मुंबई शहरातील घर गल्ल्यांची (हाऊस गल्ली) समस्या मोठी असून या हाऊस गल्ल्यांची स्वच्छता वेळच्या वेळी न झाल्याने इमारतीच्या आवारात अस्वच्छता निर्माण होऊन उंदिर,घुशींचे प्रमाण वाढू लागते. त्यामुळे शहर भागातील जुन्या इमारतींच्या हाऊस गल्ल्यांची स्वच्छता करण्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी व्हॅक्यूम पद्धतीचा वापर करण्याची मागणी नगरसेवकांकडून केली जात होती, परंतु ही मागणी प्रशासनाने धुडकावून लावली आहे. कचरा काढण्यासाठी अशा पध्दतीची व्हॅक्यूम यंत्रसामुग्री नसल्याने या यंत्रणेचा वापर करणे शक्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे एका बाजूला कचरा साफसफाई करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जात असताना दुसरीकडे गारबेज शूट पाठोपाठ आता हाऊस गल्ल्यांची स्वच्छता राखण्यासाठी व्हॅक्युम पद्धतीचा वापर करण्यास प्रशासनाने हात वर केले आहेत.
मुंबईतील कुलाबा ते भायखळा,नागपाडा, लालबाग चिंचपोकळीपर्यंत सर्वांत जास्त जुन्या इमारती असून या अंतर्गत येणाऱ्या महापालिकेच्या पाच प्रशासकीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये तब्बल ५ हजार ११६ हाऊस गल्ल्या आहेत. ज्यात चंदनवाडी,गिरगाव आदी सी विभाग कार्यालयाच्या हद्दीमध्ये सर्वाधिक म्हणजे १ हजार ७५१ हाऊस गल्ल्या आहेत. तर ग्रँटरोड, मुंबई सेंट्रल,ताडदेव आदी डि विभाग कार्यालयाच्या हद्दीत त्या खालोखाल म्हणजे १ हजार २३ हाऊस गल्ल्या आहेत.
शहर भागांमध्ये मोठया प्रमाणात उपकरप्राप्त अर्थात सेस इमारती व ना उपकर प्राप्त अर्थात नॉन सेस या जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. या जुन्या इमारतींमधील हाऊस गल्ल्यांची स्वच्छता ही प्रमुख समस्या असून अनेकदा या हाऊस गल्ल्यांची स्वच्छता करणाऱ्या सफाई कामगारांच्या अंगावर कचरा टाकणे किंवा पाणी ओतणे असे प्रकार घडत असतात. त्यामुळे अनेकदा सफाई कामगार या हाऊस गल्ल्यांची स्वच्छता करायला तयार नसतात. परिणामी, मोठ्या प्रमाणात या हाऊस गल्ल्यांमध्ये कचरा जमा होऊन दुर्गंधी निर्माण होते. परिणामी उंदिर तसेच घुशींचे तसेच डासांचेही प्रमाण वाढते. यामुळे जुन्या धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना होण्याचेही प्रकार घडले आहेत.
हाऊस गल्ल्यांची ही समस्या लक्षात घेता, सन २०१९ मध्ये तत्कालिन भाजप नगरसेवक आकाश पुरोहित यांनी या हाऊस गल्ल्यांची स्वच्छता करण्यासाठी व्हॅक्यूम पध्दतीच्या यंत्रणेचा वापर करण्यात यावा. जेणेकरून कचरा आणि सांडपाणी इत्यादी कचऱ्याचे पदार्थ यंत्राद्वारे शोषले जाऊन हा भाग स्वच्छ राखला जाईल अशी सूचना केली होती. महापालिका सभागृहानेही हा ठराव मंजूर करून प्रशासनाकडे पाठवला होता. परंतु प्रशासनाने मात्र याबाबत नकार घंटा वाजवली आहे.
( हेही वाचा: मुंबईकरांमध्ये पुरेशा अँटीबॉडीज आहेत का? काय सांगतो अहवाल )
शहरातील इमारतींमधील हाऊस गल्ल्या या अरुंद लांब व काही ठिकाणी वळणदार आहेत. या अरुंद घर गल्ल्यांमध्ये पाण्याच्या जलवाहिन्या तसेच मलजलवाहिन्याही आहेत. बऱ्याच ठिकाणी शुध्द पाण्याच्या जलवाहिनी भूमिगत जात नसून पृष्ठभागावरुन जात आहेत. त्यामुळे यासाठी अन्य यांत्रिक पर्याय शोधण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. तसेच अशा ठिकाणचा कचरा काढण्यासाठी आवश्यक असलेली व्हॅक्यूम यंत्रसामुग्री सध्या उपलब्ध नसल्याने याचा वापर करणे शक्य होत नसल्याचेही म्हटले आहे.
विभाग व घर गल्ल्यांची संख्या
- ए विभाग : ४६०
- बी विभाग : ९९५
- सी विभाग : १७५१
- डी विभाग : १०२३
- ई विभाग : ८८६