कोविडच्या जनजागृतीसाठी महापालिकेचे चित्ररथ सज्ज!

शहर, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे अशा तीनही क्षेत्रांमध्‍ये प्रत्‍येकी एक चित्ररथ फ‍िरवून जनजागृती करण्यात येणार आहे.

142

कोविड विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता या आजाराबाबत नागरिकांनी कोणत्या प्रकारची काळजी घेण्यात यावी यासाठी आता मुंबई महापालिकेने जनजागृतीवर भर दिला आहे. यासाठी महाालिकेच्यावतीने एका चित्ररथाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच भविष्यात आणखी दोन चित्ररथ साकारले जाणार असून त्यामाध्यमातून शहर, पूर्व उपनगर व पश्चिम उपनगरातील २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीमध्ये कोविडच्या आजाराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून स्वयंसेवक माहिती देतानाच याबाबत पत्रके तसेच मास्कचेही वाटप करणार आहेत.

युनिसेफच्या सहाय्याने निर्मिती

कोविड-१९ या संसर्गजन्‍य आजाराबाबत घ्‍यावयाच्‍या काळजीसंदर्भात जनजागृती करण्‍यासाठी मुंबई महानगरपालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्‍य खात्‍याच्‍या माहिती, शिक्षण व संपर्क विभागाने युनिसेफच्‍या सहकार्याने चित्ररथाची निर्मिती केली आहे. महानगरपालिकेच्‍या कार्यकारी आरोग्‍य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांच्‍या हस्‍ते हिरवा झेंडा दाखवून, या चित्ररथाचा सोमवारी शुभारंभ करण्‍यात आला.

IMG 20210405 WA0024

शहर, पूर्व व पश्चिम उपनगरात फिरणार चित्ररथ

कोविड-१९ विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव पुन्‍हा एकदा मोठ्या प्रमाणावर होत असून, तो रोखण्‍यासाठी प्रत्‍येक नागरिकाने प्रतिबंधात्‍मक उपायांचे पालन करणे आवश्‍यक आहे. विशेषतः मास्‍क योग्यरित्या लावणे, हातांची नियमितपणे स्‍वच्‍छता राखणे, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रींचे पालन अत्‍यावश्‍यक आहे. ही बाब लक्षात घेता मुंबईकरांमध्‍ये जनजागृती करण्‍यासाठी चित्ररथाची निर्मिती करण्‍यात आली आहे. महानगरपालिका आयुक्‍त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्‍त आयुक्‍त सुरेश काकाणी यांच्‍या निर्देशानुसार तसेच उपायुक्त(सार्वजनिक आरोग्‍य) देवीदास क्षीरसागर यांच्‍या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्‍य खात्‍याने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. युनिसेफ या संस्‍थेने सदर चित्ररथाच्‍या निर्मितीसाठी सहकार्य केले आहे. आणखी दोन चित्ररथांची निर्मिती करण्‍याची कार्यवाही सुरू आहे. त्‍यामुळे शहर, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे अशा तीनही क्षेत्रांमध्‍ये प्रत्‍येकी एक चित्ररथ फ‍िरवून जनजागृती करणे शक्‍य होणार आहे.

अशी असेल चित्ररथ यात्रा

या चित्ररथामध्‍ये थ्रीडी मॉडेल साकारण्‍यात आले आहे. तसेच ध्‍वनिक्षेपण यंत्रणा देखील लावण्‍यात आली आहे. चित्ररथावर प्रत्‍यक्ष उपस्थित राहून, स्‍वयंसेवकांमार्फत निरनिराळे जनजागृतीपर संदेश देण्‍यात येतील. तसेच कोविड-१९ आजाराबाबतची माहिती देतानाच पत्रकांचे आणि मास्‍कचे वितरणही नागरिकांमध्‍ये करण्‍यात येणार आहे. विभाग कार्यालयांमध्‍ये कार्यरत वॉर्ड वॉर रुमचे दूरध्‍वनी क्रमांकही चित्ररथावर प्रदर्शित करण्‍यात आले आहेत. वेगवेगळ्या विभाग कार्यालयांच्‍या हद्दीमध्‍ये संपूर्ण परिसरात फ‍िरुन, जनजागृती करताना स्‍थानिक लोकप्रतिनिधींनाही त्‍यामध्‍ये सहभागी करुन घेतले जाणार आहे. विभागातील सर्व भागांमध्‍ये प्रचार करुन जनजागृती करण्‍यासाठी विभागीय समाज विकास अधिकारी यांच्‍यामार्फत समन्‍वय साधण्‍यात येईल. हा चित्ररथ जनजागृतीसाठी सोमवारी ५ मार्च पासून धावत असून, प्रत्‍येक विभागामध्‍ये एक दिवस याप्रमाणे सर्व २४ विभागांमध्‍ये जनजागृतीसाठी नियोजन करण्‍यात आले असल्याची माहिती कार्यकारी आरोग्‍य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.