समुद्राने वेढलेल्या मुंबई नगरीचे संरक्षण करण्यासाठी ब्रिटिशांनी अनेक ठिकाणी तोफा बसविल्या होत्या. यापैकी तब्बल १६७ वर्षे जुन्या असणाऱ्या, पण तरीही भरभक्कम असणाऱ्या दोन पौलादी तोफा महापालिकेच्या घाटकोपर परिसरात असणाऱ्या ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’मध्ये काही वर्षांपूर्वी आढळून आल्या होत्या. पुरातन वास्तू जतन अभियंता खात्याद्वारे या दोन्ही तोफांचे महत्त्व लक्षात घेऊन एक नवे रुपडे बहाल करण्यात आलेल्या या तोफा नुकत्याच महापालिकेच्या दोन उद्यानांमध्ये पुनर्स्थापित करण्यात आल्या आहेत. घाटकोपर पश्चिमेला असणारे डॉ. केशव बळीराम हेडगेवार उद्यान आणि घाटकोपर पूर्वेला असणारे ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’ या उद्यानांमध्ये या तोफा पुनर्स्थापित करण्यात आल्या आहेत.
महानगरपालिकेचे पुरातन वास्तू जतन अभियंता खाते ज्यांच्या अखत्यारीत येते, त्या इमारत परीक्षण खात्याचे प्रमुख अभियंता विजय निघोट यांनी सांगितले की, घाटकोपर पूर्व परिसरात असणाऱ्या ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’मध्ये काही वर्षांपूर्वी दोन जुन्या तोफा आढळून आल्या होत्या. या तोफांना एक नवी झळाळी मिळण्याच्या दृष्टीने व त्या तोफांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन अनुरुपता ज़पत पुनर्स्थापना करण्यासाठीचा एक विशेष प्रस्ताव बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान खात्याद्वारे पुरातन वास्तू ज़तन खात्याकडे पाठवण्यात आला होता.
बुरुजाशी साधर्म्य साधणारे चबुतरे!
महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक तो अभ्यास करुन या दोन्ही तोफांची आता पुनर्स्थापना करण्यात आली आहे.पुरातन वास्तू जतन अभियंता खात्याद्वारे या दोन्ही तोफांचे महत्त्व लक्षात घेऊन एक नवे रुपडे बहाल करण्यात आलेल्या या तोफा नुकत्याच महापालिकेच्या दोन उद्यानांमध्ये पुनर्स्थापित करण्यात आल्या आहेत. या तोफांना पुनर्स्थापित करताना किल्ल्यांच्या बुरुजाशी साधर्म्य साधणारे चबुतरे तयार करण्यात आले असून त्यावर या तोफा बसविण्यात आल्या आहेत.
(हेही वाचा Sharad Pawar : कर्मकांडाला थोतांड म्हणून हिणवणाऱ्या शरद पवारांना नातू रोहित पवारांची चपराक)
तोफांचा सेल्फी पॉईंट
घाटकोपर पश्चिमेला असणारे डॉ. केशव बळीराम हेडगेवार उद्यान आणि घाटकोपर पूर्वेला असणारे ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’ या उद्यानांमध्ये या तोफा पुनर्स्थापित करण्यात आल्या आहेत. उद्यानाला भेट देणाऱ्या लहानग्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या तोफा आकर्षणाचा विषय ठरत असून अनेक नागरिक या दोघांसह आपला ‘सेल्फी’ देखील आवर्जून घेत आहेत, अशी माहिती उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.
ईस्ट इंडिया कंपनी’च्या काळातील या दोन्ही तोफा!
‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या काळातील या दोन्ही तोफांची लांबी ३.१० मीटर असून तोफांचा घेर हा ०.६४ मिटर आणि बाहेरील चाकांचा घेर १.१७ मीटर इतका आहे. या दोन्ही तोफांवर सन १८५६ या वर्षाची नोंद असून एका बाजूला रोमन लिपी मध्ये ‘एन सी पी सी’ अशी अक्षरे कोरण्यात आली आहेत, अशी ही माहिती प्रमुख अभियंता विजय निघोट यांनी दिली आहे. साधारणपणे १६७ वर्षे जुन्या असणार्या या दोन्ही तोफांना नवी झळाळी देण्यासह त्या बुरुजासमान चबुतऱ्यावर पुनर्स्थापित केल्यामुळे आता या ऐतिहासिक ठेव्याला नवा रुबाब प्राप्त होण्यासह मुंबईकरांना देखील एक ऐतिहासिक स्पर्श असलेली विरंगुळ्याची आणखी दोन ठिकाणे उपलब्ध झाली आहेत.