BMC : कार्यालय तरी द्या नाहीतर निधी तरी द्या – विरोधी पक्षनेत्यांच्या भेटीनंतर काँग्रेस होणार आक्रमक

महापालिका आयुक्तांच्या मनमानी कारभाराविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा काँग्रेसचा निर्धार

146
BMC : कार्यालय तरी द्या नाहीतर निधी तरी द्या - विरोधी पक्षनेत्यांच्या भेटीनंतर काँग्रेस होणार आक्रमक
BMC : कार्यालय तरी द्या नाहीतर निधी तरी द्या - विरोधी पक्षनेत्यांच्या भेटीनंतर काँग्रेस होणार आक्रमक

मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना कार्यालय उपलब्ध करून दिल्यामुळे या कार्यालयात भाजपच्या नगरसेवकांचा असलेला राबता आणि त्यांच्या प्रभागांमध्ये महापालिकेचा (BMC) विकासनिधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याने काँग्रेसच्या माजी नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ही नाराजी स्पष्ट शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याकडे त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे विधीमंडळातील विरोधी पक्षनेते असल्याने आपल्याकडेही लोक तक्रारी घेऊन येत असल्याने आपल्यासाठीही महापालिका मुख्यालय उपलब्ध करून देण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांकडून पत्रव्यवहार केला जावा, अशी सूचना नगरसेवकांनी केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मला कार्यालय तरी उपलब्ध करून द्यावे किंवा आमच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये विकासनिधी मंजूर करून द्यावा, असा पावित्रा काँग्रेस येत्या काही दिवसांत घेताना दिसणार आहे. त्याबरोबरच महापालिका आयुक्तांच्या मनमानी कारभाराविरोधात न्यायालयात दाद मागण्याचाही निर्धार काँग्रेसने केला असल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचा – Pulses Price Hike : टोमॅटोनंतर आता डाळींमुळे कोलमडणार महिन्याचे बजेट, वाचा वर्षभरात किती झाली भाववाढ…)

काँग्रेसचे महापालिकेतील २९ नगरसेवकांपैंकी गंगा कुणाल माने, सुप्रिया सुनील मोरे, बब्बू खान, पुष्पा कोळी, वाजिद कुरेशी या 5 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचे पक्षांतर थांबवण्यासाठी अखेर मुंबई काँग्रेसने पुढाकार घेतला. त्यामुळे मंगळवारी मुंबई प्रदेश कार्यालयामध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आमदार वर्षा गायकवाड यांनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली. महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांशी वडेट्टीवार आणि वर्षा गायकवाड यांनी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. या बैठकीत आगामी महापालिका (BMC) सार्वत्रिक निवडणुकीत माजी नगरसेवकांसाठी काय रणनिती असावी, यावर चर्चा करण्यात आली.

तसेच उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासाठी तक्रार निवारण कक्षाच्या माध्यमातून कार्यालय उपलब्ध करून देत एकप्रकारे भाजप नगरसेवकांना कार्यालयात बसण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. तसेच त्यांच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागातील कामे प्रशासन मंजूर करून देत असल्याने ते विभागात सक्रीय आहेत, पण काँग्रेसच्या माजी नगरसेवकांना महापालिका मुख्यालयात (BMC) बसण्यास ना जागा आहे, ना माजी नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये विकासकामे मंजूर केली जात.

त्यामुळे ज्याप्रकारे पालकमंत्र्यांकडे महापालिकेसंदर्भात तक्रारी घेऊन येतात, त्याप्रमाणे विरोधीपक्षनेत्यांकडेही अशा प्रकारच्या तक्रारी येत असल्याने विरोधी पक्षनेत्यांसाठीही महापालिकेत तक्रार निवारण कार्यालय उपलब्ध करून घ्यावे, अशा प्रकारची सूचनाच नगरसेवकांनी केली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने विरोधी पक्षनेत्यांना कार्यालय उपलब्ध करून द्यावे किंवा काँग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागांमधील विकासकामे मंजूर करून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना करत यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी पुढाकार घ्यावा अशा प्रकारची सूचनाच या माजी विरोधी पक्षनेत्यांनी केली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजप व शिवसेनेच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये विकासकामे करण्यासाठी मिळणारा निधी, तसेच पालकमंत्र्यांसाठी दिलेले कार्यालय आदींबाबत न्यायालयात जाऊन दाद मागितली जावी, अशा प्रकारचीही चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. (BMC)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.