भंडारा येथील रुग्णालयात आग लागून दहा मुलांचा गुदमरुन मृत्यू झाला होता. त्यानंतर भांडुपमधील मॉलमध्ये आग लागून त्यावरील रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचाही गुदमरुन मृत्यू झाला. या सर्व पार्श्वभूमीवर उपाययोजनेचा भाग म्हणून मुंबई महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये आता आग लागून निर्माण होणारा धूर शोषून बाहेर काढण्याची यंत्रणा बसवली जाणार आहे. ज्यामध्ये आयसीयू किंवा खाटेला खिळलेल्या रुग्णाला बाहेर पडता आले नाही, तरी त्यांचा धुरामुळे गुदमरुन मृत्यू होणार नाही, अशाप्रकारची यंत्रणा आता उपनगरीय रुग्णालयांमध्ये बसवली जाणार आहे.
(हेही वाचाः केईएम रुग्णालयात स्मृतिभ्रंशच्या आजाराकरता मेमरी क्लिनिक)
आगीमुळे रुग्णांना बाहेर काढणे कठीण
महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमधील विविध विभागांमध्ये, वैद्यकीय कक्ष तसेच अतिदक्षता विभागात यांत्रिक व विद्युत प्रणाली कार्यरत असून, यामध्ये काही बिघाड झाल्यास आग लागण्याची शक्यता असते. आग लागल्यानंतर रुग्णालयातून रुग्ण व कर्मचाऱ्यांना बाहेर काढणे अवघड होते. यापूर्वी अशाप्रकारे भंडारा येथील लागलेल्या आगीत रुग्णालयात दाखल १० लहान मुलांचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वी अंधेरी एमआयडीसी येथील विमा रुग्णालयातही अशाप्रकारे आग लागून अनेक रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर वर्षभरापूर्वी भांडुप येथील ड्रिम मॉलमध्ये लागलेल्या आगीमुळे सनराईज रुग्णालयातील रुग्णांचा गुदमरुन मृत्यू झाला होता.
(हेही वाचाः शनिवारी फक्त महिलांसाठी लसीकरणाचा ‘जागर’)
कंत्राटदाराची निवड
त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अशाप्रकारची दुघर्टना झाल्यास कोणत्याही प्रकारची मनुष्यहानी होऊन रुग्णांचे व कर्मचाऱ्यांचा जीव जावू नये, यासाठी महापालिकेच्या यांत्रिकी व विद्युत विभागाच्यावतीने १६ उपनगरीय रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभाग, अतिदक्षता विभाग इत्यादी ठिकाणी आग लागून झालेला धूर गाळून बाहेर काढणाऱ्या प्रणाली बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया पार पडली असून या कामांसाठी महापालिकेने पात्र कंत्राटदाराची निवड केली आहे. या कामासाठी २.४० कोटी रुपये खर्च येणार आहे.
Join Our WhatsApp Community