मुंबईतील जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल हे विविध सखल ठिकाणी भेट देऊन पावसाळी उपाय योजनांची पाहणी करीत आहेत. यावेळी त्यांनी शहरातील वरळी येथील कोस्टल रोडच्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी तसेच मिठी नदी आणि धारावी टी जंक्शन आदी भागाची पाहणी अतिरिक्त आयुक्त व विभागाच्या सहायक आयुक्तांसोबत केली. तसेच चहल यांनी क्षेत्रीय दौरा करत हिंदमाता येथील लघू उदंचन केंद्र आणि सेंट झेवियर्स मैदानातील भूमिगत पाणी साठवण टाकीची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, उप आयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, एफ दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त महेश पाटील आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्याचा पावसात काही परिसर जलमय झाल्यानंतर स्वतः रस्त्यावर उतरत पाहणी करून जे काही खडसावले त्यानंतर आयुक्तांना बुधवारी (२८ जून) सकाळ पासूनच तुंबणाऱ्या भागांची पाहणी करण्यासाठी रस्त्यांवर उतरावे लागले आहे.
(हेही वाचा – पावसाचे पुढील ४ ते ५ दिवस महत्वाचे: सर्व सहायक आयुक्त, परिमंडळ उपायुक्त आणि पर्जन्य जल विभागाच्या अधिकाऱ्यांना अलर्ट)
प्रारंभी वांद्रे वरळी सागरी सेतू लगतच्या अब्दुल गफार खान रस्त्यावर सागरी सेतू बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी त्यांनी पाहणी केली. यावेळी जी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त संतोष धोंडे आणि संबधीत अधिकारी उपस्थित होते.
बिकेसी मिठी नदी परिसराची पाहणी
त्यानंतर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी वांद्रे-कुर्ला संकुलातील मिठी नदी पुलावर भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी पावसाळी उपाययोजनांचा आढावा घेतला. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, सहआयुक्त (परिमंडळ ३) रणजित ढाकणे, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, एच पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर आणि संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
धारावी टी जंक्शन परिसराची पाहणी
तिथून धारावी टी जंक्शन येथील पावसाळी पाणी निचरा करणाऱ्या यंत्रणेची पाहणी आयुक्त यांनी केली. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community