सचिन धानजी
आज मुंबई महापालिकेत अभियंत्यांचे स्थान ते काय? खरोखरच अभियंत्यांना त्यांच्या पदानुसार, तसेच त्यांच्या बुध्दीमत्तेचा विचार करता मान राखला जातो का? आज प्रत्येक प्रकल्प कामांमध्ये प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि त्याबरोबरच आयआयटी आणि व्हिजेटीआय संस्थेला देखरेखीसाठी नेमले जाते. खरोखरच उत्तम दर्जा मिळावा; म्हणून हे सर्व होते की, महापालिकेच्या अभियंत्यांवर विश्वास नसल्याने किंवा ते निपुण नसल्याने असे प्रयत्न होत आहे. महापालिकेच्या प्रकल्प कामांचा कारभारच आज सल्लागारांवर चालला आहे. सर्व पायाभूत सेवासुविधांची कामे आणि इतर कामांसाठी ज्या प्रकारे सल्लागारांची सेवा घेतली जाते. कंत्राटदार आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार, आराखडे तपासायला सल्लागार, कामांवर देखरेख ठेवायला सल्लागार, त्या सल्लागारांनी केलेल्या आराखड्याचे किंवा कामांच्या देखरेखीवर लक्ष ठेवायला तज्ज्ञ सल्लागार अशा प्रकारे ज्या प्रकारे सल्लागारांची मांदियाळी तयार होते, त्या प्रकारे महापालिकेचे अभियंते काहीच काम करत नाहीत, अशा प्रकारचेच चित्र निर्माण केले जात आहे. (BMC)
(हेही वाचा – औरंगजेबाच्या कबरीवरून वाद नको, संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारा; Ramdas Athawale यांची मागणी)
मागील दहा वर्षांमध्ये या सल्लागारांचे पिक एवढे आले आहे की, महापालिकेच्या अभियंता हा यात कुठेच दिसत नाही. उलट या प्रकल्पकामांची जबाबदारी ८० ते ८५ टक्के वाहूनही महापालिकेचा अभियंता दुर्लक्षित होतो आणि १५ ते २० टक्के जबाबदारी सांभाळणारे सल्लागारांचे नाव होते. जणू काही या सल्लागारांनीच प्रकल्प कामे पुढे नेली आणि महापालिकेचे अभियंते बसून पगार घेत आहेत. आपल्या अभियंत्यांनी दिलेल्या माहितीवर सल्लागार कंपन्या (Consulting Firms) या अहवाल तयार करून महापालिकेला खपवतात आणि पैसे घेवून मोकळे होतात. बरे या सल्लागार कंपन्यांमध्ये जे तज्ज्ञ असतात ते कोण? तर त्यात आपले निवृत्त अभियंते किंवा स्वेच्छा निवृत्ती घेवून त्यांच्याकडे चाकरी करणारे अभियंते आणि अधिकारी. त्यांच्या बुध्दीमत्तेची कदर महापालिकेला करता न आल्याने याच अधिकाऱ्यांना आपल्याकडे घेऊन या क्षेत्रातील तज्ञ मंडळी महापालिकेला सल्ला द्यायला निघाली आहेत, हे सत्य आहे; पण जाणून घेण्याची प्रशासनाची मानसिकता निश्चितच नसेल.
महापालिकेतील मागील १० वर्षांचा कालखंडा सोडला, तर यापूर्वी महापालिकेने आपली विकासकामे आणि प्रकल्प कामांसाठी कधी सल्लागार नेमला, असे प्रकार तुरळक ऐकायला मिळतील. पण त्या वेळी महापालिकेतील अभियंत्यांची तेवढी रिक्त पदे होती का ? त्या वेळी महापालिकेत सर्व अभियंता संवर्गात एकूण २५२१ पदे होती, आता किती कार्यरत आहे आणि रिक्त आहे, याची जर आकडेवारी ऐकली, तर अभियंत्याला अतिरिक्त कामांखाली एवढे दाबून ठेवले आहे की, त्याला आपली बुध्दीमत्ता आणि हुशारी वापरण्याची संधीच दिली जात नाही, हे समोर येईल.
महापालिकेतील मंजूर पदानुसार मुख्य अभियंता (Chief Engineer) तथा प्रमुख अभियंता १४, उपमुख्य अभियंता ४०, कार्यकारी अभियंता ६१, सहायक अभियंता ५०९, दुय्यम अभियंता १०१३, कनिष्ठ अभियंता ८८४ अशा प्रकारे संख्या आहे. या सर्वांची ३ वर्षांनंतर दुसऱ्या जागी बदली, हे जरी मान्य करणारे असलो, तरी एका ठराविक काळानंतर त्यांना पदोन्नती देणे हेही तेवढेच बंधनकारक असते. त्यामुळे जेव्हा कनिष्ठ अभियंता पदोन्नतीने दुय्यम अभियंता आणि दुय्यम अभियंता जेव्हा साहाय्यक अभियंता आणि साहाय्यक अभियंता जेव्हा कार्यकारी अभियंता होण्यास पात्र ठरतो, तेव्हा निश्चितच खालच्या पदावर पोकळी निर्माण होते आणि अशा परिस्थितीत प्रशासनाने खालची पदे आधीच्या कनिष्ठ अभियंत्यांच्या पदोन्नतीपूर्वी भरल्यास ही साखळी योग्य प्रकारे पुढे सरकली जाते. जेव्हा भरती थांबते, तेव्हा साखळी आपोआपच थांबली जाते किंवा विस्कटते आणि मग त्यातून रिक्त पदांची पोकळी निर्माण होते.
असाच प्रकार सध्या महापालिकेच्या (BMC) नगरअभियंता विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या अभियंत्यांच्याबाबतीत होत आहे. सध्या महापालिकेने कनिष्ठ आणि दुय्यम अभियंत्यांची भरती हाती घेतली असली, तरी ती परीक्षेच्या पटलावरच थांबली आहे. तसेच अंतर्गत परीक्षाही वादात अडकल्याने नव्याने अभियंता कधी नियुक्त होतील, याबाबत सध्या तरी काही सांगता येत नाही. परंतु एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर आपण कनिष्ठ अभियंता पदापासूनच भरती करत असतो आणि या पदापासून काम करणाऱ्या अभियंत्याला सर्व प्रकारचे ज्ञान होत तो पदोन्नतीने पुढे जातो. तेव्हा त्याच्याकडे महापालिकेच्या कामांचा तथा प्रकल्प कामांचा अनुभव असतो. महापालिकेची भौगोलिक स्थिती माहिती नसणाऱ्या अभियंत्यांची दोन पायऱ्या वगळून थेट साहाय्यक अभियंता म्हणून भरती करणे हेच मुळी धोरण चुकीचे होते. आज साहाय्यक अभियंत्यांची थेट भरती करण्याची चूकच महापालिकेला भोवत आहे. त्यामुळे ज्या अधिकाऱ्याच्या सुपीक डोक्यातून ही कल्पना आली आहे, त्या अधिकाऱ्याचा आधी सर्व अभियंत्यांच्या संघटनांनी जाहीर सत्कार करायला हवा. आज महापालिकेत या थेट साहाय्यक अभियंता यांच्या भरतीतून रुजू झालेल्या अभियंत्यांच्या पदोन्नतीच्या वादात सर्व खालच्या पायऱ्या पार करून आलेल्या साहाय्यक अभियंत्यांनाही अडकून पडावे लागले आहे. त्यामुळे पूर्वी जे अभियंता हातात हात घालून काम करत होते, तेच अभियंता आता आपल्या पदोन्नतीच्या लाभासाठी एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहे आणि त्याचा परिणाम रिक्त पदांअभावी अनेकांच्या खांद्यावर अतिरिक्त कामांचा बोजा स्वरूपात पडलेला आहे. जेव्हा आपण साहाय्यक अभियंत्यांची थेट भरती करतो, तेव्हा त्यांची सेवा ज्येष्ठता यादी वेगळी ठेवून त्यांना पदोन्नती द्यायला हवी होती, पण तसा विचारच कधी यापूर्वी करण्यात आला नाही, त्याचा हा परिपाक आहे.
एका बाजूला भरती होत नाही, दुसरीकडे बढती रोखली जात आहे, त्यातच काही सेवा निवृत्त आणि स्वेच्छा निवृत्ती घेत असल्याने त्यांची पदे रिक्त होत आहेत. अशा परिस्थितीत अभियंत्यांवर अतिरिक्त कामांचा बोजा टाकला जात आहे. काही मर्जीतील अधिकाऱ्यांना जास्तीचा चार्ज आणि अतिरिक्त कार्यभार दिला जात असून हा कार्यभार का दिला जातो, याची चौकशी करण्याची मागणी मागील अधिवेशनात आणि चालू अधिवेशनातही उबाठा शिवसेनेचे आमदार सुनील प्रभु यांनी केली. अतिरिक्त कार्यभार कोणा अभियंत्यांनी मागून घेतला का? आपल्या कामांव्यतिरिक्त दुसऱ्याचे विभागाचेही कामे करायचे आणि वरून जर चौकशीची मागणी होणार असेल, तर कोणता अभियंता तिथे काम करेल. शिवाय घोटाळे, भ्रष्टाचार यांच्या तक्रारी, तसेच आरोपांचे स्पष्टीकरण देणे, न्यायालयात बाजू मांडणे, त्याचे स्पष्टीकरण देणे यात या अभियंत्यांचा वेळ जातो तो वेगळाच. कामांच्या जबाबदारी व्यतिरिक्त हा वेळ त्यांचा खर्ची करावा लागतो.
महापालिकेला आपल्या प्रकल्प कामांना न्याय द्यायचा असेल आणि चांगल्या प्रकारे त्याचे आराखडे बनून काम करून घ्यायचे असेल, तर महापलिकेचे अभियंतेच हे काम करू शकतात. त्यांना आपल्या संस्थेविषयी आपुलकी आणि प्रेम असते. सल्लागार हे केवळ पैशांसाठी काम करत असतात. महापालिकेचे अभियंते हे आपले सर्वस्व त्या प्रकल्प कामांसाठी किंवा दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी पणाला लावत असतात. असो किमान पहिल्या टप्प्यात ६८ साहाय्यक अभियंता हे कार्यकारी अभियंता होतील, तेव्हा काहीशी ही साखळी पुढे सरकेल आणि अंतर्गत भरती आणि बाहेरील उमेदवारांची भरती यामुळे महापालिकेतील अभियंत्यांच्या संवर्गाची विस्कळीत झालेली साखळी पूर्ववत होवो, हीच सदिच्छा! (BMC)
हेही पहा –