मुंबई महापालिकेचा सन २०२३-२४चा अर्थसंकल्प जाहीर झाला. मागील वर्षांच्या तुलनेत ५२ हजार ६१९ कोटी रुपयांचा अर्थात १४.५२ टक्यांचा वाढीव अर्थसंकल्प सादर केला. मुंबई महापालिकेने प्रथमच ५० हजार कोटींच्या अर्थसंकल्पाचा टप्पा पार केल्याचा दावा महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी केला. परंतु मागील पाच वर्षांमध्ये तब्बल २८ हजार कोटींनी महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा आकडा वाढत गेला आहे. विशेष म्हणजे ५० हजारांपेक्षा अधिक अर्थसंकल्पाचा आकडा हा महसुली खर्च कमी करून आणि भांडवली खर्च वाढवून केल्याने चहल यांना आकडा ५० हजार कोटींच्या आतमध्ये राखण्यात यश आले असते, परंतु आपल्या कारकिर्दीत ५० हजार कोटींचा अर्थसंकल्प बनवून केवळ ऐतिहासिक नोंद करण्यासाठीच प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.
( हेही वाचा : पूर्व उपनगरांमधील या भागांमध्ये येत्या बुधवारी आणि गुरुवारी राहणार पूर्णपणे पाणीकपात )
महापालिकेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीच्या आधीच्या वर्षात म्हणजे २०१६-१७ मध्ये महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा आकार ३७०५२.५२ कोटी रुपये एवढा होता. पण २०१७च्या महापालिका निवडणुकीनंतर २०१७-१८मध्ये तत्कालिन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी तब्बल १२ हजार कोटींनी अर्थसंकल्पाचा आकडा कमी केला होता. आयुक्तांनी, त्यावेळी काटकसरीचे तत्व, पुनरावृत्ती टाळण्याचे तत्व, पारदर्शकतेचे तत्व, जबाबदारीचे तत्व, विकास आराखड्याशी एकात्मतेचे तत्व यावर आधारीत बनवताना वास्तववादी अर्थसंकल्प बनवताना अनावश्यक खर्चावर कठोर देखरेख व आवश्यक त्या ठिकाणी पुरेसा खर्च करणे या धोरणांचा समावेश केला होता. पुढे मग २०१९- २० पर्यंत तत्कालिन आयुक्त अजोय मेहता यांनी पहिल्या वर्षी १९०० कोटी रुपये आणि त्या पुढील वर्षी प्रत्येकी तीन हजार कोटींच्या पुढे अर्थसंकल्पात वाढ होणार नाही याची काळजी घेतली. त्यानंतर महापालिका आयुक्तपदाची सुत्रे हाती घेणाऱ्या प्रविणसिंह परदेशी यांनीही अजोय मेहता यांच्या प्रमाणेच केवळ तीन हजार कोटींची वाढ दर्शवत २०२०-२१मध्ये ३३,४४१. ०२ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला.
परंतु कोविड काळात परदेशी यांची बदली करून महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झालेल्या इक्बालसिंह चहल यांनी यापूर्वीच्या प्रथेला छेद देत २०२१-२२चा ३९,०३८ कोटींचा अर्थात सहा हजार कोटींची वाढ करत अर्थसंकल्प सादर केला, त्यानंतर पुढील वर्षी म्हणजे २०२२-२३मध्येही सहा हजार कोटींनी वाढ करत ४५,९४९. २१ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. तसेच आगामी अर्थसंकल्पही ६६७० कोटींनी वाढ करत ५२,६१९.०७ कोटींचा सादर केला. त्यामुळे महापालिका आयुक्त म्हणून चहल यांनी हा तिसरा अर्थसंकल्प मांडला असून या तीन वर्षांमध्ये अर्थसंकल्पाचा आकडा सुमारे २० हजार कोटींनी वाढला. तर त्या आधीच्या तीन वर्षांमध्ये अर्थसंकल्पाचा आकडा हा ८ हजार कोटींनी वाढला होता. विशेष म्हणजे २०१७ -१८ ते २०२१-२२ या कालावधीमध्ये महसुली खर्चाची टक्केवारी ७५ ते ७२ टक्के एवढी होती, तर भांडवली खर्चाची टक्केवारी २५ ते २८ टक्के एवढी होती. तर चहल हे आयुक्तपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्या वर्षी महसुली खर्चाची टक्केवारी थेट ६५ टक्क्यांवर आली आणि भांडवली खर्चाची टक्केवारी ३५ वर आली होती. तर चालू आर्थिक वर्षात महसुली खर्चाची टक्केवारी ५२ वर आणि भांडवली खर्चाची टक्केवारी ४८ वर आली आणि आगामी वर्षांत महसुली खर्चाची टक्केवारी ४८वर आणि भांडवली खर्चाची टक्केवारी ५२वर आली आहे.
त्यामुळे चहल यांनी अर्थसंकल्पातील आर्थिक शिस्तीला लगाम घालण्याऐवजी बेलागपणे खर्च करण्यास सुरुवात केल्याने अर्थसंकल्पाचा आकडा वाढता वाढत जात असल्याचे पहायला मिळत आहे.
मागील पाच ते सहा वर्षांतील अर्थसंकल्पाची आकडेवारी
- सन २०१६-१७ : ३७०५२.५२ कोटी रुपये
- सन २०१७-१८: २५१४१.५१ कोटी रुपये( कमी १२ हजार कोटींनी)
- सन २०१८-१९ : २७२५८.०७ कोटी रुपये(सुमारे १९०० कोटींनी वाढला)
- सन २०१९-२० : ३०६९२.५९ कोटी रुपये (सुमारे ३ हजार कोटींनी वाढला)
- सन २०२०- २१ : ३३४४१.०२ कोटी रुपये (सुमारे ३ हजार कोटींनी वाढला)
- सन २०२१-२२ : ३९०३८.८३कोटी रुपये (सुमारे सहा हजार कोटींनी वाढला)
- सन २०२२-२३ : ४५,९४९.२१ कोटी रुपये (सुमारे सात हजार कोटींनी वाढला)
- सन २०२३-२४: ५२,६१९.०७ कोटी रुपये ( सुमारे ६६७० कोटींनी वाढला)