आजवर रेल्वेच्या हद्दीतील नाल्यांच्या कल्व्हर्टची सफाई महापालिकेने निधी उपलब्ध करुन दिल्यानंतर करणाऱ्या रेल्वे प्रशासनाने, यंदा हे पैसे न घेता महापालिकेला स्वतःच सफाई करण्याची विनंती केली. दरवर्षी रेल्वेला अडीच ते तीन कोटी रुपयांचा निधी दिल्यानंतर त्याचा हिशोब न देणाऱ्या आणि योग्यप्रकारे सफाई न करता रेल्वे रुळांवर तुंबणाऱ्या पाण्याचे खापर महापालिकेच्या डोक्यावर फोडणाऱ्या रेल्वेला यंदा उपरती झाली. रेल्वेला आजवर जे रुळांखालील कल्व्हर्ट स्वच्छ साफ करता येत नव्हते, ते नाल्याचे भाग महापालिका कर्मचा-यांनी काचेसारखे स्वच्छ करुन टाकले. रेल्वेच्या हद्दीत जाऊन महापालिकेने नालेसफाई करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.
एकूण ११६ कल्व्हर्ट
मुंबईत पावसाळ्यापूर्वी निरनिराळ्या प्रकारची कामे संबंधित खात्यांमार्फत पूर्ण करण्यात येतात. त्याचप्रमाणे तिन्ही उपनगरीय रेल्वे हद्दीत लोह मार्गांवरील स्वच्छतेची, तसेच रेल्वे रुळांखालून जाणाऱ्या नाल्यांच्या प्रवाह मार्गामधील (कल्व्हर्ट) गाळ काढण्याची कामे रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येतात. रुळांखाली नाल्यांमध्ये पाणी साचून ते रेल्वे मार्गावर येऊ नये, यासाठी ही स्वच्छ्ता अतिशय महत्वाची ठरते. मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर ४१, मध्य रेल्वे मार्गावर ५३ आणि हार्बर रेल्वे मार्गावर २२ असे मिळून सुमारे ११६ कल्व्हर्ट आहेत. यातील बहुतांशी खुले तर काही बंदिस्त मार्ग आहेत. नाल्यांच्या खुल्या प्रवाह मार्गातील गाळ काढणे तुलनेने सोपे असते, तर बंदिस्त प्रवाह मार्गातील गाळ काढून स्वच्छता करणे आव्हानात्मक असते.
(हेही वाचाः जागतिक पर्यावरण दिनी मुंबईत १२०० झाडांची लागवड!)
महापालिकेला मरेची विनंती
मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोह मार्गावर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुलुंड स्थानकादरम्यान एकूण १८ ठिकाणी रुळांखालून वाहणारे नाल्यांचे बंदिस्त प्रवाह मार्ग (कल्व्हर्ट) आहेत. तेथील गाळ काढून स्वच्छता करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई महापालिका प्रशासनाला अलीकडे झालेल्या पावसाळापूर्व कामांच्या आढावा बैठकीत विनंती केली. मध्य रेल्वेकडे या बंदिस्त प्रवाह मार्गाची स्वच्छता करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री नसल्याने, त्यांनी महापालिकेला रेल्वे हद्दीत हे काम करण्यासाठी विनंती केली. महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू ह्यांनी रेल्वे प्रशासनाची विनंती मान्य केली.
अशी केली सफाई
यासाठी पाण्याच्या जोरदार फवाऱ्याने गाळ काढणारे फायरेक्स संयंत्र तैनात करुन, या १८ पैकी १५ ठिकाणी गाळ काढून स्वच्छता पूर्ण करण्यात आली. तर संयंत्र पोहोचू न शकणाऱ्या तीन ठिकाणी मनुष्यबळाच्या साह्याने हे काम रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहे.
(हेही वाचाः महापालिकेने मेट्रो कर्मचाऱ्यांना दिले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे!)
या ठिकाणच्या नाल्यांची स्वच्छता
ह्या १५ कल्व्हर्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थानक ते मस्जिद स्थानक दरम्यान कर्नाक बंदराखाली, भायखळा ते चिंचपोकळी दरम्यान गोदरेज गॅस कंपनीजवळ, करी रोड ते परळ दरम्यान, परळ ते दादर दरम्यान जगन्नाथ भातमकर पुलाखाली, दादर ते माटुंगा दरम्यान माटुंगा रेल्वे कार्यशाळेजवळ, माटुंगा ते शीव (सायन) दरम्यान, शीव ते कुर्ला दरम्यान, कुर्ला ते विद्याविहार अंतरामध्ये विद्याविहार स्थानकाजवळ, कांजूरमार्ग ते भांडुप अंतरामध्ये कांजूरमार्ग स्थानकाजवळ, भांडुप ते नाहुर दरम्यान भांडुप स्थानकाजवळचा नाला आणि मुलुंड ते ठाणे दरम्यान मुलुंड स्थानक पश्चिम बाजूकडील नाला या ठिकाणच्या कल्व्हर्टची स्वच्छता करण्यात आली आहे. विद्याविहार ते घाटकोपर दरम्यान जॉली जिमखाना लगत, विक्रोळी ते कांजूरमार्ग दरम्यान विक्रोळी स्थानकाजवळ आणि कांजूरमार्ग ते भांडुप दरम्यान दातार नाला ह्या तीन बंदिस्त प्रवाह मार्गाच्या ठिकाणी संयंत्र पोहोचू शकत नसल्याने, तेथील रेल्वे रुळाखालून प्रवाह मार्ग स्वच्छतेचे काम स्वतः रेल्वे प्रशासनाकडून मनुष्यबळ नेमून केले जात आहे.
युद्धपातळीवर काम पूर्ण
१५ ठिकाणची ही सर्व कामे पूर्ण करताना त्यावर योग्य देखरेख करण्यासाठी महापालिकेचे आणि रेल्वे प्रशासनाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. १९ मे २०२१ रोजी सुरू झालेली ही कार्यवाही ४ जून २०२१ रोजी पूर्ण झाली आहे. म्हणजेच अवघ्या १५ दिवसांत महापालिकेने ही अतिरिक्त जबाबदारी देखील पार पाडली आहे. महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे प्रमुख अभियंता एल.कमलापूरकर, उपप्रमुख अभियंता प्रशांत तायशेटे, सहाय्यक अभियंता राजेश यादव आणि सहकारी अधिकारी व कर्मचारी यांनी युद्धपातळीवर हे काम पूर्ण केले आहे.
(हेही वाचाः महालक्ष्मीतील पशुवैद्यकीय रुग्णालय जानेवारी २०२३पर्यंत होणार सुरु!)
Join Our WhatsApp Community