पवई येथील मिठी नदीवरील पूर्व व पश्चिम बाजूंना जोडणारा ब्रिटीशकालीन पूल धोकादायक झाल्यानंतर, डिसेंबर २०२० मध्ये तो तोडण्यात आला. त्यामुळे या ठिकाणी महापालिकेच्या पूल विभागाच्यावतीने पुलाच्या बांधणीचे काम हाती घेतले. परंतु अत्याधुनिक तंत्रज्ञान व पध्दतीचा वापर करुन, हा पूल अवघ्या पाच महिन्यांमध्ये बांधून पूर्ण झाला आहे. या पुलाची क्षमता पुर्वीच्या तुलनेत तिप्पट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कंत्राटदाराच्या अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतरही हे काम विक्रमी वेळेत पूर्ण करत एकप्रकारे इतिहासच रचलेला आहे.
गैरसोय टाळण्यासाठी केला तात्पुरता रस्ता
पूर्व उपनगरांमधील ‘एस’ विभाग व फिल्टरपाडा परिसरातून जाणारा साकी विहार मार्ग आहे. या मार्गाद्वारे पश्चिम उपनगरातील आरे कॉलनी परिसराला जाता येते. याच मार्गादरम्यान असणा-या मिठी नदीवर सन १९४०च्या सुमारास २० मीटर लांब व ७ मीटर रुंद असणारा पूल बांधण्यात आला होता. मिठी नदीवर असणारा हा पूल डिसेंबर २०२० मध्ये धोकादायक म्हणून घोषित करण्यात आला. त्यानंतर लगेचच हा पूल पाडण्यात आला होता. परंतु पूल पाडल्यानंतर लोकांची गैरसोय होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन पूल पाडण्यापूर्वी त्या ठिकाणी तात्पुरता भराव टाकून एक तात्पुरता रस्ता पर्यायी स्वरुपात बांधण्यात आला होता. या तात्पुरत्या रस्त्याची उभारणी झाल्यानंतर जुना पूल पाडण्याचे काम करण्यात आले होते.
(हेही वाचाः उन्मळून पडलेल्या झाडांचा असाही केला नगरसेवकाने उपयोग)
अहोरात्र काम
या ठिकाणी नव्या पुलाचे बांधकाम हे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन असल्याने अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुधारित पद्धतींचा अवलंब करण्याचे निश्चित करण्यात आले. यानुसार या नव्या पुलाचे बांधकाम अक्षरशः दिवसरात्र करण्यात आले. नव्या पुलाचे बांधकाम हे नुकतेच पूर्ण झाले असून, हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
असा आहे नवा पूल
विशेष म्हणजे जुन्या पुलाची रुंदी ही केवळ ७ मीटर इतकी होती, या तुलनेत नव्या पुलाची रुंदी ही २४ मीटर इतकी आहे. म्हणजे जुन्या पुलापेक्षा हा पूल तिप्पटीपेक्षा अधिक रुंद आहे. तसेच पुलाची उंचीदेखील जुन्या पुलापेक्षा अधिक आहे. जुना पूल ६ मीटर उंच होता, तर नवीन पुलाची उंची ७ मीटर इतकी आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूला पादचा-यांसाठी १.२ मीटर रुंदीचे पदपथ देखील बांधण्यात आले आहेत. पुलाच्या मध्यभागी सुमारे २ मीटर रुंदीची जागा ही जलवाहिन्या व अन्य उपयोगितांसाठी सोडण्यात आली आहे. तसेच पुलाच्या दोन्ही मार्गिकांच्या दोन्ही बाजूला संरक्षित भिंत बांधण्यात आली आहे.
अधिका-यांनी केले सहका-यांचे अभिनंदन
आव्हानांवर यशस्वीपणे मात करुन या पुलाचे बांधकाम विक्रमी वेळेत व नियोजनानुसारच पावसाळ्यापूर्वी करण्यात आले. या पुलामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा आणखी एक मार्ग आता वाहतुकीसाठी खुला झाला असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली आहे. तसेच याबद्दल उप आयुक्त (पायाभूत सुविधा) तथा प्रमुख अभियंता (पूल) राजेंद्रकुमार तळकर यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदनही केले आहे.
(हेही वाचाः १२वीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा २ आठवड्यांचा अल्टिमेटम! )
Join Our WhatsApp Community