विशेष प्रतिनिधी,मुंबई
दादर कासारवाडी व गौतमनगर येथील स्वच्छता कर्मचारी वसाहतींमध्ये नव्याने सुविधा देण्यात आल्या आहेत. अन्य ठिकाणच्या वसाहतींमध्येही स्वच्छता कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात येणार आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा विमा तसेच त्यांच्या पाल्यांच्या विदेशी शिक्षणासाठीचा संपूर्ण खर्च मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे
मुंबईमहानगरपालिकेच्या वतीने आयोजित महा स्वच्छता अभियानाचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भारताचे प्रवेशद्वार (गेट वे ऑफ इंडिया) येथे रविवारी ३१ डिसेंबर २०२३ रोजी प्रारंभ झाला, याप्रसंगी ते जनतेला उद्देशून भाषण करताना त्यांनी ही घोषणा केली.
राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार सदा सरवणकर, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उद्योजक नादिर गोदरेज, माजी आमदार राज पुरोहित, उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे, उप आयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार यांच्यासह विविध मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
(हेही वाचा – Militants Attack: मणिपूरच्या सीमेजवळ पोलीस बॅरेकवर अतिरेक्यांचा हल्ला, ४ कमांडो जखमी)
भारताचे प्रवेशद्वार येथील मुख्य कार्यक्रमात प्रारंभी मुख्यमंत्री शिंदे आणि मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर महानगरपालिकेचे गणवेषधारी स्वच्छता कर्मचारी तसेच अन्य स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांशी संवाद साधला. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे ५०० स्वयंसेवक, विविध स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, विद्यार्थी आणि नागरिक या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
पूर्व द्रुतगती महामार्ग ग्रीन कॉरिडॉर बनवणार
काही दिवसांपूर्वी मुंबईत पूर्व द्रुतगती मार्गावरील पदपथ दिसेनासे झाले होते. आता ते संपूर्ण स्वच्छ करण्यात आले असून त्या ठिकाणी ‘ग्रीन कॉरिडॉर’ बनवले जाईल. जेणेकरुन नागरिकांना त्यावरुन सुखद अनुभवासह फिरता येईल. मुंबईत हरित आच्छादन (ग्रीन कव्हर) वाढवण्याच्या उद्देशाने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी उपलब्ध मोकळ्या सार्वजनिक जागांवर झाडे लावण्याचे निर्देश दिले आहेत.
महापालिकेच्या हद्दीलगत वनपट्टा तयार करणार
मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीलगत ठाणे भागात २७ किलोमीटरचा वनपट्टा तयार करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. मुंबई स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येत आहेत. त्यादिशेने मुंबई महानगरपालिका प्रशासन उत्तम कामगिरी करत आहे, असे गौरवोद्गारही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी काढले.
(हेही वाचा – Mcgm : स्वच्छता कर्मचारी हेच मुंबईचे खरे हिरो)
स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासोबतच पर्यावरणपूरकता जपा!
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाला गती दिली आहे आणि महाराष्ट्र हे भारताचे विकासाचे इंजिन आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या स्वच्छता अभियानालाही वेगळे महत्व आहे. राज्यातील सार्वजनिक स्वच्छतेची स्थिती सुधारण्यासाठी मुंबईतील स्वच्छतेचा पॅटर्न राज्यभर विस्तारण्यात येणार आहे. एवढेच नाही तर हा पॅटर्न संपूर्ण देशासाठी आदर्श ठरेल, असा आशावादही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासोबतच शक्य तेथे पर्यावरणपूरकता जपा, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष आणि दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
ज्येष्ठांसाठी लवकरच डे केअर सेंटर
शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, संपूर्ण स्वच्छता अभियानामुळे मुंबईतील हवा स्वच्छ होऊ लागली आहे. मुंबईतील लहानसहान परिसर, गल्लीबोळातील भाग स्वच्छ करुन आरोग्यदायी वातावरण राहील, अशा तऱ्हेने कार्यवाही सुरु आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वसाहतींमध्ये सुधारणांसाठी, तेथे आवश्यक सेवा-सुविधा पुरवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. मुंबईत लवकरच ज्येष्ठांसाठी डे केअर केंद्र सुरू करण्यात येणार आहे, असेही केसरकर यांनी नमूद केले.
२२ हजार किलोमीटर रस्ते धुतले, प्रदूषण पातळी घटली
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून दिनांक ३ डिसेंबर २०२३ पासून सुरू झालेल्या स्वच्छता मोहीमेअंतर्गत आतापर्यंत संपूर्ण मुंबईत मिळून सुमारे २२ हजार किलोमीटर अंतर होईल, इतक्या लांबीचे रस्ते धुवून काढण्यात आले आहेत. आजवर १३ विभागात संपूर्ण स्वच्छता करण्यात आली आहे. त्यातून १८३ टन कचरा आणि १,१०० टन राडारोडा (डेब्रीज) उचलण्यात आला आहे. दररोज १ हजार किलोमीटर रस्ते धुण्याचा संकल्प हाती घेतला आहे. या सर्वांच्या परिणामामुळे हवा गुणवत्तेचा निर्देशांक ३५० वरून निम्म्यावर आला आहे. काही ठिकाणी तर तो ९० च्याही खाली आला आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या अभियानाला नवचेतना मिळाली आहे. हे अभियान आता जनचळवळीत परावर्तित झाले असून मुंबई मॉडेल देशासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल, असा आशावादही डॉ. चहल यांनी व्यक्त केला.
स्वच्छता कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार
कार्यक्रमाच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याचा मानस व्यक्त केला. त्यानुसार, त्यांनी प्रातिनिधीक स्वरुपात मंचावर आमंत्रित करत महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी संदीप पवार आणि शीला जाधव, डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे मच्छिंद्र सामंत आणि रमेश शिरगावकर, सेवा पुरवठादारांचे संस्थांमधील प्रतिनिधी सुमीत शिरवळ आणि अर्चना मोरे, क्लीन अप फाउंडेशनच्या बेला शाह आणि कुंती ओझा यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. स्वच्छता कर्मचारी हेच मुंबईचे खरे हिरो असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community