दिवाळी जवळ आली असून महापालिकेतील कामगार संघटनाही आता कर्मचाऱ्यांना बोनस तथा सानुग्रह अनुदान देण्याच्या मागणीचे बार उडवू लागले आहे. दि म्युनिसिपल युनियनने महापालिका कर्मचाऱ्यांना २० टक्के सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली असून बुधवारी महापालिकेतील विविध कामगार संघटनांच्या समन्वय समितीने महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये एवढे सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली आहे. मात्र, कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळत असले तरी ते आयकर आणि कामगार संघटनांचे शुल्क आदींमुळे प्रत्यक्षात सानुग्रह अनुदानाची रक्कम पूर्णपणे हाती पडतच नाही, त्यामुळे महापालिकेने या सानुग्रह अनुदानाच्या रकमेतून आयकराची रक्कम कापून घेऊ नये अशा प्रकारची मागणी प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.
( हेही वाचा : जागतिक हृदय दिन : आपल्या आरोग्याबद्दल प्रत्येकाने सजग आणि जागृत राहण्याची गरज!)
मुंबई महापालिका कामगार, कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक प्रकाश देवदास यांच्यासह बाबा कदम,बा. शी. साळवी, रमेश भुतेकर-देशमुख यांच्यासह समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाबाबत निवेदन दिले. यावेळी झालेल्या चर्चेच्यावेळी गेल्या वर्षापेक्षा पाच हजार रुपये जास्त बोनस तथा सानुग्रह अनुदान देण्यात यावा म्हणजे एकूण २५ हजार रुपये एवढे सानुग्रह अनुदान पूर्ण वेळ कर्मचा-यांना देण्यात यावे, यावर चर्चा झाल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्याबरोबर चर्चा करून अंतिम निर्णय घ्यावा असे ठरले असल्याचे या समन्व्य समितीने स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमा अंतर्गत काम करणा-या सर्व कंत्राटी कामगारांना सुध्दा बोनस देण्यात यावा अशी भूमिका अॅड. प्रकाश देवदास यांनी आयुक्तांकडे मांडली होती. त्यावरही चर्चा होऊन जर इतर महापालिका अशा कर्मचा यांना बोनस देत असतील तर आपणही त्यांचा बाबत विचार करण्यात येईल असे मा. आयुक्तांनी सांगितले. त्याचबरोबर आरोग्यसेविका तसेच विनाअनुदानित शाळा (नवीन माध्यमिक / एम.पी.एस.) यांनाही त्याप्रमाणात वाढ देण्यात यावी अशी भूमिका मांडली. सर्व कंत्राटी कामगारांना बोनस दयावा अशी मागणी मांडण्यात आली.
सर्व कर्मचा-यांना दिवाळीपूर्वी ही रक्कम देण्यात यावी अशी मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री यांच्याकडे अंतिम निर्णयासाठी गुरुवारी बैठक होणार आहे असे अँड. प्रकाश देवदास यांनी सांगितले. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पध्दतीने नेमलेल्या कर्मचा-यांना नवी मुंबई महानगरपालिकेने ११०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आल्याचे परिपत्रक आयुक्तांना सादर केले आहे. त्याची एक प्रत दाखवत त्यांनी ही मागणी केली आहे. त्यामुळे बोनस मिळणार असला तरी आयकराची रक्कम महापालिका कापून घेत असल्याने हाती काहीच उरत नाही. त्यामुळे ही रक्कम कापून घेऊ नये अशाप्रकारची मागणी सर्व कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आयकर भरणे हे बंधनकारक असले तरी याचा परतावा करताना जो काही कर आम्हाला भरावा लागेल, तो आम्ही भरू, पण सानुग्रह अनुदानाच्या रकमेतून याची रक्कम प्रशासनाने कापून घेऊ नये.
Join Our WhatsApp Community