंकल्प बनवण्यापूर्वी प्रशासनाने मालमत्ता करातून वसूल होणाऱ्या महसुलाची रक्कम सुधारीत केली आहे. त्यामुळे ७ हजार कोटी रुपयांच्या तुलनेत प्रशासनाने आता ४८०० कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे या सुधारीत लक्ष्याच्या तुलनेत १ फेब्रुवारीपर्यंत ४००७ कोटी रुपयांचा महसूल मालमत्ता करातून जमा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात मालमत्ता कर प्रणालीबाबत निकाल विरोधात गेल्यामुळे भांडवली मुल्य करप्रणालीतील याआधी वसूल केलेल्या रकमेतूनच काही रक्कम ग्राहकांना परत द्यावी लागणार असल्याने चालू आर्थिक वर्षांत मालमत्ता करातून अधिक महसूल जमा होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळेच प्रशासनाने प्रत्यक्षात ठेवलेले लक्ष्य आता सुधारीत करत कमी केले आहे.
(हेही वाचा ५ फेब्रुवारीच्या हिंदू जन आक्रोश मोर्च्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका; शुक्रवारी निर्णय)
अपेक्षित महसुलाची रक्कम कमी होणार
तर विकास नियोजन खात्याच्या माध्यमातून मिळणाऱ्या विकास शुल्कातून ३,९५० कोटी रुपयांचे लक्ष्य होते. परंतु येत्या मार्च २०२३ पर्यंत ३ हजार कोटींचा महसूल जमा होईल, असा विश्वास खात्याला आहे. विशेष म्हणजे गुंतवणुकीपासून मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेतून १,१२८ कोटी रुपयांच्या महसूलाच्या तुलनेत कमी रक्कम जमा होण्याची शक्यता आहे, याशिवाय शासनाकडून येणाऱ्या १,१२६ कोटी रुपयांच्या थकीत अनुदानातील एकही रुपया महापालिकेला मिळालेला नसल्याने यातील अपेक्षित महसुलाची रक्कम कमी होणार आहे. जाहिरात धोरण रखडल्याने परवाना विभागाच्या माध्यमातून मिळणारे अपेक्षित शुल्कही कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सुमारे ३० हजार ७४३ कोटी रुपयांच्या महसुली उत्पन्नाच्या तुलनेत या महसूलाची रक्कम यंदा कमीच होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने आगामी काळातील अंदाजित अर्थसंकल्पाचा फुगा प्रशासनाला अधिक वाढवताना तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचेही बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community