-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेच्यावतीने पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामांसाठी निविदा मागवण्यात आली असून या निविदेमध्ये पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील मोठ्या नाल्यांच्या सफाईच्या कामांमध्ये कंत्राटदारांची मिलिभगत झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिथे मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम सोपे आहे, तिथे प्रशासनाने अंदाजित केलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारुन काम मिळवण्याचा प्रयत्न कंत्राटदारांनी केला असून छोट्या नाल्यांच्या कामांमध्ये कंत्राटदारांनी उणे दराने काम मिळवण्याचा प्रयत्न केल्याने कंत्राटदारांनी कार्टेलिंग करत संगनमताने महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. (BMC)
मुंबई महापालिकेच्यावतीने शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील छोट्या आणि मोठ्या नाल्यांसह मिठी नदी आणि पूर्व तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गालगतच्या कल्व्हर्टमधील गाळ काढण्यासाठी निविदा मागवली आहे. या निविदेमध्ये पश्चिम उपनगरातील परिमंडळ तीन, परिमंडळ चार आणि परिमंडळ सातमधील मोठ्या नाल्यांच्या कंत्राट कामांमध्ये कंत्राटदारांनी अधिक दराने कामे मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. पश्चिम उपनगरातील परिमंडळ तीन करता जेआरएस इन्फ्रा ही कंपनी पात्र ठरली असून या कंपनीने अंदाजित दरापेक्षा ९.९९ टक्के अधिक दर लावला आहे. तर परिमंडळ चारमधील मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी एस. के. डेव्हलपर्स या कंपनीने अधिक ५.९९ टक्के दराने तर परिमंडळ सातमधील मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी एम. बी. ब्रदर्स या कंपनीने ३.९० टक्के अधिक दराने काम मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. (BMC)
(हेही वाचा – पाकिस्तानी सैन्य आणि चीनच्या लुटीला Balochistan करणार कडवा विरोध; केली युद्धाची घोषणा)
या सर्व कंपन्यांशी वाटाघाटी करून हे दर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु वाटाघाटी करण्याचे अधिकार हे प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिनी) यांना न देता कंत्राटी उपायुक्त (पायाभूत सेवा सुविधा) यांना देण्यात आल्या आहेत. मागील सन२०२१ पासूनची जर आकडेवारी काढल्यास मोठ्या नाल्यांमधील गाळ काढणाऱ्या कंपन्यांनी उणे दराने बोली लावूनच मिळवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेच अधिक दराने बोली लावून काम मिळवण्याचा प्रयत्न केल्याने यासर्व कंत्राटदारांनी संगनमत केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. (BMC)
मात्र, त्यातुलनेत छोट्या नाल्यांच्या सफाईमध्ये सरासरी १५ पेक्षा कमी दराने कामे मिळवण्याचा प्रयत्न झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या नाल्यातील गाळ काढण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागत नाही, जेवढे कष्ट छोट्या नाल्यातील गाळ काढण्यासाठी घ्यावे लागते. त्यामुळे छोट्या नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी दर कमी आकारला जाणे आणि मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी अधिक दर आकारला जाणे हेच शंकेला कारणीभूत ठरत आहे. तसेच यापूर्वी मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी जी निविदा काढली होती, त्यात कधीही चढ्या दराने बोली लावून कंत्राटदारांनी कामे मिळवण्याचा प्रयत्न झालेला नाही. त्यामुळे यंदा चढ्या दराने काम मिळवण्याचा प्रयत्न झाल्याने ही शंका अधिकच दृढ झाल्याने महापालिका प्रशासनाने कार्टेलिंग करून काम मिळवण्याचा प्रयत्न झालेली ही निविदा रद्द करून शॉर्ट नोटीसवर नव्याने निविदा मागवावी अशी अधिकाऱ्यांमध्येही कुजबुज ऐकायला मिळत आहे. (BMC)
(हेही वाचा – मुंडेंच्या जागी भुजबळ? – मंत्रिपदाच्या रिक्त जागेवर Chhagan Bhujbal यांची वर्णी लागण्याची शक्यता)
पश्चिम उपनगरातील नालेसफाईसाठी लावलेली बोली (सर्व आकडेवारी टक्क्केवारीत)
परिमंडळ तीन : जेआरएस इन्फ्रा कंपनी, (अंदाजित दरापेक्षा ९.९९ टक्के अधिक)
परिमंडळ चार : एस. के. डेव्हलपर्स कंपनी (अंदाजित दरापेक्षा ५.९९ टक्के अधिक)
परिमंडळ सात : एम बी ब्रदर्स, (अंदाजित दरापेक्षा ३.९० टक्के अधिक)
पूर्व उपनगरांतील नालेसफाईसाठी लावलेली बोली
परिमंडळ चार : त्रिदेव इन्फ्राप्रोजेक्टर (अंदाजित दरापेक्षा १० टक्के अधिक)
परिमंडळ सहा : रणुजा देव कॉर्पोरेशन (अंदाजित दरापेक्षा ६.३६ टक्के अधिक)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community