विशेष प्रतिनिधी,मुंबई
घरगुती व लहान स्तरावरील राडारोडा वाहून नेणारी ‘डेब्रीज ऑन कॉल’ (Debries on call) सेवा आता ऑनलाईन, अधिक जलद आणि पर्यावरणपूरक ठरत असून मुंबईतील ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवेची मागणी नोंदवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मुंबई शहर व पूर्व उपनगरांसाठी १८००-२०२-६३६४ आणि पश्चिम उपनगरांसाठी १८००-२१०-९९७६ हा टोल फ्री क्रमांक सकाळी ८.०० ते संध्याकाळी ८.०० या वेळेत उपलब्ध करुन दिला आहे.तर, ‘मायबीएमसी’ (My BMC App) मोबाईल ऍपच्या माध्यमातून लवकरच ऑनलाईन पर्याय कार्यान्वित करण्यात येणार आहे जो २४ तास उपलब्ध करून दिला आहे.
मुंबईतील घरगुतीस्तरावरील बांधकाम आणि पाडकाम यातून निर्माण होणारा राडारोडा (डेब्रीज) उचलून वाहून नेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून ‘डेब्रीज ऑन कॉल’ ही सेवा सन २०१४ पासून पुरवली जाते. घरगुती तसेच लहान स्तरांवरील बांधकाम, पाडकाम, दुरुस्तीची कामे यातून निर्माण होणारे डेब्रीज संकलन (Debris collection) करुन वाहून नेण्यासाठी ही सेवा माफक दरात कार्यरत आहे. रस्त्यावर तसेच इतरत्र टाकून देण्यात येणारे डेब्रीजचे प्रकार टाळण्यासाठी सुरु केलेली ही सेवा अल्पावधीत नागरिकांच्या पसंतीस उतरली. महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभाग कार्यालय (वॉर्ड) निहाय ही सेवा उपलब्ध आहे. वॉर्डनिहाय पुरवलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर ही सेवा पुरवली जाते.
असे असले तरी, मुंबई महानगराचा विस्तार पाहता, त्या तुलनेत घरगुती व लहान स्तरावर निर्माण होणा-या डेब्रीजचे अधिकाधिक संकलन व्हावे, त्याचप्रमाणे रस्त्यांच्या कडेला व इतरत्र टाकून देण्यात येणा-या अनधिकृत डेब्रीजचे प्रकार रोखता यावेत तसेच शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करुन सदर डेब्रीज पुनर्प्रक्रिया करुन वापर करण्याकरीता उपलब्ध व्हावे, यासाठी ही सेवा अधिक सुलभ, वेगवान व काळानुरुप ऑनलाईन पर्यायांसह उपलब्ध करुन देण्याची गरज निर्माण झाली होती. याबाबतचा अभ्यास करुन लोकाभिमुख, अधिक कार्यक्षम व्यवस्था उभी करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले होते. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प (Solid Waste Management Project) विभागाने ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवेचा लोकाभिमुख विस्तार केला आहे, अशी माहिती किरण दिघावकर उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) (प्रभारी) यांनी दिली आहे.
(हेही वाचा – BMC : मराठा आरक्षण सर्वेक्षणासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना मानधनाची रक्कम देणार की बुडवणार?)
या नवीन ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवेची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
या टोल फ्री क्रमांकावर साधा संपर्क
घरगुती व लहान स्तरावरील बांधकाम, दुरुस्ती, पाडकाम यातून निर्माण होणारा राडारोडा (डेब्रीज) वाहून नेण्यासाठी मुंबईकरांना आता प्रशासकीय विभाग कार्यालय (वॉर्ड) निहाय दूरध्वनी क्रमांक लक्षात ठेवून त्यांच्यावर संपर्क साधण्याची गरज नाही. त्याऐवजी, ‘डेब्रीज ऑन कॉल’ करिता मुंबई शहर व पूर्व उपनगरांमधील नागरिकांनी १८००-२०२-६३६४ या टोल फ्री क्रमांकावर व पश्चिम उपनगरांतील नागरिकांना १८००-२१०-९९७६ या टोल फ्री सकाळी ८.०० ते संध्याकाळी ८.०० या वेळेत क्रमांकावर संपर्क साधता येईल. त्यामुळे संपर्काची सुविधा सुटसुटीत झाली आहे. परिणामी, वॉर्डनिहाय क्रमांकाऐवजी या दोन क्रमांकांवरुन संपूर्ण मुंबई महानगरातील नागरिकांना सेवा पुरवली जाईल.
‘मायबीएमसी’ मोबाईल ऍप
मुंबई महानगरपालिकेचे ‘मायबीएमसी’ हे मोबाईल ऍप नागरी सेवा-सुविधांशी संबंधित आहे. या मोबाईल ऍपमध्ये नागरिकांना ‘डेब्रीज ऑन कॉल’ चा पर्याय लवकरच उपलब्ध केला जाणार आहे. त्या पर्यायावर प्रवेश केल्यानंतर त्यामध्ये मुंबई शहर व पूर्व उपनगरांसाठी एक तर पश्चिम उपनगरांसाठी दुसरा असे दोन पर्याय आढळतील. योग्य पर्याय निवडल्यावर ‘डेब्रीज ऑन कॉल’ (Debries on call) शी संबंधित स्वतंत्र मोबाईल ऍप इन्स्टॉल करता येईल. त्या ऍपमध्ये सर्व माहिती भरल्यानंतर महानगरपाालिकेकडे मागणीची नोंद होईल.
जलद गतीने होणार कार्यवाही
महानगरपालिकेकडे मागणी प्राप्त झाल्यानंतर संबंधित कनिष्ठ पर्यवेक्षक (Junior Supervisor) प्रत्यक्ष ठिकाणी भेट देवून पाहणी करुन खातरजमा करतील. तसेच डेब्रीज नेण्यासाठी करावयाच्या कार्यवाहीचा अंदाज घेतील. त्यांच्याकडून मागणी मंजूर होवून लागू असणारे शुल्क ऍपद्वारे कळवले जाईल. तसेच, मागणी मंजूर केल्याचे संबंधित नागरिकांस मोबाईल ऍपवर, व्हॉटस्ऍपवर कळवले जाईल. लागू असलेले शुल्क भरणा केल्यानंतर ४८ तासांच्या आतमध्ये डेब्रीज संकलन करुन वाहून नेण्यात येईल.
(हेही वाचा – Ginger Tea : थंडीत आल्याचा चहा फायदेशीर, पण जास्त प्यायल्याने होतात समस्या)
सुमारे ५०० किलोग्रॅमपर्यंत विनामूल्य सेवा
‘डेब्रीज ऑन कॉल’ (Debries on call) सेवेमध्ये आता ५०० किलोग्रॅमपर्यंतच्या डेब्रीजसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ती सेवा पूर्णपणे विनामूल्य असेल. त्यापुढील डेब्रीजसाठी देखील अत्यंत माफक दर आकारले जाणार आहेत.
ऑनलाईन पेमेंट सुविधा-
‘डेब्रीज ऑन कॉल’ (Debries on call) सेवेसाठी रक्कम देखील ऑनलाईन पद्धतीने प्रदान करण्याची सुविधा नागरिकांना मिळणार आहे. संबंधित मोबाईल ऍपद्वारे रकमेचा भरणा करता येईल. त्याची पावतीही ऍपमध्ये त्याचप्रमाणे व्हॉटस्ऍपद्वारे दिली जाईल. ज्यांना ऑनलाईन भरणा करण्याऐवजी रोखीने रक्कम द्यायची असेल, त्यांनी प्रत्यक्ष भेट देणारे महानगरपालिकेचे कनिष्ठ पर्यवेक्षक (Junior Supervisor) यांच्याकडे रक्कम दिल्यानंतर पावती देण्यात येईल. ती रक्कम संबंधित कनिष्ठ पर्यवेक्षक महानगरपालिकेकडे जमा करतील.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community