आतापर्यंत मुंबईतील १ हजार ५६२ सार्वजनिक मंडळांना गणेशोत्सवासाठी परवानगी

119

गणेशोत्सव येत्या काही दिवसांवर येवून ठेपला असून, या उत्सवासाठी सार्वजनिक मंडळांच्यावतीने मंडप उभारणी करण्याची लगबग सुरू आहे. या मंडपांच्या उभारणीसाठी महापालिकेकडे उत्सव मंडळांच्यावतीने अर्ज केला जात आहे. आतापर्यंत महापालिकेकडे २ हजार ७४८ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील १ हजार ५६२ मंडळांना उत्सव साजर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

३३३ अर्ज नाकारले

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांना परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका व वाहतूक पोलिस या सर्वांची परवानगी एक खिडकी योजनेद्वारे महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जात आहे. येत्या ३१ ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होत असून, अनेक मंडळांच्यावतीने महापालिकेकडे परवानगीसाठी अर्ज करण्यात येत आहेत. यात ४०८ अर्ज डुप्लिकेट असल्याचे छाननीमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे हे अर्ज रद्द करण्यात आले असून छाननीनंतर परवानगीसाठी प्राप्त झालेल्या अर्जांपैकी ३३३ मंडळांचे अर्ज नाकारण्यात आले आहेत.

(हेही वाचाः शाळांच्या आकर्षक प्रवेशद्वारांवर कोट्यवधींचा खर्च)

इतके अर्ज प्रलंबित

विभागाच्या देखभाल व दुरुस्ती विभागाच्या सहायक अभियंता विभागाने ३३३ अर्ज नाकारले असून, १ हजार ८३३ अर्जांना परवानगी देण्यात आली आहे, तर २०७ अर्ज त्यांच्याकडे प्रलंबित आहेत. परवानगीच्या प्रतीक्षेत असलेल्या अर्जांपैकी वाहतूक पोलिसांकडे १४१ अर्ज प्रलंबित आहेत. तर त्यांनी २६ मंडळांचे अर्ज हे वाहतुकीच्या दृष्टीकोनातून योग्य नसल्याने नाकारले असून त्यांनी १११ अर्जांना परवानगी दिली आहे.

स्थानिक पोलिस ठाण्याकडून परवानगीच्या प्रतीक्षेत १६३ मंडळांचे अर्ज आहेत. यापैकी १ अर्ज फेटाळण्यात आला तर ७५ अर्जांना परवानगी दिली आहे. तर सहायक आयुक्तांकडून ४ मंडळांच्या अर्जांना परवानगी प्राप्त होण्याची प्रतीक्षा असून विभागीय कार्यालयांमध्ये १ हजार ४४१ मंडळांचे अर्ज प्रलंबित असल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

  • प्राप्त झालेले अर्ज : २ हजार ७४८
  • डुप्लिकेट आढळून आलेले अर्ज : ४०८
  • छाननी झालेले एकूण अर्ज : २ हजार ३४०
  • आतापर्यंत परवानगी दिलेल्या मंडळांचे अर्ज : १ हजार ५६२
  • परवानगी नाकारलेले अर्ज : ३३३
  • विविध विभागांच्या परवानगीच्या प्रक्रीयेत असलेले अर्ज : ७७८
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.