मुंबई शहर आणि उपनगरात १५ मे नंतर रस्त्यांवर खोदकामासाठी कोणतीही परवानगी देऊ नये, अशा सूचना महानगरपालिका आयुक्त चहल यांनी सर्व यंत्रणांना दिल्या. अतिशय आपत्कालीन परिस्थितीतच ही परवानगी देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील ९ मीटर रस्त्यांची जबाबदारी ही स्थानिक पातळीवर सहाय्यक आयुक्तांची असणार आहे. याबाबतचा निर्णय नुकताच घेण्यात आला असून यापुढे ९ मीटरपेक्षा कमी रस्त्यांची देखभालीची जबाबदारी सहाय्यक आयुक्तांकडे असेल, असेही. चहल यांनी स्पष्ट केले. पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांवर कोणतेही खड्डे नसतील यासाठीचा दौरा सहायक आयुक्त आणि उपआयुक्त यांनी आपल्या विभागात करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध यंत्रणांमध्ये सुयोग्य समन्वय साधला जाण्याच्या दृष्टीने महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी बैठक झाली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुंबई वाहतूक पोलीस सह आयुक्त प्रवीण पडवळ, प्रभारी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) रमेश पवार, सामान्य प्रशासन विभागाचे सह आयुक्त मिलिन सावंत, महानगरपालिका आयुक्त कार्यालयाचे सह आयुक्त चंद्रशेखर चोरे, हे उपस्थित होते. यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी संगणकीय सादरीकरण केले.
(हेही वाचा BMC : मुंबईतील ‘या’ भागांत दरड कोसळण्याची भीती; महापालिका सजग)
त्यामुळे दोन्ही द्रुतगती मार्गावर खड्ड्यांच्या समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागणार नाही, याची खबरदारी ही सहायक आणि उपआयुक्तांनी आपल्या विभागवार घ्यावी. विविध यंत्रणांच्या ६ उड्डाणपुलाच्या देखभालीची जबाबदारीही महानगरपालिकेकडे असणार आहे. त्यामुळे द्रुतगती मार्गावर कामाची देखरेख विभागीय पातळीवर काटेकोरपणे व्हावी, असेही निर्देश आयुक्तांनी दिले.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीतील विविध कामे आणि मेट्रो इत्यादी कामांच्या ठिकाणी कोणताही राडारोडा राहणार नाही, याची जबाबदारी संबंधित यंत्रणेने घ्यावी. प्रत्येक विभागातील सहायक आयुक्तांनी आपल्या विभागातील राडारोडा काढण्यासाठीचा समन्वय यंत्रणेशी साधावा. तसेच याबाबतची माहिती संबंधित यंत्रणांना द्यावी, असे आवाहनही आयुक्तांनी यावेळी केले.
Join Our WhatsApp Community