- विशेष प्रतिनिधी, मुंबई
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ (Assembly Election 2024) मध्ये मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर निश्चित किमान सुविधा योग्यप्रकारे पुरविल्या जाव्यात. मतदान केंद्रांवर येणाऱ्या मतदारांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह यासारख्या मुलभूत सोयीसुविधा देण्यात कोणतीही कसूर ठेवू नये, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी संबंधित कंत्राटदारांना दिले आहेत. तसेच मतदान केंद्रांवरील सोयीसुविधांची पूर्तता, गुणवत्ता आदींचे परीक्षण करण्यासाठी पाचसदस्यीय पथक कार्यरत राहील, अशी माहितीही त्यांनी दिली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ (Assembly Election 2024) च्या पार्श्वभूमीवर, मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा क्षेत्रातील विविध मतदान केंद्रांवर सोयीसुविधा पुरविणाऱ्या कंत्राटादारांची मुंबई महानगरपालिका मुख्यालयात गुरुवारी १७ ऑक्टोबर २०२४ रोजी बैठक घेण्यात आली. त्यावेळी गगराणी बोलत होते. अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार, सर्व परिमंडळांचे उप आयुक्त आणि संबंधित अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
(हेही वाचा – Maharashtra Assembly election मध्ये वांद्रे पूर्वेत झिशान सिद्दिकी विरुद्ध वरुण सरदेसाई यांच्यात होणार लढत)
जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीवेळी काही मतदान केंद्रांवर मूलभूत सोयीसुविधांबाबत मतदारांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची भारत निवडणूक आयोग तसेच राज्य निवडणूक आयोगाने गांभीर्याने दखल घेतली आहे. प्रत्येक मतदान केंद्रांवर निश्चित किमान सुविधा (Assured Minimum Facilities) पुरविण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्ह्यांमधील प्रत्येक मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, कचरापेटी, स्वच्छतागृह, दिव्यांगांसाठी व्हिलचेअर तसेच रॅम्पची व्यवस्था, रांगांमध्ये गर्दी झाल्यास त्याठिकाणी मतदारांना बसण्यासाठी खुर्ची किंवा बाकडे, मोकळ्या ठिकाणी मतदान केंद्र असल्यास मंडपाची उभारणी, पंखे आदी निश्चित किमान सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा कटिबद्ध आहे. या सोयीसुविधांच्या अभावामुळे मुंबईची प्रतिमा डागाळली जाणार नाही, हे सुनिश्चित करण्यात येत आहे. या सुव्यवस्थित आणि उत्तम गुणवत्तेच्या निश्चित किमान सुविधा योग्यप्रकारे पुरविण्याची जबाबदारी संबंधित नियुक्त कंत्राटदारांचीही आहे. निवडणूक हे राष्ट्रीय कर्तव्य असल्यामुळे कंत्राटदारांनी केवळ व्यावसायिक विचार न करता या राष्ट्रीय कार्यात आपले उत्कृष्ट योगदान द्यावे, असे आवाहनही गगराणी यांनी यावेळी केले. (Assembly Election 2024)
दरम्यान, निवडणूक यंत्रणा आणि कंत्राटदार यांच्यात निश्चित किमान सुविधांच्या पूर्ततेसाठी योग्य समन्वय राहावा, यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या अधिकाऱ्यांसोबतच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सर्व परिमंडळीय उप आयुक्त यांचे सहकार्य राहील. मतदान केंद्रांवर सर्व सुविधा तयार असल्याची पाहणी उप आयुक्त करतील. तसेच मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची पूर्तता आणि गुणवत्ता तपासण्यासाठी ३६ विधानसभा मतदारसंघांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या २६ प्रशासकीय विभागांतील (वॉर्ड) यांत्रिकी, विद्युत, स्थापत्य, घनकचरा व्यवस्थापन, परिरक्षण आदींशी संबंधित वरिष्ठ स्तरावरील पाच अभियंत्यांचा समावेश असलेले पथक नेमण्यात आले आहे, असेही गगराणी यांनी यावेळी सांगितले. (Assembly Election 2024)
हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=R39gQichBNg
Join Our WhatsApp Community