मागील तीन वर्षांपासून चर्चेत असलेल्या पाळीव प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमींची कामे अंतिम टप्प्यात आलेली आहेत. सीएनजीवर आधारित स्मशानभूमीपैंकी मालाडचे काम येत्या सप्टेंबर महिन्यात, तर देवनार येथील काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजवर अशाप्रकारच्या स्मशानभूमी या खासगी संस्थांद्वारे चालवल्या जात असल्या, तरी आता मुंबई महापालिकेचीही पाळीव प्राण्यांच्या स्मशानभूमी लवकरच सुरू होणार आहे.
म्हणून घेतला निर्णय
मुंबईत कुत्रे व मांजर यांसारख्या पाळीव प्राण्यांची मोठी संख्या आहे. अनेक घरांमध्ये हे पाळीव प्राणी घरातील एक सदस्यच असतात. त्यामुळे वयोमानानुसार किंवा अन्य कारणांमुळे या प्राण्यांचा मृत्यू झाल्यास, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणे सुकर व्हावे, या दृष्टीने शहरात महालक्ष्मी, पूर्व उपनगरात मालाड आणि पश्चिम उपनगरांत देवनार आदी ३ ठिकाणी स्मशानभूमी महापालिकेच्यावतीने उभारण्यात येत आहेत. सध्या मुंबईत परळ परिसरात पाळीव प्राण्यांसाठी एक खाजगी अंत्यसंस्कार स्थळ असून, ते एका स्वयंसेवी संस्थेद्वारे संचालित आहे. मुंबईतील भटक्या जनावरांच्या मृतदेहाच्या विल्हेवाटाची कार्यवाही ही बोरिवली परिसरातल्या ‘कोरा केंद्र’ या स्वयंसेवी संस्थेद्वारे केली जाते. या पाळीव प्राण्यांच्या मृतदेहावर त्यांच्या मालकांद्वारे वेगवेगळ्या प्रकारे अंत्यसंस्कार केले जातात. हे सर्व प्रकार आरोग्यदृष्ट्या योग्य नसल्याने त्यांच्यासाठी ३ स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
(हेही वाचाः महापालिका मलबार हिलकडील झाडांचे आरोग्य तपासणार!)
कधी होणार काम पूर्ण?
या तिन्ही स्मशानभूमींची कामे २०१९ पर्यंत होणे अपेक्षित होते. परंतु त्यानंतर अत्यंत धिम्या गतीने सुरू असलेल्या या तिन्हीपैकी मालाड आणि देवनार येथील स्मशानभूमींची कामे अनुक्रमे सप्टेंबर व डिसेंबर महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भात देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. योगेश शेट्ये यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मालाड व देवनार येथील स्मशानभूमींची कामे सध्या सुरू आहेत, ती लवकरच पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त केला. परंतु डिसेंबर महिन्याच्या आत दोन्ही स्मशानभूमी सुरू होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर महालक्ष्मी येथील स्मशानभूमीचेही संबंधित काम टाटा संस्थेच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे रुग्णालयाबरोबरच स्मशानभूमीचेही काम सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community