कोविड सेंटर उभारणीसाठी महापालिकेला नगरसेवक, सामाजिक संस्थांची साथ!

एका बाजूला खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णाला लाखो रुपयांची बिले आकारली जात आहेत, तिथे महापालिकेच्या खांद्याला खांदा लावून, काही सामाजिक संस्था व नरगसेवक आता पुढाकार घेत कोविड सेंटर निर्माण करत आहेत.

मुंबईमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने आपल्या रुग्णालयांसह कोविड सेंटरची निर्मिती केली. महापालिकेच्या या कोविड रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये मोफत आरोग्य सुविधा असली, तरी खासगी रुग्णालयांमध्ये कोविड उपचारावर सशुल्क सेवा दिली जात आहे. एका बाजूला खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णाला लाखो रुपयांची बिले आकारली जात आहेत, तिथे महापालिकेच्या खांद्याला खांदा लावून, काही सामाजिक संस्था व नरगसेवक आता पुढाकार घेत कोविड सेंटर निर्माण करत आहेत. अंधेरी पूर्व कोलडोंगरी, अंधेरी पश्चिम, विक्रोळी पूर्व गोदरेज सभागृह तसेच गोरेगाव गोकुळधाम प्रसुतीगृह आदी ठिकाणी अशाप्रकारे कोविड सेंटर उभारण्यात आले असून, त्याठिकाणी ऑक्सिजन बेडची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय महापालिकेप्रमाणेच त्याठिकाणी मोफत उपचार केले जाणार आहेत.

कोलडोंगरी येथे उपचारांसोबतच मिळणार अत्याधुनिक सेवा

अंधेरी पूर्व कोलडोंगरी येथील नित्यानंद महापालिका शाळेत महापालिकेच्या के-पूर्व विभाग कार्यालयाच्या सहभागाने, रवींद्र जोशी मेडिकल फाऊंडेशनेच्या संयुक्त विद्यमाने व केशव सृष्टीच्या सहकार्याने कोविड केअर सेंटर खुले झाले आहे. स्थानिक भाजप नगरसेवक अभिजित सामंत यांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या या कोविड केअर सेंटरमध्ये ३० रुग्ण खाटांची क्षमता आहे. हे सेंटर पूर्णपणे वातानुकूलित असून त्यामध्ये उपचार, मनोवैज्ञानिक तज्ज्ञांद्वारे समुपदेशन, टिव्ही, वाय-फाय सेवा आदी सुविधा विनामूल्य असतील. याशिवाय चहा, नाश्ता आणि जेवणही मोफत असेल. या केंद्रात महापालिकेच्या वॉर रुम मार्फतच दाखल करुन घेतले जाईल. अंधेरी व विलेपार्ले पूर्व भागातील ६० वर्षांखालील व्यक्ती, ज्यांना अस्थमा, हृदयविकार, किडनीचे विकार अशाप्रकारचे आजार नाहीत तसेच ज्यांना सौम्य लक्षणे आहेत, त्यांना याठिकाणी दाखल केले जाऊ शकते, असे भाजप नगरसेवक अभिजित सामंत यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचाः ३६.३० टक्के मुंबईकरांमध्ये आढळल्या अँटिबॉडीज! सेरो सर्वेक्षणाचा निष्कर्ष)

अंधेरी पश्चिम गुजराती भवनमध्ये ३० खाटांचे सेंटर

अंधेरी पश्चिम येथील लोटस पेट्रोल पंपसमोरील लिंक रोडवर गुजराती भवनमध्ये, महापालिका के-पश्चिम विभागाच्या सहकार्याने श्री वागड विशा ओसवाल चोविशी महाजन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने, ३० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. अवघ्या तीन दिवसांमध्ये या सेंटरची निर्मिती करण्यात आली. या कोविड सेंटरमध्ये उपचार, जेवण व नाश्ता पूर्णपणे मोफत असणार आहे. याठिकाणी २४ तास डॉक्टरांची टीम कार्यरत असेल. कोविडचा हा आजार रोखण्यासाठी आपल्या संस्थेचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे संस्थेने म्हटले आहे. हे केंद्र सुरू करण्यास परवानगी दिल्याबद्दल अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी आणि के-पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांचे त्यांनी आभार मानले आहेत. यामध्ये १५ बेड हे ऑक्सिजनचे आहेत.

(हेही वाचाः लक्षणे नसलेल्या रुग्णांवरील उपचाराचे सीसीसी टू केंद्रे अर्धी रिकामीच! )

गोरेगावात प्रसुतीगृहातही सुरु झाले कोविड सेंटर

मुंबई महापालिकेच्या गोरेगावमधील गोकुळधाम प्रसुतीगृहाच्या जागेत स्थानिक भाजप नरसेविका प्रिती सातम यांच्या प्रयत्नाने महापालिकेच्यावतीने कोविड सेंटर उभाण्यात आले आहे. याठिकाणी ६० खाटांची क्षमता असून, त्यातील २५ खाटा ऑक्सिजन प्रणालीला जोडलेल्या आहेत. या केंद्राचे लोकार्पण दहा दिवसांपूर्वी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते पार पडले.

(हेही वाचाः महापालिका रुग्णालयांत ऑक्सिजन, सर्वसाधारण खाटा रिकाम्या!)

विक्रोळीत २५ आयसीयूसह ६० ऑक्सिजन खाटांचे सेंटर

मुंबई महापालिकेच्या एन विभागाच्या सहयोगाने विक्रोळी पूर्व येथील गोदरेज कम्युनिट हॉलमध्ये सध्याची रुग्णांची गरज ओळखून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांच्या पुढाकाराने ऑक्सिजन व आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी २५ आयसीयू कक्षासह ७५ ऑक्सिजन प्रणालीच्या खाटांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याठिकाणी सौम्य लक्षणांच्या रुग्णांसह आजार बळावलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करता येतील. विभागातील नागरिकांसाठी याठिकाणी डॉक्टर्स, परिचारिका, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची एक फळी निर्माण करण्याचा आपला हा प्रयत्न असल्याचे, राखी जाधव यांनी म्हटले आहे. महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल,अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, उपायुक्त देवीदास क्षिरसागर आणि एन विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाल्याचे त्या सांगतात. मागील वर्षीही आपण सर्वप्रथम अशाप्रकारे ऑक्सिजन सेंटर व क्वारंटाईन सेंटरची सुविधा विभागातील जनतेसाठी उपलब्ध करुन दिली हेाती. पुन्हा एकदा या दुसऱ्या लाटेत विभागातील जनतेसाठी हा प्रयत्न करत असून, विभागातील रुग्णांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असेही जाधव यांनी म्हटले आहे. मंगळवारी याचे लोकार्पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पालकमंत्री व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते होणार आहे.

(हेही वाचाः कोरोनाबाधित मृत रुग्णाला पॅकिंग करण्यासाठी हॉस्पिटल आकरते अतिरिक्त शुल्क!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here