इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी करणार कोविड सेंटरची उभारणी

त्यामुळे महापालिका कोविडसाठी इव्हेंट करते की कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपाययोजना म्हणून केंद्राची उभारणी करते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

75

मुंबईत कोविड रुग्णांवर उपचार करता यावे यासाठी उभारण्यात येणा-या जंबो कोविड सेंटरमध्ये आता आणखी एक भर पडणार आहे. महालक्ष्मी रेसकोर्सवर आता तात्पुरते जंबो कोविड सेंटर उभारण्यात येत असून, याचे काम सीएसआर निधीतून केले जाणार आहे. यासाठी तब्बल २२.७० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या कामासाठी रायझिंग इव्हेंट्स या कंपनीची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका कोविडसाठी इव्हेंट करते की कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपाययोजना म्हणून केंद्राची उभारणी करते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

(हेही वाचाः सील इमारतीच्या बाहेर पुन्हा पोलिस तैनात)

असे असेल कोविड सेंटर

महालक्ष्मी रेसकोर्सच्या वाहनतळाच्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपाचे जंबो कोविड सेंटर हे कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन उभारण्यात येत आहे. या जागेवर एकूण १०५ आयसीयू आणि २५० डीसीएचसी खाटा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. हे काम टर्न की पध्दतीने करण्यात येणार आहे. ज्यामध्ये सर्व युटीलीटी बनवण्यासह शवगृह बनवणे, स्वॅब टेस्ट चेंबर बनवणे, द्रवरुप प्राणवायू पुरवठा प्रणाली,अग्नीसूचक यंत्रणा कार्यान्वित करणे आदींची कामे केली जाणार आहे. याची उभारणी एक महिन्यामध्ये करणे अपेक्षित असून पुढील तीन महिन्यांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंपनीवर सोपवण्यात येणार आहे.

४४.८३ कोटी रुपयांचे कंत्राट

या केंद्राच्या उभारणीसाठी रायझिंग इवेंट्स या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीला ४४.८३ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात येत आहे. मात्र, हा या केंद्राच्या उभारणीचा काही भार हा व्यावसायिक सामाजिक जबाबदारी अर्थात सीएसआर निधीतून एचडीएफसी लिमिटेड यांच्या एनजीओ भागीदार असलेल्या स्वदेश फाऊंडेशनमार्फत केली जाणार आहे. स्वदेश फाऊंडेशनच्या माध्यमातून २३ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. त्यामुळे उर्वरित विविध करांसह २२.७० कोटी रुपयांचा निधी महापालिकेच्या तिजोरीतून खर्च केला जाणार आहे.

(हेही वाचाः विनामास्क फिरणा-यांवरची कारवाई पुन्हा कडक!)

महापालिकेचा खर्च

सीएसआरमधून उपलब्ध होणारा निधी प्रस्तावित कोविड सेंटरसाठी आयसीयू व डीसीएचसी करता लागणारी वैद्यकीय उपकरणे, वैद्यकीय फर्निचर व संबंधित मालमत्ता पुरवण्यासाठी देण्यात येईल. प्रस्तावित तात्पुरते जंबो कोविड सेंटर बंद केल्यानंतर येथील वैद्यकीय उपकरणे, वैद्यकीय फर्निचर व संबंधित मालमत्ता स्वदेश फाऊंडेशनला परत करण्यात येणार आहे. ही वैद्यकीय उपकरणे, वैद्यकीय फर्निचर व संबंधित मालमत्तेसाठीचे कंत्राटदाराचे देयक स्वदेश फाऊंडेशन परस्पर भागवेल. त्यामुळे उर्वरित खर्च महापालिका करणार आहे.

काय आहे रायझिंग इव्हेंट्स?

या केंद्रासाठी पात्र ठरलेली रायझिंग इव्हेंट्स ही खासगी क्षेत्रात कार्यक्रम करणारी संस्था आहे. या इवेंट मॅनेजमेंट संस्थेने यापूर्वी दहिसर चेकनाका, दहिसर कांदरपाडा, आरडब्ल्यू आय.टी.सी व मुलुंड आदी ठिकाणी जंबो कोविड सेंटर उभारणाऱ्या ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत ५० टक्के भागीदारीत काम मिळवले होते. त्यामुळे यापूर्वीच्या कामांच्या आधारे महापालिकेने या कामासाठी रायझिंग इवेंट्स या कंपनीची निवड केली आहे. यामध्ये शायोना कॉर्पोरेशन आणि एपीआय सिव्हीलकॉन या दोन कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. परंतु दोन्ही कंपन्यांनी जास्त दर लावल्याने कमी बोली लावलेल्या रायझिंग इवेंट्स कंपनीची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे या दोन्ही कंपन्यांकडे महापालिकेच्या अनेक कामांची कंत्राटे आहेत. त्यामुळे या निविदेमध्ये ओक्स या कंपनीने निविदा का भरली नाही, तसेच शायोना आणि एपीआय या कंपन्यांनी स्पर्धात्मक निविदा होण्यासाठी भाग घेतला होता का, असा सवाल उपस्थित होत आहे.

(हेही पहाः कारवाई करायला गेलेल्या महिलेची छाटली बोटे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.