ग्लोव्हज्, मास्क, पीपीई कीट्ससह औषधसाठा व इतर वैद्यकीय सामग्री खरेदीचे महापालिकेचे निर्देश

144

महानगरपालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याने महानगरपालिकेची सर्व रुग्णालये मिळून आवश्यक असणारे ग्लोव्हज्, मास्क, पीपीई कीट्स त्याचप्रमाणे औषधसाठा व इतर वैद्यकीय सामग्री यांचा आढावा घेऊन त्यांची आवश्यकता असल्यास खरेदीची प्रक्रिया सुरू करावी, कोणत्याही बाबीचा तुटवडा भासणार नाही, याची खातरजमा करण्यात यावी. तसेच कोविड चाचण्या- कोविड संसर्ग बाधित रुग्ण वेळीच शोधून काढले तर संसर्गाचा अटकाव करता येतो, त्यामुळे कोविड चाचण्यांची संख्या वाढवावी, परिणामी उपचार करणे सोपे जाते. चाचण्यांची संख्या वाढवतानाच खासगी प्रयोगशाळा संचालकांची अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी लवकरात लवकर बैठक घ्यावी, असे निर्देश महापालिका आयुक्त व प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिले.

कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आरोग्य व्यवस्थेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी १० एप्रिल २०२३ रोजी तातडीची आढावा बैठक घेतली. या बैठकीस महापालिका अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव (२) एन. नवीन सोना यांच्यासह सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त तसेच खातेप्रमुख उपस्थित होते.

यावेळी आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी, वैद्यकीय प्राणवायू- कोविड रुग्णसंख्या वाढल्यास अतिदक्षता उपचारांची आवश्यकता वाढू शकते. हे लक्षात घेवून सर्व रुग्णालयांच्या ठिकाणी असलेले वैद्यकीय प्राणवायू निर्मिती (ऑक्सिजन प्लांट) सुस्थितीत कार्यरत आहेत, ऑक्सिजनची मागणी व पुरवठा यांचा ताळमेळ आहे, या सर्व बाबींचे परीक्षण (ऑडिट) रुग्णालयांनी करावे, असे निर्देश दिले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांमध्ये औषधे आदींची उपलब्धता राहील, याची काळजी घ्यावी. संबंधित विभाग कार्यालयांच्या सहायक आयुक्तांनी देखील आपला दवाखान्यांमधील औषधसाठा, मनुष्यबळाची नेमणूक याबाबतचा आढावा घ्यावा.

कोविड रुग्णांची संख्या कमी करणे यासाठी कोविड जागरुकता महत्त्वाची असल्याने जनजागृतीवर भर द्यावा. महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना देखील सक्ती नसली तर जनतेशी येणारा संपर्क पाहता, त्यांनी मास्कचा यापुढे उपयोग करावा. महानगरपालिका कार्यालयांमध्ये येणाऱ्या अभ्यागतांना देखील मास्क लावण्याची नम्रपणे विनंती करावी.

विभागीय नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रूम)

कोविडच्या यापूर्वीच्या लाटांमध्ये रुग्ण व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे सर्व विभागीय नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम) यांच्या कामकाजाचा तातडीने फेरआढावा घ्यावा आणि कोणत्याही प्रकारच्या स्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक ते सर्व मनुष्यबळ, यंत्रणेसह ते कार्यरत राहतील, याची दक्षता घ्यावी. नागरिकांना कोविड काळात तत्काळ प्रतिसाद मिळतानाच आवश्यक असलेली मदत देण्यासाठी विभागीय नियंत्रण कक्षाची जबाबदारी महत्वाची असेल.

सर्व खासगी रुग्णालयांनाही निर्देश

मुंबईतील सर्व खासगी रुग्णालयांनी देखील कोविड बाधितांवर उपचारांसाठी संपूर्ण यंत्रणा सुसज्ज करावी, वाढत्या रुग्णसंख्येची गरज लक्षात घेवून कोणतीही कमतरता राहणार नाही, याची काळजी घ्यावी.

शस्त्रक्रिया आपत्कालीन स्वरुपाची नसेल तर सर्व रूग्णालयांमध्ये शस्त्रक्रियेला सामोरे जाणाऱ्या रुग्णांची कोविड चाचणी करण्यात यावी. जर असा रुग्ण कोविड बाधित आढळला आणि जर शस्त्रक्रिया आपत्कालीन स्वरुपाची नसेल तर ती शस्त्रक्रिया पुढे ढकलावी.

कोविड बाधित तसेच लक्षणं विरहीत रुग्ण लक्षात घेता, आरोग्य खात्याने कोविड रुग्णांच्या गृह विलगीकरण (होम आयसोलेशन) संदर्भात नव्याने मार्गदर्शक सूचना प्रसारित कराव्यात.

(हेही वाचा – Mumbai Corona Updates: रुग्णालयात मास्क सक्ती; सर्व ज्येष्ठ नागरिकांना मास्क लावण्याचे महापालिकेचे आवाहन)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.