मुंबई महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता वर्गातील रिक्तपदे भरली जाणार असून ही ६६४ रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन भरती परीक्षा घेण्याकरता आय.बी.पी.एस या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु या भरती परीक्षेसाठी तब्बल १० कोटी ७५ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व विद्युत) व दुय्यम अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व विद्युत/ वास्तूशास्त्रज्ञ) या संवर्गातील रिक्तपदे सरळसेवेने भरण्यात येणार आहे. याबाबतच्या भरतीला प्रशासकांची मान्यता मिळाल्याने लवकरच याबाबतची जाहिरात प्रकाशित करून उमेदवारांकडून अर्ज मागवले जाणार आहे. ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी आयबीपीएस संस्थेची नेमणूक करण्यात आली असून या भरती प्रक्रियेमध्ये सुमारे सव्वा लाख अर्ज प्राप्त होतील, असा अंदाज आहे. या पदांसाठी अंदाजित १ लाख २५ हजार अर्ज प्राप्त होतील, असे गृहीत धरून यासाठी १० कोटी ७५ लाख १२ हजार रुपयांचा सेवा शुल्क अंदाजित करण्यात आला.
ऑनलाईन परीक्षेसाठी प्रक्रिया तसेच त्याचा निकाल लावण्यासाठी सुमारे सहा कोटी रुपयांचा खर्च आहे, तर कनिष्ठ अभियंत्यांचे सेवा शुल्क म्हणून पाच लाख रुपये, फोटो तसेच बायोमेट्रीककरता ३१ लाख रुपये, नोंदणीकृत उमेदवारांवर लक्ष ठेवण्यासाठी सुमारे ५० लाख रुपये, परीक्षा केंद्रात मोबाईल जॅमर बसवण्यासाठी ४५ लाख अशाप्रकारे एकूण पावणे अकरा लाख रुपयांचा खर्च आयबीपीएसने दर्शवला आहे. त्यानुसार महापालिकेने या ऑनलाईन परीक्षेसाठी १०.७५ कोटी रुपये खर्च मंजूर केला आहे.
या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक हजार रुपये व मागासवर्ग उमेदवारांना परीक्षा शुल्कात १० टक्के सवलत देऊन ९०० रुपये एवढे परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच महापालिकेच्या कार्यरत कर्मचाऱ्यांनी या पदासाठी अर्ज केल्यास त्यांनाही याप्रमाणेच शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे यासाठी होणाऱ्या खर्चाचा बोजा काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल,असे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community