कोरोनाचा आजार नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेकडून सुरू असतानाच अनेक सुपर स्प्रेडर्सची विशेष काळजी घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या सर्व मंडयां(मार्केट)मधील विक्रेत्यांचे लसीकरण प्राधान्याने करुन घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि विभागीय कार्यालयांच्या मदतीने मुंबईतील २४ विभागांत असलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचे लसीकरण त्या-त्या विभागांमध्ये केले जाणार आहे.
म्हणून लसीकरणाचा निर्णय
मुंबईमध्ये महापालिकेची एकूण ९२ मार्केट असून, त्यामध्ये सुमारे १७ हजार परवानाधारक गाळेधारक आहेत. कोविडच्या आजाराचा प्रार्दुभाव होऊ नये म्हणून ही मार्केट प्रारंभीच्या काळात बंद ठेवण्यात आली होती. परंतु त्यानंतर कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करत ही मार्केट पुन्हा खुली करण्यात आली. पण मार्केटमधील गाळेधारक आणि तिथे काम करणाऱ्या कामगार, हमालांच्या कोविड चाचण्या करण्यात आल्यानंतर, काही मार्केटमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्या पार्श्वभूमीवर मार्केटमधील गाळेधारक आणि तिथे येणाऱ्या लोकांची विशेष काळजी घेण्याकडे बाजार विभागाच्या सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे विशेष काळजी घेत असतानाच, आता त्यांनी सर्व मार्केटमधील गाळेधारकांच्या लसीकरणावर भर देण्याचा निर्धार केला आहे.
(हेही वाचाः अखेर सोसायट्यांमध्ये होणाऱ्या लसीकरण मोहिमांसाठी नियमावली तयार!)
यांचे होणार लसीकरण
अंडे यांच्या संकल्पनेतून मार्केटमधील गाळेधारकांसाठी लसीकरण कार्यक्रम राबवण्यासाठी कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांना पत्र लिहिले आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद लाभल्याने आता मार्केटजवळील लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून हे लसीकरण केले जाणार आहे. यामध्ये मार्केटमध्ये व्यवसाय करणारे परवानाधारक गाळेधारक, कोळी भगिनी यांच्यासह मंडईत काम करणारे हमाल आदींना या लसीकरण मोहिमेत सहभागी करुन घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
टप्प्याटप्प्याने होणार लसीकरण
अशाप्रकारची मोहीम राबवण्याचा बाजार विभागाचा विचार आहे, याबाबतची संकल्पना बाजार विभागाच्या सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे यांनी मांडली. त्याला सहआयुक्त रमेश पवार यांनी परवानगी दिली. त्यानुसार कार्यकारी आरोग्य अधिकारी यांना गेल्या शुक्रवारी पत्र लिहून त्यांना याची कल्पना देण्यात आली. त्यामुळे मार्केटच्या नजिक असणा-या लसीकरण केंद्रात ज्याप्रमाणे स्लॉट उपलब्ध होईल त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने हे लसीकरण करण्यात येईल. यामुळे मार्केटमधील गाळेधारक व हमाल आणि कामगार यांचे लसीकरण पूर्ण होईल आणि त्यांना कोविडचा कोणताही धोका राहणार नाही. मुंबईत क्रॉफर्ड मार्केटप्रमाणे अनेक गर्दीची मार्केट आहेत. परंतु तिथे वारंवार भेटी व तेथील बाजार निरीक्षकांना दिलेल्या निर्देशानुसार तिथे कोविड रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण फारच अल्प होते, असेही अंडे यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचाः कोविड रुग्णांवर अँटीबॉडीज कॉकटेलचा प्रयोग यशस्वी! काय आहे हा नवा प्रयोग?)
Join Our WhatsApp Community