कुर्ला नेहरु नगरवासियांची तुंबणाऱ्या मलवाहिन्यांच्या समस्येतून सुटका?

148

कुर्ला पूर्वमधील म्हाडाची वसाहत असलेल्या नेहरु नगरमधील मलवाहिन्या या जुन्या जीर्ण झाल्याने आता या वसाहतींचा होणारा विकास लक्षात घेता महापालिकेने या भागातील मलवाहिन्यांची जाळे मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या भागांमध्ये आता ३०० व ४५० मि. मी व्यासाच्या मलवाहिनी टाकल्या जाणार आहे.

( हेही वाचा : धक्कादायक! मुंबईत दररोज २ अत्याचार आणि ४ अपहरणाच्या घटना)

कुर्ला पूर्व भागातील म्हाडा वसाहत असलेल्या नेहरु नगर येथील विद्यमान रस्त्यांवरील मलनि:सारण वाहिन्या सुमारे ५० वर्ष जुन्या असून या वसाहतींचा वाढीव एफएसआयच्या निर्देशांकानुसार पुनर्विकास होत असल्याने सध्या अस्तित्वातील मलनि:सारण वाहिन्यांची क्षमता अपुरी पडत आहे. त्यामुळे या भागातील मलाहिन्या तुंबून यातील मल टाक्यांमधून बाहेर पडून अनेक भागांमध्ये दुर्गंधी पसरते.

या नेहरु नगर भागांमध्ये ३०० मि. मी, ४५० मि. मी,३५५ मि. मी,५०० मि. मी, ६३० मि. मी व्यासाच्या १५५० मीटर लांबीच्या या मलवाहिन्या टाकल्या जाणार आहे. या १५५० मीटर्स लांबीच्या मलवाहिन्यांवर ५४ मनुष्य प्रवेशिका अर्थात मॅनहोल्स असतील,असे मलनि:सारण प्रचालन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नियोजित कामाच्या आखणीत झोपडपट्टीसारखे अडथळे येत नसल्याने पावसाळा वगळून १२ महिन्यांच्या कालावधीत हे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे ८ कोटी ७८ लाख ११ हजार ९७१ एवढ्या रकमेत हे काम केले जाणार असून या कामांसाठी समृध्दी एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली आहे.

कुर्ला नेहरु नगर भागाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर या निवडून आल्यापासून येथील भागात मलवाहिन्या बदलण्यासाठी महापलिकेकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. यासंदर्भात बोलतांना मोरजकर यांनी सांगितले की, नेहरु नगर भाग हा म्हाडा वसाहतीचा असून याठिकाणी म्हाडाच्या १५५ इमारती आहे. यासर्व इमारती ५० वर्ष जुन्या असल्याने येथील मलवाहिन्याही मोडकळीस आल्याने मलजल तुंबून बाहेर वाहून जाते. या भागातील मलवाहिनीतील मलाचा निचरा योग्यप्रकारे करण्यासाठी अमरमहल येथील मलवाहिन्यांचे जाळे टाकले जात आहे. याचे काम कोविड काळामध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु ते झाले नाही. परंतु हे काम अंतिम टप्प्यात असल्याने या मलवाहिन्यांमधून मलाचा निचरा करण्यासाठी जुन्या मलवाहिन्यांचे जाळे काढून नवीन मलवाहिन्या टाकल्या जाणार आहे. आपण मागील पाच वर्षांपासून यासाठी पाठपुरावा करत असून प्रत्येक अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये ही या मागणीवर सातत्याने प्रशासनाचे लक्ष्य केंद्रीत करून घेत होते. त्यामुळे नेहरु नगर भागातील जुन्या मलवाहिन्या बदलण्यासाठी कंत्राटदाराची निवड करून हे काम हाती घेतल्याची बातमी ही येथील जनतेसाठी आनंददायी आणि दिलासा देणारी असल्याची प्रतिक्रिया मोरजकर यांनी व्यक्त केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.