- विशेष प्रतिनिधी,मुंबई
मुंबई महापालिकेचा सन २०२५-२६ अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून तब्बल ७४ ४२७. ४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. ६०.६५ कोटी रुपये शिलकीच्या या अर्थसंकल्पात महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी (Dr. Bhushan Gagrani) यांनी मुंबईकरांवर कोणत्याही प्रकारची करवाढ, दरवाढ आणि शुल्क वाढ लादलेली नाही. हाती घेण्यात आलेल्या विकास प्रकल्प कामांना गती देतानाच आर्थिक संकटातही जनतेवर कोणताही बोजा न लादता महसूल वाढीवर अधिक भर देण्यात आला आहे. (BMC Budget 2025)
मुंबई महापालिकेचा सन २०२५-२६च्या शिक्षण विभागाचा अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी (Dr. Amit Saini) यांनी महापालिक आयुक्त डॉ भूषण गगराणी (Dr. Bhushan Gagrani) यांना सादर केला त्यानंतर अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सन २०२५ २६चा महापालिका अर्थसंकल्प महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ भूषण गगराणी (Dr. Bhushan Gagrani) यांना सादर केला. यावेळी महापालिका अतिरिक्त डॉ. विपीन शर्मा, , उपायुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड, उपप्रमुख लेखापाल गोसावी उपप्रमुख लेखापाल (अर्थसंकल्प)अरुण जाधव आदी उपस्थित होते. (BMC Budget 2025)
(हेही वाचा – National Games Shooting Championship : सिफ्त कौर सामरा, जोनाथन एंथोनीला सुवर्ण)
चालू अर्थसंकल्प हा ५९ हजार ९०० कोटींचा मांडण्यात आला होता तो सुधारीत करून त्याचे आकारमान ६५, १८० कोटींवर नेण्यात आले आणि आगामी अर्थसंकल्पाचे आकारमान या सुधारीत अर्थसंकल्पाच्या तुलनेत १४.१९ टक्क्यांनी वाढवून ७४,४२७.४१ कोटी रुपयांवर नेवून ठेवले आहे. यामध्ये भांडवली खर्चाकरता ४३ १६२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर महसुली करता ३१,२०४ कोटी रुपये खर्च होणार आहे. चालू आर्थिक वर्षांत १२, ११९ कोटी रुपये इतका निधी तात्पुरत्या अंतर्गत हस्तांतरणद्वारे वळता केला होता, परंतु आगामी अर्थसंकल्पात ही रक्कम १६,६९९ कोटी रुपये एवढी दर्शवली आहे. त्यामुळे अंतर्गत कर्जावरच अर्थसंकल्पाचा आकडा वाढवण्यात आल्याचे दिसून येत आहे. (BMC Budget 2025)
महापालिका आयुक्तांनी या अर्थसंकल्पात महसूल वाढीवर भर देतानाच विकास नियोजन खात्याकडून ९७०० कोटी रुपयांचा महसूल प्रस्ताविला आहे. मालमत्ता कराचा महसूल ५२०० कोटी रुपयांवर प्रस्तावित केले आहे. गुंतवणुकीवर व्याजातून २२८३ कोटी रुपये, जल आणि मलनि:सारण करातून २३६३ कोटी रुपयांचे महसूल अपेक्षित मानला आहे. याशिवाय अग्निशमन दलाकडून शुल्कापोटी ७५९ कोटी रुपये, परवाना विभागाकडून ३६२ कोटी रुपये, शासनाकडील थकबाकीची रक्क्म ६५८१ कोटी रुपये अशाप्रकारे महसूल वाढीचे स्त्रोत दर्शवले आहेत. (BMC Budget 2025)
(हेही वाचा – मुंबई बँक सर्वसामान्यांची स्वप्ने पूर्ण करते; विधानसभा अध्यक्ष Rahul Narwekar यांचे प्रतिपादन)
अतिरिक्त चटई क्षेत्र अधिमुल्याच्या रकमेपोटी ३०० कोटी रुपये, रिक्त भूभाग भाडेपट्टा पोटी २००० कोटी रुपये, झोपडपट्टी भागातील व्यावसायिक वापर करता मालमत्ता करापोटी ३५० कोटी रुपये अशाप्रकारे महसूल वाढीसाठी प्रयत्न केला जाणार आहे.
स्वच्छ, शाश्वत आणि सक्षम मुंबईसाठी कटिबध्द या मंत्राचा नारा देत महापालिका आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर करताना वित्तीय शिस्त आणि शाश्वतता, अर्थसंकल्पीय तरतुदींच्या अनुषंगाने वित्तीय शिस्त, पायाभूत सेवा सुविधांचे सक्षमीकरण, गुणवत्तापूर्ण आरोग्य व शिक्षण व्यवस्था, स्वच्छ आणि शाश्वत पर्यावरण, सामाजिक उपक्रम, प्रशासकीय व कार्यालयीन कार्यक्षमता आदींवर भर देत अर्थसंकल्पाचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न केल. (BMC Budget 2025)
(हेही वाचा – Dollar च्या तुलनेत रुपया पहिल्यांदाच ८७ रुपयावर पोहचला)
नवीन योजना
- हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे शहरी हरितीकरण प्रकल्प
- आनंदवन हरित पट्टा
- गोरेगाव मुलुंड लिंक रोडवर उभारणार वाघाचे शिल्प
- लंडन आयच्या धर्तीवर उभारणार मुंबई आय
अशाप्रकारे केली आहे विकासकामांसाठी तरतूद
- बेस्ट अनुदान : १००० कोटी रुपये
- शिक्षण विभाग : ३२४१ कोटी रुपये
- घनकचरा व्यवस्थापन विभाग : ५५४८ कोटी रुपये
- पर्जन्य जलवाहिनी विभाग : ३०३९ कोटी रुपये
- कोस्टल रोड प्रकल्प : १५४५ कोटी रुपये
- रस्ते आणि वाहतूक विभाग : ६५१९ कोटी रुपये
- पूल विभाग : ८३६९ कोटी रुपये
- आरोग्य विभाग : १९५८ कोटी रुपये
- प्रमुख रुग्णालये : २४५५ कोटी रुपये
- वैद्यकीय महाविद्यालये : ५७९ कोटी रुपये
- विशेष रुग्णालये : ३०६ कोटी रुपये
- जल अभियंता विभाग : ४३७२ कोटी रुपये
- पाणी पुरवठा प्रकल्प खाते : ४०५६ कोटी रुपये
- मलनि:सारण प्रचालन विभाग : १९७२ कोटी रुपये
- मलनि:सारण प्रकल्प खाते : ४३९ कोटी रुपये
- मलनि:सारण प्रकल्प कामे : ६५३२ कोटी रुपये
- नगर अभियंता विभाग : ३३९५ कोटी रुपये
- विकास नियोजन विभाग : १८३१ कोटी रुपये
- उद्यान आणि प्राणिसंग्रहालय : ७३१ कोटी रुपये
- कोळीवाड्यांच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांची ठोक तरतूद
हेही पहा –
Join Our WhatsApp Community