‘त्या’ लसीकरणाच्या चौकशीसाठी महापालिकेची सिरमकडे धाव

महापालिकेने सिरम कंपनीकडून नमूद केलेल्या बॅचमधील लसींची विक्री कोणत्या रुग्णालयाला केली होती, याची माहिती मागवली आहे.

83

कांदिवली पश्चिम येथील हिरानंदानी सोसायटीमध्ये झालेल्या बनावट लसीकरण प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू असली, तरी यासाठी वापरण्यात आलेल्या लसींच्या वायल्स कुठून आल्या, याचा शोध सुरू आहे. लसीकरण करणाऱ्या संस्थेने लसीचा जो बॅच क्रमांक प्रमाणपत्रावर लिहिलेला आहे, तो महापालिकेने खरेदी केलेल्या लसींपैकी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महापालिकेने आता सिरम कंपनीकडून या बॅचच्या लसी कोणत्या रुग्णालयाला विक्री केल्या होत्या, त्याची माहिती मागवली आहे. सिरम कंपनीकडून या बॅचच्या लसींची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयाचे नाव उघड होण्याची शक्यता आहे.

९ ठिकाणी लसीकरण

कांदिवलीतील सोसायटीमध्ये झालेल्या लसीकरणाबाबत रहिवाशांच्या तक्रारीनंतर, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपायुक्त विश्वास शंकरवार यांची समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल देण्यापूर्वी पोलिसांनी चार जणांना अटक केली. यामध्ये त्यांनी अशाप्रकारे ९ ठिकाणी लसीकरण केल्याची कबुली दिली होती. महापालिकेच्यावतीने सादर केलेल्या अहवालामध्ये महापालिकेची परवानगी न घेता किंवा कोणत्याही रुग्णालयाशी करारनामा न करता हे लसीकरण केल्याचे म्हटले आहे. तसेच संशयित लससाठा अनधिकृत पध्दतीने मिळवल्याचे स्पष्ट केले.

(हहेी वाचाः ‘ते’ लसीकरण बनावटच! महापालिका उपायुक्तांचा अहवाल )

सिरमकडून मागवली माहिती

या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेने सर्व प्रथम जो बॅच क्रमांक प्रमाणपत्रांवर नमूद केला आहे, तो आपल्याकडील आहे का याची माहिती मिळवली. यामध्ये महापालिकेच्यावतीने खरेदी केलेल्या लसींपैकी त्या लसी नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सिरम कंपनीने ज्या रुग्णालयाला लसींची विक्री केली आहे, त्यांच्या बॅच क्रमांकाची नोंद त्यांच्याकडे असते. त्यामुळे महापालिकेने सिरम कंपनीकडून नमूद केलेल्या बॅचमधील लसींची विक्री कोणत्या रुग्णालयाला केली होती, याची माहिती मागवली आहे. सिरम कंपनीकडून मााहिती प्राप्त होताच या लस कोणत्या रुग्णालयाने खरेदी केल्या होत्या आणि या टोळीने कोणत्या रुग्णालयातून या लस अनधिकृतपणे मिळवल्या याची माहिती उघड होईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

ते लसीकरण भाजपचे नाही

कांदिवलीतील हिरानंदानी सोसायटीमध्ये बनावट लसीकरण झाल्याचे उघड झाले. त्याच ठिकाणी भाजपच्या आमदार व स्थानिक नगरसेविकेने लसीकरण कार्यक्रम आयोजित केल्याच्या पोस्ट, सोशल मीडियावरुन व्हायरल होत आहेत. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जिथे हा प्रकार घडला त्याच ठिकाणी दुसऱ्या वेळेला लोकप्रतिनिधींनी लसीकरण कार्यक्रम आयोजित केला होता. परंतु त्यासाठी महापालिकेची परवानगी घेण्यात आली होती. तर जे बनावट लसीकरण झाले होते, ते गृहनिर्माण सोसायटीने स्वत: आयोजित केले होते.

(हेही वाचाः मुंबईकरांना ‘फुकट’ नको, ‘विकत’ हवी… खासगी केंद्रांवरील लसीकरण जोरात)

बदनाम करण्याचा राजकीय डाव

याबाबत स्थानिक भाजप नगरसेविका प्रियंका मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, जो प्रकार घडला आहे तो ३० मे चा आहे. सोसायटीने ३० मे रोजी लसीकरण कार्यक्रम हाती घेतला होता. आणि स्थानिक आमदार योगेश सागर यांच्या पुढाकाराने १६ जून रोजी ऑस्कर रुग्णालयाच्यावतीने लसीकरण पार पडले. या लसीकरणात ३४६ जणांनी लाभ घेतला आणि त्या सर्वांना रुग्णालयाच्यावतीने प्रमाणपत्र देण्यात आले. महापालिकेची परवानगी घेऊनच हे लसीकरण झाले होते. परंतु काही राजकीय पक्ष याचे भांडवल करत असले, तरी महापालिकेकडे याची नोंद आहे. केवळ त्याचठिकाणी आमच्या पक्षाने हे लसीकरण आयेाजित केले होते आणि फेसबूकवर याच्या पोस्ट आम्ही टाकल्या होत्या. त्या पोस्टची लिंक पहिल्या बनावट लसीकरणाशी जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे, मोरे यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचाः सर्वसामान्य जनता, भेसळ आणि आरोग्य!  )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.