कोविड काळामध्ये जिथे करनिर्धारण व संकलन विभागाचे कर्मचारी व अधिकारी जेवण वाटपासह इतर कामांमध्ये गुंतल्याने प्रत्यक्षात ऑक्टोबर महिन्यामध्ये मालमत्ता कराच्या वसुलीला सुरुवात झाली. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत ५६० कोटी रुपयांचा महसूल करणाऱ्या करनिर्धारण व संकलन विभागाने ३१ मार्च २०२१ पर्यंत ५ हजार १३५ पूर्णांक ४३ कोटी रुपयांचा महसूल वसूल केला आहे. त्यामुळे महापालिकेने निश्चित केलेल्या ५ हजार २०० कोटी रुपयांच्या तुलनेत ९८ टक्क्यांपर्यंत महसूल वसूल करत एकप्रकारे मोठा मैलाचा दगड पार करतानाच वसुलीचा इतिहास रचला आहे. त्यामुळे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, सहआयुक्त सुनील धामणे आणि सहाय्यक आयुक्त डॉ. संगीता हसनाळे यांची टीम आता कौतुकास पात्र ठरली आहे.
इतिहासातील सर्वाधिक वसुली
मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराचे यावर्षीचे लक्ष्य हे ५२०० कोटी रुपयांचे होते. त्यानुसार आधी कोविडमुळे या कराची वसुली करण्यात आलेल्या अडचणी आणि डिसेंबरनंतर खऱ्या अर्थाने नवीन देयके पाठवून अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत करनिर्धारण व संकलन विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी याचे टार्गेट ९८ टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता कराची वसुली ही ५ हजार १३५.४३ कोटी इतकी झाली असून, ही वसुली महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात सर्वाधिक आहे. गेल्यावर्षी म्हणजेच ३१ मार्च २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुली ही रुपये ४ हजार १६१ कोटी इतकी झाली होती, अशी माहिती सहआयुक्त सुनील धामणे यांनी दिली आहे.
(हेही वाचाः यशवंत जाधव स्थायी समिती अध्यक्षपदाचा चौकार ठोकणार!)
अशी आहे वसुली
१ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या आर्थिक वर्षामध्ये सर्वाधिक मालमत्ता कर वसुली ही ‘के-पूर्व’ विभागामध्ये रुपये ५४०.२८ कोटी इतकी झाली आहे. या विभागामध्ये प्रामुख्याने अंधेरी(पूर्व) परिसराचा समावेश होतो. या खालोखाल ‘के- पश्चिम’ विभागामध्ये रुपये ४५४.५२ कोटी इतकी मालमत्ता कर वसुली झाली आहे. या विभागामध्ये प्रामुख्याने अंधेरी (पश्चिम) परिसराचा समावेश होतो. या दोन विभागांच्या नंतर ‘एच पूर्व’ विभागामध्ये रुपये ४११.२५ कोटी इतकी मालमत्ता कर वसुली झाली आहे. या विभागामध्ये प्रामुख्याने वांद्रे(पूर्व) परिसराचा समावेश होतो. यानंतर शहर भागातील प्रामुख्याने वरळी परिसराचा समावेश असलेल्या ‘जी-दक्षिण’ विभागामध्ये रुपये ३९९.२९ कोटी तर प्रामुख्याने भांडुप परिसराचा समावेश असलेल्या ‘एस’ विभागात रुपये ३०३.६८ कोटी इतकी मालमत्ता कर वसुली झाली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शहर भाग, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तिन्ही भागातील मालमत्ता कर वसुलीचा विचार केल्यास सर्वाधिक कर वसुली ही पश्चिम उपनगरांमध्ये रुपये २,५४५.९४ कोटी शहर भागात रुपये १,५०९.५२ कोटी आणि पूर्व उपनगरांमध्ये रुपये १,०७६.९३ कोटी इतकी मालमत्ता कर वसुली झाली आहे.
(हेही वाचाः कोरोना : जाणून घ्या गृहविलगीकरण आणि रुग्णालयात दाखल होण्याचे निकष! )
वर्षभरात ११ हजार ६६१ मालमत्तांची अटकावणी
वर्षभरात तब्बल ११ हजार ६६१ मालमत्तांवर अटकावणीची कारवाई करण्यात आली. या अंतर्गत ‘एच-पूर्व’ विभागात सर्वाधिक म्हणजे २ हजार ०५३ मालमत्तांवर ही कारवाई करण्यात आली. तर आर्थिक वर्ष २०२०-२१ दरम्यान ४७९ मालमत्तांची जल जोडणी खंडित करण्यात आली. या अंतर्गत ‘टी’ विभागात सर्वाधिक म्हणजेच १४१ इतक्या मालमत्तांची जल जोडणी खंडित करण्यात आली होती. तर ५० ठिकाणी वाहने, संगणक, वातानुकूलन यंत्रणा इत्यादी वस्तू जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.
Join Our WhatsApp Community