भांडुप, पवई आणि विक्रोळीतील तब्बल २३ ठिकाणी असलेल्या डोंगर उतारांवरील झोपड्यांना महापालिकेने धोक्याचा इशारा दिला आहे. याठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता असल्याने महापालिकेच्या एस विभागाच्यावतीने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पावसाळ्यात सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भांडुप, विक्रोळी आणि पवईमधील डोंगराळ भागातील रहिवाशांना आता त्यांच्या जबाबदारीवर सोडण्यात आले आहे.
सावधानतेच्या सूचना
पावसाळ्यादरम्यान मुसळधार पावसाने दरडी कोसळण्याची, तसेच डोंगरावरुन वाहत येणा-या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलन होण्याची शक्यता असते. या भूस्खलनामुळे घरांची पडझड होण्याचीही शक्यता असल्यामुळे या भागातील धोकादायक इमारतींना/झोपड्यांना ‘एस’ विभाग कार्यालयातर्फे सावधगिरीच्या व सावधानतेच्या सूचना(नोटीस) यापूर्वीच देण्यात आल्या आहेत.
(हेही वाचाः ओबीसी आरक्षणासाठी पवारांची केंद्र सरकारकडे मागणी, म्हणाले…)
महापालिकेची जबाबदारी नाही
संबंधित परिसरातील/ झोपड्यांतील/ इमारतींतील रहिवाशांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना, जीवित किंवा वित्तहानी झाल्यास मुंबई महापालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नसल्याची नोंद घ्यावी, असे एस विभागाचे सहाय्यक आयुक्त अजित आंबी यांनी कळवले आहे.
या वस्त्यांना दिला इशारा
- विक्रोळी पश्चिम सूर्यानगर,
- पवई येथील इंदिरानगर, गौतम नगर, पासपोली, जयभिम नगर
- भांडुप पश्चिम येथील रमाबाई आंबेडकर नगर भाग १ व २, नरदास नगर, गांवदेवी टेकडी, गावदेवी मार्ग, टेंभीपाडा, रावते कंपाऊंड, खिंडीपाडा, रामनगर, हनुमान नगर, अशोक टेकडी, आंब्याची भरणी, डकलाईन रोड, नवजीवन सोसायटी, तानाजी वाडी, दर्गा रोड, खदान विश्वशांती सोसायटी
(हेही वाचाः ‘आयकर’पाठोपाठ यशवंत जाधवांच्या मागे ‘ईडी’चा फेरा!)
Join Our WhatsApp Community